श्री मेघःशाम सोनवणे
जीवनरंग
☆ ‘वऱ्हाड…’ – लेखक – अज्ञात ☆ अनुवाद – श्री मेघःशाम सोनवणे ☆
लालजी शेतकरी आहे. शिकलेले नाहीत पण समजदार व्यक्ती आहेत .धार्मिक वृत्तीचे लालजी संतुष्ट व्यक्ती आहेत. बालपणापासून त्यांची एक सवय आहे. जवळपास दररोज गावातील आठ दहा मंदिरांतील कोणत्याही एका मंदिराची साफ सफाई ते जरूर करतात….. लालजींच्या चेहऱ्यावर सदा स्वस्थ आणि तरुण हास्य असे विलसत असते, जसे त्या हास्याने अमृत प्राशन केलेले आहे.
आईच्या आशिर्वादापासून बालपणापासूनच वंचित असलेल्या लालजींना वडिलांचा आशीर्वाद अजूनही प्राप्त होत आहे. बालपणापासूनच त्यांचा आवाज नाही, थोड़ी ऐकण्याची क्षमताही कमजोर आहे. परंतु पत्नी वर ते खूप प्रेम करतात. असे ही.… भावना या शब्दांच्या अधीन नसतात. लालजींना नन्हकी देवीच्या रूपात खूपच सुंदर पत्नी मिळाली आहे. बहुतकरून ज्या कुटुंबात स्त्रिया नसतात, त्या कुटुंबात आलेली नवी सून घरातील सत्ता लवकरच आपल्या हातात घेते. पण नन्हकी देवीचे वागणे याच्या एकदम उलट होते. बहुतेक तिची इच्छा असेल, आपल्या मूक बधिर पतीच्या अधीन राहण्याची, की आपल्या पतीला असे वाटायला नको की या स्रीने मूक बधीर पुरुषाचा पतीच्या रूपात स्वीकार करुन उपकार केला आहे. संतुष्ट स्वभावाच्या लालजींना सत्ता, अधिकाराशी काही घेणेदेणे नव्हते…… या दोघांचे आपसातील प्रेम व समर्पणाचा भाव यात घराची सत्ता ठोकर खात लालजींच्या वडिलांजवळच पडून राहिली होती.
लालजींना दोन मुलं झाली. जसे मोठा मुलगा मंटूने तारुण्यात पदार्पण केले, तसे लगेच त्याचे लग्न करून लालजीने घराचा कारभार मुलगा व सूनेच्या हातात देऊन टाकला. मुलंही आपल्या बापावरच गेली होती. सर्व काही छान चालले होते. लालजींचे कुटुंब आजच्या काळात एक आदर्श कुटुंब होते. मंदिरात झाडू मारणाऱ्या लालजींच्या घराची सफाई करण्याचे काम ईश्वराकडे सोपवलेले होते. लालूच, द्वेष, छळ, कपट यांसारखा कचरा लालजींच्या घराच्या आसपासही फिरकत नव्हता.
जेव्हा लालजींच्या वयस्कर वडीलांवर पक्षवाताने हलकासा आघात केला, तेव्हा त्यांना स्वतः चालण्या फिरण्याला त्रास होऊ लागला. असेही ते खूपच म्हातारे झाले होते. आता लालजींचा दिनक्रम बदलला होता. आपल्या वडिलांच्या सेवेला त्यांनी आता आपल्या दिनचर्येत प्राधान्य दिले होते. शेती मोठा मुलगा आधीपासून सांभाळत होताच. त्याचे वागणेच असे होते की लवकरच तो मंटू ऐवजी “मंटू भाऊ” झाला होता.
छोटा मुलगा बालपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होता. त्याच्या शिक्षणासाठी प्रत्येकाने आपापल्या हिश्श्याचा त्याग केला होता. भावाने आपला घाम दिला तर वहिनीने आपले दागिने मोडले. नन्हकी देवीने आयुष्यभराचे सारे आशिर्वाद एकत्र करून लहान मुलावर ओवाळून टाकले होते. लालजी काय देऊ शकतील, नेहमीप्रमाणे मंदिरा-मंदिरांत जायचे आणि आता देवांकडे काही वेळ बघतच रहायचे. मुक्या तोंडाने काय बोलणार….? पण म्हणतात ना !! आज मिळेल किंवा कदाचित उद्या मिळेल, पण प्रत्येक पूजेचे फळ जरूर मिळेल.
देवांनी या मुक्या तोंडाच्या आवाजाचा मान राखला. हेमंत उर्फ हेमूने सरकारी इंजीनियरची नोकरी मिळवण्यात यश प्राप्त केले. मंटूभाऊची छाती अजून फुगली. लालजींचे संतुष्ट हास्य अजून विस्तारले.
आता छोट्या भावाला लवकरात लवकर विवाहबंधनात अडकवावे अशी मंटू सिंगची इच्छा होती. बोली लावली जावू लागली. अचानक मंटू सिंगचे खूप सारे दोस्त, नातेवाईक पैदा झाले. लालजीच्या क्षमतेला तोलले जावू लागले.
वहिनीने एक फोटो बघून मुलीला बघण्याची इच्छा व्यक्त केली. दोन्ही कुटुंबे भेटली. नन्हकी देवी ला मुलीचे काही शोधणारे, भिरभिरणारे डोळे आवडले. वहिनीचे मन इतक्या शिकल्या सवरलेल्या मुलीने तिला वाकून पाया पडून नमस्कार करण्याने जिंकून घेतले. मुलीला तिचे नाव विचारले गेले, मुलगी काही बोलू शकली नाही. शोधक नजरेने लालजींकडे बघत राहिली. अगदी तसेच…. जसे लालजी मंदिरातील मूर्तींना बघत रहात होते. त्रासाने त्रासाला ओळखले. लालजी जीवनात पहिल्यांदा बोटाने इशारा करत “आँ आँ” म्हणत ओरडत काही मागत होते – ” हीच सून पाहिजे !!! हीच पाहिजे !!!”
आणि अचानक तेथे खूपच गुढ शांतता पसरली. मुलगी आपल्या वाहत्या डोळ्यांनी, शोधक नजरेने लालजींना एकटक बघत होती. लालजी कधी मंटू तर कधी हेमूकडे खूपच विवश व लालूच भरल्या नजरेने एकटक बघत होते. दोन्ही बाजूंचे कुटुंबीय हेमंतकडे बघत होते.
हेमंत हातवारे करत म्हणाला – ” मी काय …..माझा आवाका तरी काय?? त्यांची मागणी प्रत्यक्ष इंद्रानेही नाकारली, तर मी त्याच्याशी भिडेन !!! ते वडिल आहेत माझे !! पण एकदा मुलीला तर विचारा.”
मुलीला इशारे करून विचारण्यात आले तर ती उठून पुढे आली आणि तिने लालजींचे पाय पकडले. लालजींनी दोन्ही हात तिच्या डोक्यावर ठेवले. गूढ शांततेला एक आनंदी चित्कार भेदून गेला.
सर्वच्या सर्व अति उत्साहात होते. मुलीच्या शोधक नजरेत आता संतुष्टीचा भाव होता. शोध पूर्ण झाला. डोळ्यांतील अश्रूंची धार वाहू लागली. रितीरिवाजाप्रमाणे हुंडा देण्याघेण्याचा विषय निघाला. मुलीच्या दोन्ही भावांनी मंटू सिंहच्या समोर हात जोडले – ” तुम्ही काहीच मागू नका. वडील खूप संपत्ती मागे सोडून गेले आहेत. आम्ही तुमच्या अपेक्षेच्या चारपट देवू. यासाठी नाही की तुम्ही आमच्या मुकबधीर बहिणीला स्विकारले !!! यासाठीही नाही की तुमचा भाऊ सरकारी इंजीनियर आहे !! पण यासाठी की असे कुटुंब आम्ही न बघितले….न ऐकले आहे.”
वरातीची तयारी जोरात सुरू होती. मंटू भाऊ आपल्या लग्नात ज्या इच्छा अपूऱ्या राहिल्या होत्या त्या भावाच्या लग्नात पूर्ण करू पहात होता त्यामुळे खूपच व्यस्त होता. पण एक दिवस हेमू घरातील सर्वांसमोर मोठ्या आवाजात आपल्या मोठ्या भावाला बोलला– ” दादा !!! प्रत्येक गोष्टीत तुमची दादागिरी नाही चालणार.”
सर्वांना एकदम धक्का बसला. मंटू जेथे होता तेथेच थांबला. हेमू पहिल्यांदाच आपल्या मोठ्या भावाशी मोठ्या आवाजात बोलला होता.
मंटूने हबकून विचारले- ” वेडा झालास का?? काय बोलत आहेस ?”
भावाच्या दटावण्याने आतल्या आत थरकापला हेमंत. पण पुन्हा हिम्मत करुन बोलला – ” वेडा नाही आहे दादा !!! लग्न माझे आहे, माझ्याही काही इच्छा आहेत.”
” काय हवे आहे तुला ? ”
” नवरीसाठी जे पण दागिने बनवत आहात, ते भले थोडे कमी बनवा…. पण प्रत्येक दागिन्यांचे दोन सेट बनवा…. एक तिला आणि एक वहिनीसाठी पण !! ” – हेमंत आपल्या वहिनीच्या सुन्या गळ्याकडे पहात बोलला.
मुलाचं बोलणं ऐकून नन्हकी देवीचे मन गर्वाने प्रफुल्लित झाले. वहिनी भावूक झाली. मंटू बडबडत , मानेला झटका देत तेथून निघून गेला – ” वेडा कुठला.”
हेमंत व्हाट्सएप वर आपल्या होणाऱ्या नवरीला मेसेज टाइप करु लागला – ” तुझी इच्छा पूर्ण झाली.” इंजीनियरने एकदाचे तोंड उघडले आणि ते बंदच करू शकला नाही.
” हेमूसाठी फॉर्च्यूनर ठरवून दिली आहे, पप्पांसाठी बोलेरो केली आहे,” – मंटू सिंह घरात सांगत होता.
” पप्पांसाठी पण फॉर्च्यूनरच ठरवा दादा ” – हेमंतने आपली इच्छा जाहीर केली.
” का?? “
” ते वडील आहेत माझे ” – हेमंत गर्वाने बोलला.
” बाबा आणि पप्पांसाठी धोतर आणि शर्ट शिवायला दिला आहे.”
” माझ्या आणि तुमच्यासाठी ?? “
” कोट पॅंट चे माप दिले आहे ना !! “
” पप्पांसाठी पण कोट पॅंट घ्या ना दादा ” – हेमंत मोठ्या भावाची मनधरणी करत बोलला.
” वेडा आहेस का?? ”
” वडील आहेत ते माझे !!” – इंजीनियर गर्वाने बोलला.
नन्हकी देवीने डोक्याला हात लावला, म्हातारपणी बापाला कोट पॅंट घालायला लावणार?? वहिनी हसत राहिली, पण मंटू सिंह ‘हो’ म्हणत घरातून गेला.
सर्व तयारी झाली होती. आजोबा प्रकृतीमुळे लग्नाला जायला असमर्थ होते. त्यांची काळजी घ्यायला एक माणूस घरी ठेवला होता. लालजी कोट पॅंट घालून मुलाच्या लग्नात मिरवतील हा साऱ्या गावात चर्चेचा विषय होता. व-हाड निघायची वेळ झाली. सर्व लोक व्यवस्थित गाडीत बसले की नाही हे बघण्यासाठी मंटू स्वतः गाडीमध्ये बघत फिरत होता. त्याला पप्पा कुठे दिसत नव्हते. दोन चार लोकांना विचारले – कुणालाच काही माहित नव्हते. सर्व लोक कुजबुज करू लागले. सगळे व-हाडी घाबरून एक दूसऱ्याला विचारू लागले. लालजींना शोधू लागले.
अचानक काहींची नजर घराकडे वळली. बघून सर्वांना आश्चर्य वाटले. सगळे आपल्या आसपासच्या लोकांना इशारा करत घराकडे बघायला सांगू लागले. सर्व व-हाडी डोळे फाडून घराकडे बघत होते. मंटू सिंह ने घराकडे बघितले आणि डोके धरून खालीच बसला.—
— घरातून लालजी निघाले. आपल्या खांद्यावर आपल्या वृद्ध बापाचा हात ठेवत, त्यांना सांभाळत, अडखळत ते गाड़ीकडे येत होते. स्वतः साठी शिवलेला कोट पॅन्ट आपल्या म्हाताऱ्या वडिलांना घालून त्यांच्यासाठी घेतलेले धोतर कुडता त्यांनी स्वतः घातला होता !!! नजर वर करत गावकऱ्यांकडे बघत, ते म्हणत होते – ” हे वडील आहेत माझे !!!”
मंटू सिंहने पळत जात आजोबांच्या दुसऱ्या खांद्याला आधार दिला.
हिंदी लेखक – अनामिक
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे
मो 9325927222
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈