वाचताना वेचलेले
☆ सु-शिक्षित ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
खूप वर्षांपूर्वी मी पावसाळी दिवसात लोणावळा एसटी स्टँड वर एका खूप गरीब आणि खूप म्हाता-या आजीकडून एक रुपया देऊन बारा आण्याच्या भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि एसटी कडे धावलो. माझी जागा खिडकीकडे होती. एसटी सुटायला वेळ होता. मी खिडकीशी जागा पकडली आणि तितक्यात मी त्या म्हाता-या आजीला निरनिराळ्या एसटी बसेस मध्ये डोकावून लंगडत लंगडत धावत येताना पाहिलं.
आमच्या एसटीत तिला मी दिसताच तिचे डोळे चमकले आणि ती निर्मळ हसली. तिने हात उंचावून मला तिच्याकडून येणे असलेले चार आणे दिले आणि म्हणाली “भ्येटला रं तू, लय शोधला म्या तुला. ह्ये घे तुजं चार आनं. म्या म्हटलं की तुजं पैसं देण्यासाठी आता फुडला जल्म घ्यावा लागतोय मला बग.”
एसटी सुटायला वेळ होता, म्हणून मी तिला थांबायला सांगून आणि शेजा-याला ‘येतोय’ अशी खूण करून खाली उतरलो.
मी तिला विचारलं, ‘काय गं आज्ज्ये, एवढ्यासाठी तुझी पाटी तिथे तशीच सोडून मला शोधत आलीस होय ? त्यावर ती म्हणाली “बाबा, आंदळ्याची गुरं द्येव राखतोय बग. आनी बाजूची म्हतारी हाय की लक्ष ठिवायला”. मी विचारलं, “आज्ज्ये, राहिले असते चार आणे तुझ्याकडे तर काय झालं असतं गं एवढं ?”
त्यावर ती जे उत्तरली, ते मला निरुत्तर करणारं होतं. ती म्हणाली, ‘असं बग बाबा, ऱ्हायलं असतं चार आनं माज्याकडं तर आपला दोगांचा पुन्ना जल्म काय चुकत न्हवता बग. माजा तुजं चार आनं देन्यासाटी आन् तुजा चार आनं घेन्यासाटी, आन् त्येला जबाबदार व्हते मी. आन् पुन्ना फुडला जल्म कंचा येतुंय कुणाला ठावं, माणसाचा, प्रान्याचा कीं आणखी कुनाचा, म्हंजी आला का पुन्ना चार आण्यासाटी पुन्ना पुन्ना जल्माचा फ्येरा ? आणि त्यात आपण पुण्य करतोय की पाप काय म्हाईत, आन् मग ह्ये चक्र बंद व्हनार कदी ?” मी खल्लास !
एसटी सुटायला अजून वेळ होता. मी मनात म्हटलं, की अजून जरा आजीकडून काही तरी शिकावं, आणि म्हणून मी तिला म्हटलं, “आज्ये, माझे चार आणे देऊन टाकायचे कुणाला तरी गरीबाला.” त्यावर आजी म्हणाली “आरं, कुनाचं तरी पैसं कुनाला तरी द्यायचा अदिकार मला न्हाय, पैसं तुजं आणि त्यावर मी कशापाई पुण्य कमवू? मी तुजं चार आनं तुला दिलं, आता मी सुटले बग.”मी निरुत्तर झालो.
तितक्यात कंडक्टर आला, त्याने घंटी मारली, मी पटकन् त्या आजीला वाकून नमस्कार करून एसटीत शिरलो तर ती आजी मोठ्या समाधानात पाठमोरी आपल्या पाटीकडे लंगडत लंगडत निघाली होती. माझे डोळे भरून आले होते.
या घटनेतून मी इतकाच बोध घेतला की माझ्याहून ती कितीतरी अधिक सुसंकृत होती आणि म्हणूनच सुखी, समाधानी होती, मी ‘शिक्षित’ असेन पण ती ‘सु-शिक्षित’ होती, सु-संस्कृत होती.
म्हणून मी तत्क्षणी तिला गुरूपदाचा मान दिला.
संग्रहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈