श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– शब्दांचा स्वामी…–
☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
कुणी म्हणे सरस्वती पुत्र,
कुणी म्हणे आधुनिक वाल्मिकी |
माणदेशी शेटफळे गावी,
आज जन्मला शब्दांचा स्वामी |
☆
‘मृत मूल’ जन्माला आले,
कुटुंबाला चुकचुकल्याचा घोर |
अनंत उपकार अडाणी सुईणीचे,
विस्तव टेकता पहिल्यांदा रडले पोर |
☆
जन्मतःच मृत्यूला मात देत,
गजाननच्या श्वासांची झाली सुरवात |
अवतरला शब्दांचा कुबेर,
साहित्य धनाची करायला बरसात |
☆
काय म्हणावे ग.दि. मा. तुम्हा,
लेखणीचा राजहंस की ध्रुवतारा |
समृद्ध केलं मराठी भाषेस,
लेखणीतून बरसल्या अमृतधारा |
☆
कवी, लेखक, गीतकार, अभिनेता,
लिहिल्या अभंग, पोवाडा, कथा-पटकथा |
गीतगोपाल, जोगीया, गीतरामायण,
साहित्याचा महामेरू.. तुजपुढे टेकतो माथा |
☆
एक एक शब्द गुंफीत,
उजळीत गेला नक्षत्रांची दीपमाला |
झगमगले साहित्य-भूमंडल,
ऐसा साहित्यिक भूतो ना भविष्यती झाला !!!!
☆
… १ ऑक्टोबर… महाकवी ग. दि. माडगूळकर यांचा जन्मदिवस… साहित्यातल्या या तेजोमय भास्कराला विनम्र प्रणाम…
© श्री आशिष बिवलकर
१/१०/२३
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
Khup chaan Dada