सुश्री शांभवी मंगेश जोशी
जीवनरंग
☆ ‘ती…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆
तिनं स्कूटर लावली, हँडल लॉक केलं. डिकीतली पर्स अन् पुस्तकं काढून घेतली. पर्स खांद्याला अडकवली अन् पुस्तकं हातात धरून चालू लागली. नेहेमीसारखीच कुठंही न बघता थेट फ्लॅटच्या दाराशी आली. दाराचं कुलूप काढून घरात गेली. लगेच मागं वळून दरवाजा बंद केला.
…बस एवढंच तिचं दर्शन रोज आजूबाजूच्यांना होत होतं. तिचा हा रोजचाच दिनक्रम होता. सकाळी ठराविक वेळेला ती घरातून बाहेर पडायची अन् संध्याकाळी ठराविक वेळेला परतायची. आली की फ्लॅटच्या बंद दरवाजाआड लुप्त व्हायची. तिच्या जाण्याच्या अन् येण्याच्या वेळा आजूबाजूच्या लोकांना माहीत झाल्या होत्या. दोन्ही वेळेला रिकामटेकडे न् अतिचौकस लोक तिला डोळे भरून न्याहाळून घेत. दार बंद झालं की, तिचं दर्शन दुर्लभ व्हायचं. तिच्या घरातून कधी बोलण्याचे, रेडिओ, टी.व्ही.चे कसलेच आवाज यायचे नाहीत. खिडकीतूनसुद्धा ती कधी डोकावताना दिसायची नाही. आत सदैव एकटी काय करत असावी, याची अनेकांना उत्सुकता होती.
दिसायला फार देखणी नसली, तरी आकर्षक होती. राहण्यात मेकअप किंवा नटवेपणा कधी दिसला नाही. पण, साधासुधा नेटकेपणा होता. केसांचा बॉयकट, साधी सुती साडी, कुंकवाची एवढीशी टिकली. बस. बाकी कानात, हातात, गळ्यात कुठं दागिने नसायचे. गळ्यात मंगळसूत्र पण नव्हतं. यामुळंच तिच्याबद्दल अनेक तर्क-कुतर्क प्रत्येकजण लढवत होता.
ती एकटी होती म्हणून आजूबाजूच्या टगे मंडळींना तिच्याबद्दल फार कुतूहल होते. त्यांच्या दृष्टीनं विवाहित असो, कुमारिका असो की विधवा. काहीही असलं तरी तिचं आकर्षक रूप अन् एकटं असणं फार महत्त्वाचं होतं. तिची स्कूटर वगैरे बंद पडेल, कधी कधी गॅसची टाकी वर न्यावी लागेल किंवा काही मदत लागेल, त्यानिमित्ताने तिच्या घरात जाण्याची संधी मिळेल, याची सगळे वाट पाहत होते. पण, 6 महिन्यांत अजून तरी तशी वेळ आली नव्हती.
तिला राहायला येऊन 6 महिने झाले होते. पण, ती सकाळी जाते, संध्याकाळी येते अन् एकटी राहते, यापलीकडे फारसं कुणालाच तिच्याबद्दल काही माहीत नव्हते.
बिल्डिंगमधल्या बायकांना मात्र, तिचं एकटं राहणं आवडायचं नाही. तसा तिचा काही त्रास कुणाला नव्हता. पण, तिच्याबद्दल कुणालाच, काहीच माहीत नव्हतं, याचाच सगळ्यांना संताप यायचा. त्यांच्या दुपारच्या वेळातल्या लोणची-पापडांच्या गप्पांत तोंडी लावायला त्यांना तिचा विषय घेता येत नव्हता. मग तिच्या एकटं राहण्याबद्दलच त्या नाना तर्क लढवत. ती विधवा की अविवाहित की घटस्फोटित ते कळत नव्हतं. ती कुणाची कोण हे माहीत नव्हतं. तिचे लागेबांधे कुणाशी, हे कळण्याशिवाय तिचे स्थान पक्कं करता येत नव्हतं. ‘आमचे हे’ या पलीकडं विश्व नसलेल्या त्या बायकांना तिच्या विश्वाची कल्पनाच करता येत नव्हती. मग कुणी म्हणत, ‘चार बायकांच्यात मिसळायला काय झालं?’
’शिष्ट आहे.’
‘गर्वीष्ठ दिसतेय.’
‘कशाचा एवढा गर्व आहे, कुणास ठाऊक?’
‘ समजते कोण स्वत:ला?
त्या सारखी माझ्याकडं तिच्याबद्दल चौकशी करत. कारण आमची अन् तिची एक भिंत कॉमन होती. पण, मलाही तिच्याबद्दल जास्त काही माहीत नव्हते.
त्या दिवशी रात्री मात्र काही वेगळाच प्रकार घडला. रात्री 11 चा सुमार होता. तिच्या दारापाशी काही माणसं बोलत होती. तिच्या दारावर टक्टक् करीत होती. ते काय बोलतायत ते ऐकू येत नव्हतं. पण, रागरंग काही चांगला वाटत नव्हता. मी खूप वेळ चाहूल घेत होते. पण, काय करावं, ते मलाही काही कळेना. नाही नाही ते विचार मनात येत होते. भीती, शंका-कुशंका… यामुळे मी बेचैन झाले. घरातल्यांना उठविण्याच्या विचारातच मी होते.
तेवढ्यात आमच्या मागच्या खिडकीच्या काचेवर, दारावर खूप आवाज झाला. पाहते तर ती! भेदरलेली…, घाबरलेली…, जोरजोरात दार आपटत होती. मी पळतच दार उघडलं… तर तिनं मला घट्ट धरून ठेवलं. तिच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता. एवढी ती घाबरली होती. खाणा-खुणा करून सांगत होती. पुढच्या दाराशी कुणी आहे म्हणून. एवढ्यात आवाजाने बरेच लोक जागे झाले. ते बाहेरचे लोक निघून गेले. ती मला घट्ट पकडूनच तिच्या घरात घेऊन गेली. अजूनही थरथर कापत होती ती. घरात जाताच ती माझ्या गळ्यात जवळ-जवळ कोसळलीच. गदगदून… रडत होती. शहारत होती. मीही फक्त तिचा थोपटत राहिले. हळूहळू हुंदके देतच तिला झोप लागली. मीही तिथंच लवंडले. पहाटे उठून हलक्या पावलाने घरी आले. सगळं आवरून तिच्यासाठी चहा घेऊन पुन्हा आले, तर ती सुस्नात… प्रसन्न एखाद्या पारिजातकाच्या फुलासारखी! ध्यानस्थ बसलेली. डोळे बंद. तिला माझी चाहूलही लागली नाही.
घरात फारसं सामानसुमान नव्हतं. समोरच्या भिंतीवर एक सुंदर पेंटिंग होतं. त्याखाली तिचंच नाव असावं… अश्विनी. मी त्या पेटिंगकडं पाहात मनात प्रश्न जुळवू लागले. कालची माणसं कोण असावीत? कशाला आले असतील?
तिच्याकडे नजर गेली अन् तिनं डोळे उघडले. पण, त्या अथांग डोळ्यात प्रगाढ दुःख दिसत होते. अन् मिटलेल्या ओठात ते सहन करण्याची ताकद!
मी काही विचारायच्या आत ती माझ्याजवळ आली. तिने मला चक्क मिठी मारली. माझे हात हातात घेऊन माझ्याकडे पाहत राहिली. काय बोलावं तेच मला सुचेना. कारण ती खुणा करून सांगत होती ‘‘मला बोलता येत नाही’’ –
तिच्या सगळ्यांच्यात न मिसळण्याचं, इतरांशी न बोलण्याचं हे कारण होतं तर… आणि आम्ही बायका काय काय समजत होतो तिच्याबाद्दल. मलाच लाज वाटली.
© सौ. शांभवी मंगेश जोशी
संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003
फोन नं. 9673268040, [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈