श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ तुझे येणे, तुझे जाणे ?… कवी : दिलीमा ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
तुझे येणे, तुझे जाणे ?
आणि आमचे उगा मिरवणे….
आम्ही तो आणला….
आम्ही तो बसवला….
आम्ही नैवेद्य दाखवला….
आम्ही तो विसर्जित केला…
अनादी,अनंत तो एक !
त्याला काय कोण बनवेल
अन् बुडवेल ?
अनंत पिढ्या आल्या…
अनंत पिढ्या गेल्या….
तो तरीही उरला…
काळ कधी का थांबेल ?
तो कधी न संपेल…
आपल्या आधी तोच एक….
आपल्या नंतरही तोच एक….
त्यास काय कोणाची गरज ?
मग काय हा उत्सव
दहाच दिसांचा ?
का न करावा तो रोजचा ?
आपुले येणे, आपुले जाणे,
त्यामधले क्षणभंगुर हे जगणे….
जगण्याचाच या उत्सव करावा….
अन् रोजच तो मनी बसवावा….
सजावट करावी विचारांची…
रोषणाई मनातल्या प्रेमाची…
नैवेद्य दाखवावा सत्याचा….
फुले दया, क्षमा, शांतीची….
अन् आरती सुंदर शब्दांची….
रोजच क्रोध, मोह, मत्सर विसर्जित व्हावा….
हिशोब आजच्या भावनांचा आजच पूर्ण व्हावा…
असा तो रोजच का न पुजावा ?….
रोज नव्याने मनी तो
असा जागवावा….
अन् उत्सव आयुष्याचा रोज नव्याने साजरा व्हावा….
कवी : दिलीमा
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈