सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ नंदू आणि आनंद (अनुवादीत कथा) – भाग ३ (भावानुवाद) – डॉ सुधा ओम ढींगरा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
डॉ सुधा ओम ढींगरा
(मागील भागात आपण पहिले – ज्या दिवशी त्याला मुंबईला आय. आय. टी. ला प्रवेश मिळाला, त्या दिवशी तो, आमोद, पप्पा खूप खूश होते. तो पतियाळातील लोकांशी बोलू इच्छित होता. आजी-आजोबांना सांगू इच्छित होता की त्याला आय. आय. टी. ला प्रवेश मिळालाय. पण त्याला पप्पांचं बोलणं आठवलं. ‘आपल्या पायावर उभं राहून तू आपले निर्णय घेशील आणि निवड करशील, तेव्हा तुला कुणीच काही म्हणणार नाही. सगळं विश्व तेव्हा तुझं असेल!’ हा विचार करून तो गप्प बसला. आता इथून पुढे)
त्या दिवशी आकाशात खूप विजा चमकत होत्या. वीज आजोळच्याच घरावर पडली. आजोबा आणि मामाने दिवाळं काढलं होतं. त्यांचं सारं काही संपलं होतं. पप्पा धम्मकन कोचावर बसले. तो आणि आमोद पप्पांकडे धावले. त्यांना भीती वाटत होती, पप्पांना काही होणार तर नाही ना?
सगळं काही लुटलं गेलं होतं. तरीही पप्पा, मम्मीला काहीच बोलले नाहीत. बस्स! मम्मीबरोबर जे काही थोडं-फार बोलणं होत असे, तेही बंद झालं. तसे दोघेही वेगवेगळ्या खोल्यांमधूनच झोपत असत.
तो आय. आय. टी. ला मुंबईला गेला, तर आमोद आय. आय. टी.साठी हैद्राबादला. त्यांची फी, इतर खर्च यांची व्यवस्था पप्पांनी कुठून कशी केली, हे मम्मीनं विचारलं नाही, पप्पांनी सांगितलं नाही.
तो गाडीत चढत होता, तेव्हा पप्पा म्हणाले, ‘तू नेहमी विचारायचास, पप्पा तुम्ही आईला काहीच का बोलत नाही? तू माझ्यावर नाराजसुद्धा व्हायचास. बेटा, सुगंधा माझ्या तीन मुलांची आई आहे. तुमची आई आहे. आपल्या मुलांच्या आईला मी कसं काही बोलणार? तुमच्या आईने माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर इतके खोटे-नाटे आरोप केले की इच्छा असती, तर मी घटस्फोट घेऊ शकलो असतो, पण तुम्ही तिघे आमच्या भांडणात भटकला असतात. तुला तुझ्या आजोळचे लोक माहीतच आहेत. मला कळलं होतं, त्यांची नजर आपल्या हिश्श्यावर आहे आणि सुगंधा त्यांच्या कारस्थानाला बळी पडली. मला खूप वर्षांनंतर कळलं की वाटणी झाल्यानंतर तुझ्या मम्मीच्या वडलांनी माझी बदली इथे दिल्लीला करवली. तुला माहीतच आहे, राजकीय क्षेत्रात ते मोठे पॉवरफुल होते. मला माझ्या कुटुंबापासून तोडूनच ते हे सगळं करू शकत होते. बाबांनी एक गोष्ट चांगली केली की त्यांनी जमिनीची वाटणी नाही केली. ती तेवढी वाचली.’
‘पण आपण स्वत: आजी- आजोबांना भेटू शकला असतात. फोनवरून बोलू शकला असतात. .’
बेटा, मी तसं केलं असतं, तर रोज त्यांना शिवीगाळ झाली असती. नवनवीन दोष लावले गेले असते. मग आईच म्हणाली, ‘आमच्यापासून तुटून बाजूला हो आणि आपल्या परिवाराशी जोडून घे. आपल्या मुलांना मोठं कर. त्यांना चांगला माणूस बनव. आम्ही जीवंत राहिलो, तर ती आम्हाला जरूर भेटतील. ज्या वृक्षाची मुळं मजबूत असतात, त्या वृक्षाचा तणा कधीही सुकत नाही. मजबूत असतो तो. बेशक, अनेक वर्षांनी त्याच्याकडे या. अनेक वर्षांपूर्वी सुटलेली तीच सावली, तीच स्निग्धता मिळेल. विचार केला, तर कधी उशीर होत नाही. … बस! धैर्य धर!‘ मी तेच केलं.’
‘पण सगळ्यांपासून तुटूनही घरातलं वातावरण चांगलं कुठे राहीलं होतं?’ मी उदास नजरेने पप्पांकडे पाहीलं.
‘ मी माझ्याकडून खूप प्रयत्न केला.’ त्यांच्या शब्दात विवशता होती.
‘ पहिली दहा वर्षे आपली चांगली गेली. आपली साथ होती. नाही तर ज्या वातावरणात आम्ही वाढत होतो, तिथे काहीही होऊ शकलं असतं!’, असं म्हणत तो आणखी उदास झाला. त्याच मूडमध्ये त्याने विचारले, ’ पप्पा, मम्मी इतकी कशी बदलली?’
‘बेटा, आज दिसणारी सुगंधाच खरी सुगंधा आहे. पतियाळाच्या वातावरणात तिने स्वत:ला ढाळून घेतलं होतं. वातावरणाचा किती परिणाम होतो, हे तू आपल्याच घरापासून शिकू शकतोस.’
पप्पांच्या बरोबार स्टेशनवर झालेलं बोलणं, एखाद्या टॉर्चप्रमाणे त्याने आपल्याजवळ बाळगलं होतं.
आय. आय. टी. मधे असताना, अनेक वेळा पतियाळाला फोन करण्याची त्याला इच्छा झाली, पण लाज, शरम त्याचे हात थांबवत होती. मम्मीच्या वागण्याचं त्याला गिल्टी फील येत होतं. कुणी तरी बनेन, मगच फोन करेन. तेव्हा मम्मी काहीच बोलू शकणार नाही. तेव्हा विकल्प आणि निवड त्याची असेल. दुसर्या कुणाची नाही, त्याने ठरवलं.
फोनच्या रिंगने स्मृतींची शृंखला तुटली. पप्पांचा फोन आहे. ‘ हॅलो पप्पा…’
‘बेटा, तू रोज फोन करतोस. सुगंधा शेजारीच असते. तू काही बोलू शकत नाहीस. काही खास आहे?’
‘ हं! जे काम आपण करू शकला नाहीत, ते करायला मी निघालो आहे. आत्या इथेच, मी रहातो, त्या शहरात आपल्या मुलाकडे रहायला आली आहे. तिचा मुलगा या शहरात आहे, हे मला माहीतच नव्हतं. त्याने मला शोधून काढलं. आजोबा- आजी पण आले आहेत. त्यांच्या घरासमोरच मी कारमध्ये बसलोय. भेटायला चाललोय.’
‘काजलच्या मुलाला माहीत होतं का, की तो तुझ्या शहरात आहे किंवा तू त्याच्या श्हरात आहेस आणि त्याने तुला शोधून काढलं. उगीच काही तरी बोलतोस झालं! चेष्टा करू नकोस!’ नवनीत भुल्लर नाराज होत म्हणाले.
‘पप्पा, नाराज होऊ नका. या देशात येऊन मी पहिला फोन पतियाळाला केला होता. रिंग वाजत राहिली. कुणी फोन उचलला नाही. जेव्हा जेव्हा लहानपणच्या आठवणी यायच्या, तेव्हा तेव्हा मी पतियाळाला फोन लावायचो, पण पदरी निराशाच यायची. मग मला वाटलं, की त्या घरात आता कोणीच रहात नाही किंवा मग नंबर बदललाय. मग कुणी तरी माझा मिस्ड कॉल बघून म्हणालं, ‘कुणी मार्केटिंगवाले फोन करताहेत.’ काजल आत्याचा मुलगा अंकीत त्यावेळी तिथे होता. तो नंबर पाहून म्हणाला, हा माझ्या शहराचा नंबर आहे. कदाचित नंदी शिकागोत असेल.’
अंकित इथे येणारच होता. सगळेच मग मला भेटण्यासाठी इथे आले आहेत. आपल्याला माहीतच आहे, आजोबा- आजीला फोन करणं मुळीच आवडत नाही. सरळ गळामिठी घालायची, हीच त्यांची पहिली आणि शेवटची पसंती आहे. बस! आले भेटायला!’
हे ऐकताच दुसरीकडे एकदम शांतता पासरली. त्याला जाणवतय , दुसर्या बाजूने डोळे काही बोलताहेत. दीर्घ श्वास सोडल्याच्या आवाजाबरोबरच हुंदक्याचाही आवाज आला.
पप्पांचा धीर-गंभीर आवाज त्याला ऐकू आला, ‘ आई खरं बोलली होती. ती म्हणाली होती, विचार केला, तर कधी उशीर होत नाही.‘ आणि फोन बंद झाला.
आनंद कारमधून बाहेर पडला आणि कार लॉक करून, त्या घराच्या दिशेने पुढे
निघाला. त्या घरच्या दरवाजाआड अनेक डोळ्यांच्या जोड्या प्रतिक्षारत आहेत आणि घराकडे पावले टाकत जाताना आनंद हळू हळू नंदी होऊ लागलाय.
– समाप्त –
मूळ हिंदी कथा 👉 ‘कभी देर नहीं होती…’- मूळ लेखिका – सुधा ओम ढींगरा
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈