? वाचताना वेचलेले ?

🌺 “पुत्रसुख…” लेखक : अज्ञात 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं. आणि सामंतकाका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मूर्ती… कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली. कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं,

” थांबा जरा ..गणपती मूर्ती आहे….!” त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मूर्तीकडे पाहिलं.

 ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हात नकळत जोडले गेले.

कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबलबेल दिली. एस.टी.सुरु झाली..! कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला…!

काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मूर्ती असतांना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी. त्यांची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, ” राहू दे काका. उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मूर्ती ठेऊ. तेव्हा द्या.”

थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, ” काका एक विचारू? तुमच्या गावात गणेशमूर्ती मिळत असेलच नं? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणं ; ते ही एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन? “

सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, “आमच्या गांवात मिळतात मूर्त्या. पण अशी नाही. ही मूर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? जिवंत वाटते. अगदी लहान बाळच..!”

कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हात जोडले. हलकेच स्पर्शही केला.

काका म्हणाले,  ” आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन थकलो. मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी पंधरा वर्षापूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मूर्ती तिथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणूकाही… तिचे डोळे भरुन वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले  “माझं बाळ…! ” …. हे असं घडल्यापासून. ह्या गावातून मुर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो “

कंडक्टर हे ऐकून स्तिमीत झाला. थोड्यावेळानं त्यानं विचारलं– ” पण काका तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावात ..”

” ते ही केलं पण… जास्त मूर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट.. आणि असे भाव येतीलच याची शाश्वती नाही “

हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, ” काका मग विसर्जित करायचीच नाही मुर्ती ..!”

सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले, ” विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..! आत्ताही दारात वाट पहात बसली असेल…  रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय..! भाकरतुकडा काय.., दृष्ट काढण्यासाठी ..!! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे. छोटा तांब्या भांडं काय….. विचारु नका.. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीये . “

यांवर कुणाचे डोळे पाणावले. कुणी स्मित केले. नंतर मौन राहिलं. काकांचं गाव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मूर्ती हातात घेतली, म्हणाला, ” काका तुम्ही तिकीट काढा. तोपर्यंत धरतो मी..” काहीजण त्या मूर्तीकडे जवळून पहात राहिले. आता लोकांची नजरच बदलली….! सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले 

” दीड तिकिट द्या. एक हाफ आणि एक फुल “*

कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं, ” दीड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? “

काकांनी स्मित केलं, ” दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? “

हे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले..!

काका म्हणाले, “असे कोड्यात का पडलात बरे? त्याला नमस्कार केलात. त्याला आपला देव मानता.. व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मूर्ती याच भावाने भजतो; पूजतो.. अगदी पूजा केल्यावरही … पण त्याला एकाच प्रेमाची गरज .. आपल्या आलिंगनाची .. द्या दीड तिकिट..!” ..  हे बोलतांना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं दीड तिकीट दिलं..!

…. सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी. तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हात जोडले गेलेले ….. अगदी अनाहूतपणे …!!

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments