सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ एक कडवट सत्य… — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
एके काळी आम्ही लालबागला रहाणारे अणि मुंबईतील इतरही सर्व मंडळी अगदी सहकुटुंब रात्रभर फिरत लालबागचे गणपती पहायला जायचे….
चिंचपोकळी लेन, रंगारी बदक चाळ, तेजूकाया, गरमखाडा, गणेश गल्ली, मार्केटचा गणपती, नरेपार्क, लाल मैदान …. मार्केटच्या गणपतीला बाहेरच्या मैदानात जत्रा भरायची. मग हे माग, ते माग, हट्ट कर…. पेटीत पैसे टाका, चमत्कार बघा. कांबळी, फाटक, पेडणेकर यांची चलत् चित्र प्रदर्शने हे त्यावेळचं मुख्य आकर्षण असायचं.
मग बघता-बघता गणपतीचं मार्केटींग सुरु झालं. तो नवसाला पावू लागला, राजा झाला …. पेटी मोठी झाली, चमत्कार सुद्धा मोठे झाले. रांग वाढली, भाव वाढला, प्रसिद्धी वाढली, पैसा वाढला, आकर्षण वाढलं …. अगदी बाप्पांचा आकारही वाढला …. काळ बदलला, समजलच नाही, काळाच्या ओघात कांबळी, फाटक, पेडणेकर लुप्त झाले, त्यांची प्रदर्शने लुप्त झाली.
सगळं बदललं, पण भाविक बदलले नाहीत. आज कुणाला मार्केटचा गणपती दाखवायला जायचे म्हणजे मोठा विचार पडतो.
साधी रांग, नवसाची रांग, व्ही.आय.पी रांग …. पायाचं दर्शन, पडद्याचं दर्शन, जवळून दर्शन, दुरून दर्शन …. प्रत्येक दर्शनाचा भाव (भावना नव्हे) निराळा….
आम्हाला आजही आठवतं, कोणे एके काळी त्या बाप्पाची दुपारची आरती पण होत नसे, परिसरातली लहान मुले दुपारी शाळा सुटली की जायची आणि आरती करायची. आता बाजूला रहिवाशांनाही तिकडे जाता येत नाही ….
श्रद्धा तेवढीच राहीली, पण पेटी आणि किर्ती मोठी झाली. आम्हाला त्या देवाची आठवण येते, पण त्या देवाला आमचा चेहरा आठवत नाही का …. ?
नसेल कदाचीत, कारण आता “राजा” अंबानी, तेंडुलकर, बच्चन, फडणवीस आणि सेलिब्रिटीज मध्ये व्यस्त आहे, “VIP” झाला आहे बाप्पा ….
आता आम्ही लालबागकर तमाम गणपतींना घरच्या गणपतीत शोधतो …. आमची सर्व श्रद्धा घरच्या गणपतीच्या पायावर ठेवतो …. “राजा”ला इथूनच साष्टांग दंडवत. हात येथूनच जोडतो.
” देवा तुझ्या दारापुढे उभी मोटारींची रांग । पायी आलो दर्शनाला, आत कसा येऊ सांग ?
देवा तुझ्या दर्शनाला मंत्री आणि नेते येती । बंदुका रे आम्हावरी, त्यांचे रक्षक रोखती.
देवा तुझ्या दर्शनाला फळे मिठाईची दाटी । कुठे लपवावी सांग गूळ-खोबऱ्याची वाटी.
देवा तुझ्या मुकुटात सोने आणि लाख हिरे । माझ्या हातातले नाणे ओशाळून मागे फिरे.
देवा तुझ्या अंगावर रोज नवीन दागिना । समजेल का तुला, माझी उपाशी वेदना.
देवा तुझ्या पायाखाली आता चांदीची रे वीट । तुझ्या दर्शनासाठी फाडावे लागते तिकीट.
देवा तुझ्या मंदिराची वाट जुनी ही सोडतो । तुला ठेवतो हृदयी, हात येथूनच जोडतो …. !!
|| गणपती बाप्पा मोरया ||
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈