श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ शुभमंगल सावधान – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(मागील भागात आपण पहिले – रात्री सगळेजण डोक्याला हात लावून बसले होते. जवळजवळ १५ तोळे सोने, सहा लाख रुपये, अडीच लाख रुपये लग्नाचा खर्च. एवढ्याच राजूच्या आईला आपल्या दागिन्यांची आठवण झाली, काल रात्र घाई घाई तिने दागिने काढून डायनिंग टेबलावर ठेवले होते, ती टेबलावर जाऊन पाहू लागली पण ते दागिने पण नाहीसे झाले होते. आता इथून पुढे)
चार वर्षानंतर……
राजूच्या लग्नाच्या धक्क्यातून कुटुंब हळूहळू सावरत होते. राजूची आई भांबावली होती. आपल्या काळी सहज लग्न जमत होती. त्यावेळी मुलींना हुंडा द्यावा लागत होता. पंधरा-वीस वर्षात परिस्थिती किती बदलली? राजू लग्नाचे नाव घेत नव्हता ‘शुभमंगलं सावधान’ कुठे ऐकू आले तरी तो दचकत होता.
राजू ने बांबू लागवड केली, आंब्याची कलमे होतीच, नारळीची पण शंभर झाडे होती, तो आंबा कलमे करारावर घेत होता, टेम्पो भरून बेळगावच्या मार्केटात पाठवत होता. पैसे येत होते पण हे सर्व सांभाळायचे कोणी? असा प्रश्न राजूच्या आई-वडिलांना पडला होता.
मार्गशीर्ष महिना आला. राजूची आई गुरुवारचा उपास धरायची. लक्ष्मीचे व्रत करायची. एका गुरुवारी त्यांच्या दारात मोटरसायकल थांबली, तिने पाहिले, शेतकी मदतनीस माने गाडीवरून उतरत होते, त्यांच्या पाठीमागे एक २७- २८ वर्षाची युवती उतरत होती. माने या घरात नेहमी येणारे. या भागात येणे झाले की नेहमी राजूच्या घरी येणारे. माने घरात येता येतात ओरडून म्हणाले ” काय म्हातारे बरी आहेस ना?’
“होय बाबानू, खूप दिवसांनी इलात, ही कोण बरोबर?’.
म्हातारे माझी आता बदली झाली, नोकरीची दोन वर्ष शिल्लक राहिली, कोकणात इतकी वर्षे काढली आता जातो गावाकडे, ही तुमच्या भागातील नवीन शेती मदतनीस. पूजा साळवी हिचे नाव. खेडच्या बाजूची आहे. ती माझ्या जागेवर पंधरा दिवसांपूर्वी रुजू झाली. तिची ओळख करून द्यायला आलो. ‘
“बसा हो, पेज वाढतंय, ही बाई पेज घेतली मा?”
‘ हो ना घेते मी पेज, पण तुम्हाला उगाच त्रास….’
“त्रास कसलो गो, आमच्या बागेत दहा जण काम करतात, सगळ्यांका पेज करूचच आसता. येवा, आत येवा.’.
राजूची आई आत गेली, तिने दोन पातेल्यात पेज आणि कुळथाची पिठी आणून ठेवली. मानेने आणि पूजाने हात धुतले आणि पेज घ्यायला बसले. पेज घेतल्यानंतर माने म्हणाले ” चला बाई तुम्हाला राजूची आंब्याची बाग दाखवतो ‘. मानेंच्या गाडीवर बसून पूजा राजूच्या आंबा बागेकडे गेली. राजूच्या बागेत कलमांना लहान लहान फळ आली होती. त्यावर फवारणी सुरू होती. पूजाने एवढी व्यवस्थित बाग क्वचितच पाहिली होती. ४०० आंब्याच्या कलमानंतर पुढे ओढा होता. ओढ्याचे पाणी वाहत होते. पुढे ओढ्यावर बंधारा घातला होता. पाच चे दोन पंप लावले होते. त्या पंपाने नारळीच्या बागेत पाणी घेतले होते. त्याच्या पुढील दहा एकर वारकस जमिनीवर बांबू लावला होता. राजू पूजाला आणि मानेना सर्व बाग दाखवत होता. पूजा ने राजू ला विचारले ” ही कुठली बांबूची जात आहे?”
या दहा जातीचे बांबू लावले आहेत. मिक्स प्रकार केले आहेत.’
कोकणात ‘माणगा’ ही बांबूची जात जास्त फोफावते. इथले हवामान त्याला अनुकूल आहे. कुडाळ जवळ मिलिंद पाटील नावाचा आमच्याच कॉलेजचा विद्यार्थी आता बांबू लागवडी संबंधी माहिती देतो, माणगा ची रोपे पण मिळतात. मी तुम्हाला त्याचा नंबर देते, असं म्हणून तिने पर्स मधून मिलिंद चा फोन नंबर दिला.
“तुम्ही बांबू कोणाला देता? तुम्ही कुडाळ मध्ये “कॉर्नबॅक’ नामाची बांबूच्या वस्तू बनवणारी कंपनी आहे. त्यांचेकडे बांबूची रिक्वायरमेंट कायम असते.’ एवढ्यात राजूच्या आईचा फोन आला .”माने आणि पूजा दोघांना घरी जेवूक पाठव ‘म्हणून. माने आणि पूजा पुन्हा राजूच्या घरी आली. आईने त्यांना गरमागरम वरण भात, कैरीचे लोणचे, मुळ्याची भाजी वाढली. माने आणि पूजा व्यवस्थित जेवली. जेवता जेवता आईने पूजाला विचारले ” घरी कोण कोण असतं ग तुझ्या पूजा?’
पूजा गप्प झाली. मानेंनी आईला विचारू नका असा इशारा केला. आई गप्प झाली. जेवण झाल्यावर पूजाने आपले ताट उचलले तसेच मानेंचे पण ताट उचलले आणि मोरीत धुवायला गेली. “अगो, ठेव ती ताटं,’ म्हणेपर्यंत पूजाने दोन्ही ताटे विसळून ठेवली. राजूची आई बघतच राहिली.” हल्ली मुलींना संस्कार नाही असे म्हणतात, बघा ही संस्कारी मुलगी ‘ असं मनातल्या मनात म्हणत होत्या. जेवण झाल्यावर माने आणि पूजा गाडीवर बसून गेली. संध्याकाळ झाली. रात्र झाली तरी आईच्या डोळ्यासमोरची पूजा जाईना.
दुसऱ्या दिवशी मानेंचा आईला फोन आला ” म्हातारे, काल तू पूजाला घरी कोण कोण असतं म्हणून विचारत होतीस, तेव्हा मी तुला गप्प बसवलं तिला ते सांगणं अवघड होतं. आता मी तुला तिच्याबद्दल सांगतो ” पूजा ही खेड जवळची. घरी आई-वडील आणि एक लहान भाऊ. हिने दापोली कृषी विद्यापीठातून बीएससी एग्रीकल्चर केलं. पण तिला लगेच नोकरी मिळाली नाही. तिच्या वडिलांनी तिचे एका ग्रामसेवकांशी लग्न लावून दिले. तिचे सासू-सासरे आणि नवरा हिला माहेरून पैसे आणण्यासाठी छळू लागले. मारझोड करू लागले. एका वर्षातच हिला एक मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून परत जास्त छळ सुरू केला. सतत छळाला कंटाळून हिने स्त्रियांसाठी धडपडणाऱ्या संस्थेकडे तक्रार दिली. त्यांनी तिच्या घरच्यांना तंबी दिली. म्हणून सासरच्या मंडळींनी हिला जाळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या तावडीतून ही सुटली आणि मुलीसह माहेरी आली. त्या संघटनेने नंतर तिच्या नवऱ्याला आणि सासूला धडा शिकवलाच, तिच्या नवऱ्याची नोकरी पण गेली. दरम्यान पूजाला कृषी विभागात कृषी सहाय्यक म्हणून नोकरी मिळाली. एक वर्ष दापोलीत नोकरी केली आणि आता या भागात तिची बदली झाली. हिची चार वर्षाची मुलगी तिच्या आई-वडिलांकडे असते. म्हातारे, ही खरोखरच गुणी मुलगी आहे. आमच्या कृषी विभागात सर्वांची लाडकी आहे.’ असं म्हणून मानेने फोन खाली ठेवला.
राजूच्या आईला चुटपुट लागून राहिली. किती गुणी मुलगी आणि तिच्या घरच्यांनी हिची काय दशा करून ठेवली. रात्री राजूचे बाबा आणि राजू जेवायला बसले तेव्हा तिने त्यांना पूजाची कहाणी सांगितली. बाबांना पण ह्या चांगल्या मुलीची ही दशा बघून वाईट वाटले. असे नराधम अजून अस्तित्वात आहेत त्यांना खरे वाटेना.
पुढे दोन महिने झाले तरी पूजा त्या गावात आली नाही. आता राजूच्या बागेत आंब्याचा सिझन सुरू झाला होता. रोज पंधरा माणसे कामाला होती. त्यांचे चहापाणी, पेज, जेवण करून राजूची आई थकत होती. आपली सून असती तर तिने ही जबाबदारी घेतली असती, असे तिच्या मनात येई. अचानक एक दिवस स्कूटर वर बसून पूजा हजर झाली. पूजाला पाहताच आईना खूप आनंद झाला “अगो, होतंस खय इतके दिवस?’ आईने विचारले.
” दीड महिन्याचे ट्रेनिंग होतं दापोली कृषी विद्यापीठात, तिकडे अडकले होते. तुमची सर्वांची आठवण येत होती. पण त्यादिवशी घाईत कुणाचा फोन नंबर घेतला नाही ‘.
” बस बस, पेज घेतस मा?’.
” हो घेते, तुम्ही उठू नका, मी तुमचे स्वयंपाक घर त्या दिवशी पाहिले आहे.’ असं म्हणून पूजा चटकन आत गेली आणि तपेल्यातील पेज लहान भांड्यात ओतून घेतली. टेबलावर बरणीत लोणचं दिसत होतं, त्यातील दोन फोडी घेतल्या. पेज जेऊ लागली, आई तिच्या पाठोपाठ आत मध्ये आल्या होत्या. तिचं सराईतपणे घरात वावरणं त्यांना आनंद देत होतं. पेज जेवल्यानंतर पूजा म्हणाली ” आई मी बागेत जाते यंदा आंबे कसे आहेत बागेतले ते पाहून येते.’. स्कूटरवर बसून पूजा बागेत गेली. राजू घामाने डबडबला होता. आंबे उतरवणे सुरू होते. चार झाडावर चार जण आंबे काढण्यासाठी चढले होते. टोपलीतून खाली आंबे सोडत होते आणि मोठ्या टॅंक मध्ये आंबे ठेवत होते. एक पिकप गाडी आंब्याचे टॅंक घेऊन घरी जात होती. कितीतरी वेळ पूजा काम बघत होती. राजूचे तिच्याकडे लक्ष नव्हते. तो चार ठिकाणी धावत होता. काम करून घेत होता. एवढ्यात एका कामगाराचे पूजाकडे लक्ष गेले. त्याने राजूला पूजा आल्याचे दाखवले. राजू हसत हसत तिच्याजवळ आला ” केव्हा आलात?”
” आत्ता तुमच्या घरी पेज जेऊन आले, दीड महिना ट्रेनिंग होते दापोलीला, म्हणून इकडे येता आले नाही ‘.
“होय काय, मला वाटले आम्हाला विसरलात.’
” छे हो. कशी विसरेन. तुमच्यासारखे मेहनती बागायतदार कमी. आमच्या कृषी विभागाचे तुमच्यासारख्यांकडे लक्ष असतेच. यावर्षी कुठली खते वापरणार हे बोलायचे होते, पण तुम्ही कामात’.
” सध्या वेळच नाही, मी आणखी सहा बागा करारावर घेतल्या आहेत, त्याचे आंबे अजून काढायचे आहेत ‘
” मग हे आंबे पाठवता कोठे?’
” सध्या तरी बेळगाव मार्केट आणि कोल्हापूर मार्केट धरलय, रोज चार पिकप धावतात. रोजच्या रोज हिशेब मिळतो.’
” सातारा मार्केटचा पण प्रयत्न करा. कोल्हापूर पेक्षा साताऱ्यात जास्त दर मिळतो असे मी ऐकले आहे ‘.
एवढ्यात आईचा फोन, तू जेवायला ये आणि पूजाला पण जेवायला घेऊन ये. राजूने मोटरसायकल काढली पूजाने आपली स्कूटर काढली आणि दोघं घरी जेवायला आली. राजूचे बाबा घरी आलेलेच होते.
“तू मासे खातास काय गो पूजा, आईने विचारले.
“हो खाते ‘. पूजा आत गेली. तिने भराभर स्वयंपाकावर नजर टाकली. ताटे वाढायला घेतली. आई बघत राहिली. वाटीत बांगड्याचे तिखले, तळलेली कोलंबी, भात आणि सोलकढी. राजू चे बाबा आणि राजू जेवायला बसले. आई म्हणाली ” तू पण जेवायला बस ग पूजा ‘.
” नको आई आपण मग जेवू ‘. दोघं पुरुष जेवण जेवून बाहेर गेले तशी पूजाने चटकन ताटे उचलले. आणि दोन ताटे वाढायला घेतली. जेवता जेवता आई पूजाला म्हणाली ” मानेंनी फोनवर सांगितल्याने तुझ्याबद्दल, तुझ्या लग्नाबद्दल, घटस्फोटाबद्दल, तुझ्या मुलीबद्दल’. पूजाच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. आई तिच्या डोळ्याकडे बघत म्हणाली” पुस ते डोळे, स्त्रियांनी खंबीरच होहूक व्हया, असल्या माणसांका धडो शिकवकच व्हयो ‘.
पूजा गप्प झाली. “परत लग्नाचो काय विचार केलंस गो पूजा?’. पूजाने मान हलवली.
क्रमश: भाग-३
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर