श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 209
☆ भुरळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
प्रेम तुझे दे नितळ मला
त्यात स्थान दे अढळ मला
☆
पहात नाही ढुंकून तू
तरी तुझी का भुरळ मला ?
☆
तुझ्याचसाठी अमृत मी
समजतेस का गरळ मला ?
☆
पाण्यावरती वावरते
दे ओठांचे कमळ मला
☆
होय प्रीतिचा याचक मी
कधीतरी घे जवळ मला
☆
पान मसाला झालो मी
हवे तेवढे चघळ मला
☆
अशोक आहे दास तुझ्या
चंदन समजुन उगळ मला
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈