श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

☆ “अहेवाचा हेवा…” ☆ श्री संभाजी बबन गायके 

दरवर्षी न चुकता हे घडत जातं…डोळ्यांपुढे उभी राहतात ती सारी माणसं जी आपल्याआधी निघून गेली या जगातून. काही माझ्या आधी कैक वर्षे जन्माला आलेली होती म्हणून..  तर काहींना अवेळी बोलावणं आलं म्हणून….गुरुजी सुधांशुला एक एक नाव उच्चारायला लावून पाठोपाठ एका मंत्राचा पुनरुच्चार करीत त्याला त्याच्यापुढे ठेवलेल्या परातीत, हातावर घेतलेलं पाणी सोडायला सांगत होते तेव्हा ती ती माणसं नजरेसमोर दिसू लागली.

आज सासुबाईंचं नवमी श्राद्ध ! मामंजी आहेत अजून. खूप थकलेत म्हणून नातवाच्या हातून करून घेतात तर्पण….दरवर्षी अगदी आग्रहाने. सुधांशु आणि त्याची नोकरीवाली बायको कधी काचकूच करीत नाहीत. सुधांशु कितीही काम असले तरी किमान सकाळची अर्धा दिवसाची सुट्टी घेऊन येतोच घरी आणि सूनबाई रजा टाकतात. सुधांशु दुपारी बारा वाजता काकग्रास ठेवतो बंगल्याच्या भिंतीवर आणि दोन घास खाऊन माघारी जातो त्याच्या कामाला. द्वितीयेला ह्यांचं श्राद्ध असतं, त्यादिवशी तर तो सबंध दिवस सुट्टीच टाकतो….माझ्यासोबत रहाता यावं दिवसभर म्हणून. माझ्या आधी गेले हे. म्हणजे मी ह्यांच्या माघारी श्वास घेत राहिले…एकाच सरणावर जाण्याचं भाग्य माझ्यासारखीच्या कपाळी कुठून असायला?

चुलत जाऊबाई मात्र माझ्यापुढे गेल्या….सर्वच बाबतीत…. 

‘ अहेव मरण पिवळं सरण, भ्रताराआधी डाव जितला गोरीनं 

भ्रताराआधी मरण दे रे देवा, दीर खांदेकरी नणंदा करतील सेवा ।।’

ह्या ओळी जणू त्यांच्यासाठीच लिहिल्या होत्या कुणीतरी. सुधाकर भावोजी मोठ्या लढाईतून जगून वाचून परतले होते. पेन्शन बरीच होती पण ती खायला घरात तिसरं कोणी नाही. ह्यांची बहिण,वसुधा, तिला दिलेली होती दूर तिकडे खानदेशात. तिचं माहेरपण मात्र आमच्या दोन्ही घरांत होत असे निगुतीनं. सुधाकर भावोजी तिचे ह्यांच्यापेक्षा अंमळ जास्तच लाड करायचे. तसा आमच्यातही भावजय-नणंद असा भाव नव्हताच कधी. दिवस पाखरागत उडून गेले आणि जाऊबाईंनी अनाकलनीय दुखण्याने अंथरूण धरले ते कायमचेच. वसुधाताई जाऊबाईंच्या शेवटच्या दिवसात नेमक्या माहेरपणाला आल्या होत्या. त्यांची सेवा घडली त्यांच्या हातून. आणि ह्यांनी खांदा दिला शेवटी. 

अजूनही लख्ख़ स्मरतो तो दिवस. जाऊबाईंच्या पार्थिवाला नव्या नवरीचा शृंगार केला होता जमलेल्या आयाबायांनी. एवढा आजारी देह तो..  पण त्यादिवशी चेहरा इतका गोड दिसत होता…पण डोळे मिटलेले ! काठी टेकीत टेकीत तिला शेवटचं पहायला गावातल्या चार दोन वृद्धाही आल्या होत्या. नव्या पोरीही होत्या आसपासच्या. त्या भेदरलेल्या…काही म्हणत नव्हत्या फारसं काही. पण एक वृद्धा म्हणून गेली…’ पोरी हो…कपाळी हळदी-कुंकू लावा….अहेव मरण आलं काकींना…नशीब काढलं !’ असं म्हणत त्या म्हातारीने तिच्या सुरकत्या पडलेल्या हातांनी पार्थिवाला नमस्कार केला….तेव्हा माझा हात आपसूक माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्रावर पडला. माझं सौभाग्य…मी आणि आमचा सुधांशु ! किती दिवसांची असेल सोबत ही अशी? जीवनात सारेच क्षणभंगुरच  की. पण याचा विसर मात्र सहजी पडतो जीवाला…नाही?

काळ झपाझप पुढे निघाला..त्याला जणू कुठंतरी खूप दूर जायचं होतं स्वत:लाच ! तिस-याच वर्षी सासुबाईंनी इहलोकीची यात्रा समाप्त केली आणि आमचं घर तसं ओकंओकं झालं. आणि मामंजी अबोल. त्यांचा अगदी बालवयापासूनचा संसार होता. पण कितीही वय झालं तरी साथसंगत संपून जावी असं कुणाला वाटतं? सासुबाई काहीवेळा गंमतीनं म्हणायच्या…..तुमच्यानंतर जन्माली आलेली असले तरी जाताना तुमच्याआधीच जाईन ! यावर मामंजी त्यांना मनापासून रागवायचे आणि मग त्यांच्याकडे पहात रहायचे..चष्म्याच्या भिंगांतून. त्यांची ती नजर, सासुबाईंच्या नजरेतील ते ओलेपण मनात रुतून बसले ! आणि दोनेक वर्षांत सासूबाईंनी डाव जितला ! त्यानंतरच्या पितृपक्षापासून नवमी माझ्या घरीआली. ’अहेवनवमी.’  ‘अविधवा नवमी’ही म्हणतात असं ऐकलं होतं कधीतरी. पहिल्या वर्षी तर कित्येक पानं उठली होती वाड्यात. इतका मान असतो भ्रताराआधी जाणा-या बाईला?

माझ्या चेह-यावरील पूर्णाकृती प्रश्नचिन्ह बघून हे म्हणायचे, “ अगं,वेडे ! जुना काळ तो. चूल आणि मूल नव्हे मुलं हेच विश्व असायचं तुम्हां बायकांचं. पुरुषावर अवलंबून रहायचं स्त्रियांनी सर्वच बाबतीत. माहेर कितीही लाखाचं असलं तरी ते घर फक्त साडी-चोळीपुरतं. कारण तिथं नव्या कारभारणी आरूढ झालेल्या असतच. त्यामुळे नव-याची सुख-दु:खं तीच त्यांचीही होऊन जायची. आणि हा आधार निखळून पडल्यावर बाई गतभ्रर्तृक होई. तिचं भरण-पोषण करणारा, तिची बाजू घेणारा तिचा भ्रतार जगातून नाहीसा झाल्यावर तिचं ओझं कोण वागवणार?.. असा कोता विचार करायची माणसं त्यावेळी. घराबाहेर पडून स्वत:चं आणि पोरंबाळं असल्यास त्यांचं पोट भरण्याचं धारिष्ट्य आणि सोय सुद्धा नव्हती आतासारखी. या सर्वांतून सुटकेचा जवळचा मार्ग म्हणजे पालनकर्त्याच्या आधी जगाला राम राम ठोकणे. पुरुषांचं राहू दे….तिच्यासारख्या इतर बायकांना तिचा हेवा वाटणं किती साहजिक?”

ह्यांनी कितीही समजावून सांगितलं तरी माझ्या मनातल्या एका कोप-यात अहेवपणाचं वेड हळव्या बाईपणाचं लुगडं नेसून घुसून बसलं ते बसलंच. हे आजारी पडले तेव्हा तर मन अगदी धास्तावून गेलं होतं. डोळ्यांत तेल घालून उशाशी बसून रहायचे मी कित्येक रात्री. रामरायाच्या कृपेने यांना आराम पडला आणि मी निर्धास्त झाले. सुधांशु मोठा झाला, शिकला, पोटापाण्याला लागला. शिकली-सवरलेली सून आली. आता माझे दोन दोन पालनकर्ते होते घरात…एक हे आणि दुसरा सुधांशु. आम्हा दोघांच्याही वयांनी उंबरठे ओलांडले आणि इस्पितळांचे चढले. माझी तब्येत तशी तोळामासाच म्हणा प्रथमपासून. हे मात्र स्वत:ची योग्य ती काळजी घेत. लहानपणी गरीबीमुळे खाण्या-पिण्याची आबाळ झालेली होती. पण जरा बरे दिवस पाहिल्यावर शरीरानं उभारी धरली होती यांच्या. जाण्यासारखे नव्हते हो इतक्यात…पण गेले … .. … माझ्याआधी..मला हरवून. सुधांशु म्हणाला होता…..”आई, बाबांच्यानंतर मला तुझ्याच तर प्रेमाचा आधार आहे…तू अशी खचून जाऊ नकोस !”  मग मात्र मी स्वत:ला फार त्या विचारांत गुंतवू दिलं नाही. पण दरवर्षी द्वितीया आणि नवमी यायची आणि माझ्या थकत चाललेल्या चेह-याच्या नकाशात निराशेचं बेट अगदी ठळक दिसू लागायचं…समुद्रातून अचानक वरती आलेल्या बेटासारखं…!

आज सासुबाईंची ‘अविधवानवमी’ . कालपासून तयारी सुरू होती. गुरुजी तर दरवर्षी नेमानं येणारे. त्यांना आठवण करून द्यावी लागत नाही…उलट तेच निरोप देतात…येतो म्हणून. पण मला बरंच वाटत नव्हतं गेल्या काही दिवसांपासून…खूप थकवा जाणवत होता. गुरूजी आले….घर त्या मंत्रांनी भरून आणि भारावून गेलं. माहेरकडची, सासरकडची सारी माणसं..  त्यांच्या प्रत्येकाच्या नावांच्या उल्लेखानं जणू जिवंत होऊन एका रांगेत येऊन बसली पंगतीला….सासुबाई, जाऊबाईही होत्या…कपाळी कुंकू लेवून. पण मला त्यांना कुंकू लावायची परवानगी नव्हती…मी कुठं अहेव होते?

टळटळीत दुपार झाली. सूर्य डोक्यावर आला. नैवेद्य..ज्याचे त्याला ठेवले गेले. सुधांशुने,सूनबाईने सासूबाईंच्या तसबीरीपुढे डोके टेकवले…मामंजी त्यांच्या खोलीतल्या बिछान्यावर जरासे उठून बसले…थरथरत्या हातांनी नमस्कार करीत.

सुधांशुने माझ्या हाताला धरून मला उठवलं…आई….वहा हळदीकुंकू आजीच्या तसबीरीवर ! मी चमकून त्याच्याकडे पाहिलं….तो म्हणाला…”अगं पालन-पोषण करणारा फक्त नवराच असतो का…मुलगा नसतो का आईचा पालनकर्ता…आधारस्तंभ? बाबा नसले म्हणून काय झालं? तू मागे राहिली नसतीस तर मला कोण असलं असतं. आता मी आहे की….तुला शेवटपर्यंत.”

माझ्या डोळ्यांना धारा लागलेल्या…भिंतीवरच्या ह्यांच्या तसबिरीकडे पहात राहिले. सूनबाईंनी माझा एक हात हाती घेतला. मी ह्यांच्या तसबीरीच्या काचेत पाहिलं…सुधांशु मागे उभा होता…..आणि तसबीरीतील ह्यांच्या डोळ्यांतही आज चमक दिसत होती ! सर्व कर्तव्ये व्यवस्थित पार पाडून, नव-यामागे त्याच्या आईवडिलांची सासु-सासऱ्यांची मुलाप्रमाणेच सेवा करण्याचं भाग्य लाभलेल्या माझा.. हो ..  माझा मलाच हेवा वाटू लागला होता ! अहेवनवमीही मंद स्मित करीत पुढे सरकत होती…आणि आज मला तिचा हेवा वाटत नव्हता !

(अशीच एक आई आणि तिचा मुलगा आठवला…ह्या पितृपक्षात. या घटनेला बराच कालावधी उलटून गेला आहे तरी स्पष्ट आठवली दोघं. कालानुसार बदललं पाहिजे सर्वांनी. आठवलं तसं लिहिलं…काही कालक्रम इकडचा तिकडे झाला असेलही. पण असे सुधांशु आहेत म्हणून ही नवमी ‘अहेव’ आहे, असे म्हटल्याशिवाय राहावत नाही.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments