श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ शुभमंगल सावधान – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – जेवता जेवता आई पूजाला म्हणाली “मानेंनी फोनवर सांगितल्याने तुझ्याबद्दल, तुझ्या लग्नाबद्दल, घटस्फोटाबद्दल, तुझ्या मुलीबद्दल’. पूजाच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. आई तिच्या डोळ्याकडे बघत म्हणाली ” पुस ते डोळे, स्त्रियांनी खंबीरच होहूक व्हया, असल्या माणसांका धडो शिकवकच व्हयो ‘. पूजा गप्प झाली. “परत लग्नाचो काय विचार केलंस गो पूजा?’. पूजाने मान हलवली. आता इथून पुढे )
“माझी सून होऊन या घरात येशीत?”
पूजाला एकदम ठसका लागला. तिच्या तोंडाला पाण्याचा ग्लास लावून आई म्हणाली “माझो राजू पण तडफडता, शेतकऱ्याक कोण मुली देऊक तयार नाय, सगळ्यांका सरकारी नोकरीं व्हयी, माझ्या भावानं सुद्धा नाय म्हणून सांगितल्यानं. म्हणून नाईलाजाने एका एजन्ट मार्फत कारवारच्या मुली बरोब्बर लग्न ठरवलं आणि आईने केलेलं लग्न आणि झालेली फसगत सांगितली.” पैसे, दागिने गेले ते मिळवता येतीत पण गेलेली अब्रू कशी येतली?’, अस म्हणून आई रडू लागली. पूजा उभी राहिली आणि आपल्या ओढणीने तिने त्यांचे अश्रू पुसले.
जाता जाता तिने ” आई-वडिलांना विचारून सांगते ‘ असं म्हणत पूजाने भांडी आणि ओटा आवडला आणि ती गाडी स्टार्ट करून निघून गेली.
चार दिवसांनी पूजा चा फोन आला ” माझे आई बाबा तुम्हाला भेटायला येत आहेत ‘म्हणून. दुसऱ्याच दिवशी पूजाचे आई बाबा, चार वर्षाची मुलगी आणि पूजा आली. पूजाचे आई-बाबा म्हणजे राजूच्या आई-बाबांसारखीच साधी माणसं होती. त्यांनी राजूला पाहिले, राजूची आंब्याची बाग पाहिली, पूजाची छोटी मुलगी एवढं मोठं घर, गाई म्हशी, आंब्याचे ढीग, झाडांना लगडलेले फणस बघून भलतीच खुश झाली. राजूला पूजा आवडली होतीच.
वेळ न घालवता चार दिवसांनी राजू आणि पूजाचे लग्न झाले. “शुभमंगल सावधान ‘ म्हणताना राजू एकदम नर्वस झाला, अंतरपाटामागे पूजा आहे हे दिसतात तो निर्धास्त झाला.
वाचक हो, आपल्या कथेचा नायक राजू याला पूजासारखी पत्नी मिळाली, घरात छोट्या मुलीचा चिवचिवाट सुरू झाला. घराला घरपण आले. पूजाने नोकरी सोडली पण चाफ्याची नर्सरी सुरू केली. या नर्सरीत सर्व प्रकारची चाफ्याची कलमे मिळू लागली. दोन वर्षात या नर्सरीची बातमी सर्व दूर पोहोचली. मृग नक्षत्राच्या वेळी चाफ्यांसाठी गाड्या लागू लागल्या. राजने पिंगुळीतून मिलिंद पाटील यांच्या नर्सरीतून “माणगा ‘ या जातीचे बांबू लावले आणि बांबूचे मोठे पीक घेऊ लागला.
ज्या मुलींनी राजूबरोबर लग्न करायला नकार दिला त्या मुली सध्या मुंबईमध्ये दहा बाय दहाच्या खुराड्यात रखडत आहेत. नवऱ्याला धड नोकरी नाही,, धड घर नाही, पदरी दोन-तीन मुले. राजूच्या मामाची मुलगी एका टेम्पोड्रायव्हर बरोबर पळून गेली. मामी आता तिची आठवण काढून डोक्याला हात लावून बसली आहे.
पण आपल्या कथेचा नायक राजू सुखात आहे. एकदा शुभ मंगल झाल्यावर तो पुरता खचला होता. पण राजूच्या आईच्या लक्ष्मीपूजेच्या दिवशी पहिल्यांदाच त्यांच्या घरात आलेली “पूजा ‘ त्यांची लक्ष्मीच ठरली. आणि हो, तुम्हाला एक सांगायचंच राहिलं, राजू पूजा यांच्या वेलीवर एक फूलफुलणार आहे, तेव्हा तुम्ही बारशाला येणार ना?
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर