सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘भाषांतरदिन…’ – अज्ञात ☆ सौ. गौरी गाडेकर

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून भारतातून फारसी भाषेचं महत्त्व कमी होत गेलं. पण त्यापूर्वीच भारतातील असंख्य ग्रंथांची भाषांतरं फारसीत झालेली होती. हीच भाषा होती जिच्यामुळे भारतीय भाषेतल्या साहित्याची मौलिकता पाश्चिमात्त्यांना कळली. ‘सिरीं-ए-अकबर’ या नावानं दारा शिकोहनं पासष्ट उपनिषदांचं फारसीत भाषांतर केलं होतं. त्याच्या प्रस्तावनेत तो म्हणतो, ” ही उपनिषदं म्हणजे अद्वैताची भांडारं होत. मी त्यात काहीही फेरबदल न करता शब्दशः भाषांतर केलं आहे.” 

‘सिरीं ए अकबर’ एका फ्रेंच प्रवाश्याच्या हातात पडलं. त्याचं नाव होतं आंकतिल द्युपेरां. त्यानं ते फ्रेंचमध्ये आणि लॅटिनमध्ये केलं. ते आर्थर शॉपेनहॉअरसारख्या लेखकाच्या हातात पडल्यावर तो आनंदानं वेडा झाला. 

दारा शिकोहनं बरीच पुस्तकं लिहिली. सूफी आणि हिंदू तत्त्वज्ञानातील सामायिकतेचा तो शोध होता. त्यानंच योगवसिष्ठ आणि प्रबोधचंद्रिकेचं भाषांतर केलं. तसेच भगवतगीतेचं भाषांतर ‘मज्मुअल बहरैन’ या नावानं केलं होतं. 

अकबरानं तर भाषांतरासाठी खातंच सुरु केलं होतं. त्याच्या काळात रामायणाची बरीच भाषांतरं झाली. अब्दुल कादर बदायुनी आणि नकीबखाननं केलेल्या भाषांतरांत चक्क मध्यपूर्वेतल्या दंतकथा आणि संदर्भही आले होते. ही भाषांतरं म्हणजे मूळ संहितेची पुनर्कथनं होती. याच काळात मुल्ला मसीह कैरानवीनं स्वतंत्रपणे रामायणाचं भाषांतर केलं. मुल्ला शेरी आणि नकीबखाननं महाभारताचं ‘रज्मनामा’ या शीर्षकानं भाषांतर केलं. ते जयपूरच्या संग्रहालयात पाहता येतं. बदायुनीनंनं सिंहासनबत्तिशी ‘नामां-ए-खिरद अफ़जा’ या नावानं फारसीत नेलं (१५७५). मुल्ला शेरीनं हरिवंशाचंही भाषांतर केलं होतं. बदायुनी, हाजी इब्राहिम आणि फैजी या तिघांनी मिळून अथर्ववेदाचं भाषांतर १५७६ साली केलं होतं. सगळ्यात रोचक म्हणजे यातला फैजी हा सर्जक कवी होता. त्याला नलदमयंती आख्यान अतिशय आवडलं होतं. सोळाव्या शतकाच्या अखेरीला (१५९५) त्यानं ते ‘नलदमयंती’ या नावानं भाषांतरित केलं. 

दक्षिणेत गोवळकोंड्याचा अकबरशहा (१६७२-८७) हा साहित्यप्रेमी होता. (तो गुलबर्ग्याचे संत बंदेनवाज गेसूदराज यांचा वंशज). त्याला तेलुगू, हिंदी, संस्कृत, पर्शिअन, दखनी या भाषा येत. त्यानं ‘शृंगारमंजिरी’ हा ग्रंथ लिहिला. त्यासाठी त्यानं रसमंजिरी, आमोद, परिमल, शृंगारतिलक, रसिकप्रिय, रसार्णव, प्रतापरुदीय, सुंदरशृंगार, दशरूपक या हिंदी-संस्कृत ग्रंथांचा आधार घेतला होता. मूळ ग्रंथ तेलुगूत लिहून त्यानं तो संस्कृतमध्ये नेला. त्याची प्रत तंजावरच्या म्युझियममध्ये पाहता येते. 

भारतात सोळाव्या-सतराव्या शतकांत हजारो फारसी ग्रंथ लिहिले गेले. त्यातल्या काही बखरी आहेत, राज्यकारभाराचे वृत्तांत आहेत. बादशहांची चरित्रं आहेत. प्रवासवर्णनं आहेत. पर्यावरण, औषधीविज्ञान, इतिहास, दास्तां असा त्यांचा विस्तार आहे. 

त्या सगळ्या भाषांतरकर्त्यांचंही आजच्या दिवशी स्मरण….. 

.

शहाजहान आणि दाराशिकोहचं रेम्ब्रांनं केलेलं ड्रॉईंग खाली दिलेले आहे. 

 सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments