श्री सतीश मोघे
मनमंजुषेतून
☆ कुक्कुट ध्यानम् !… ☆ श्री सतीश मोघे ☆
मागच्या आठवड्यात एका मित्राच्या शेतातल्या घरी मुक्कामाला गेलो होतो. दुपारी १२ वाजता तिथे पोहोचलो. टुमदार कौलारू घर, आजूबाजूला भात शेती.आंबा, आवळा, पिंपळ अशी वृक्षांची मांदियाळी. हे सर्व पहाता पहाता नजर स्थिरावली ती त्याच्या घराच्या अंगणातच असलेल्या एका झाडावर आणि त्याला टेकून उभ्या केलेल्या शिडीवर.
रानातलेच झाड ते. जमिनीपासून आठ फूट उंच आणि तिथून वर फांदयांना सुरुवात. फांदया आणि पाने एवढी दाट की आत कुणी पक्षी असला तरी दिसणार नाही. या झाडाला टेकूनच एक शिडी ठेवली होती. त्या शिडीला प्रत्येकी दोन फुटांवर एक पायरी. शिडी एवढी भक्कमही नव्हती की त्यावरून माणूस चढेल. रानातल्याच वाळलेल्या काटक्यांपासून बनविलेली. मित्राला विचारले, ‘ही शिडी कुणासाठी रे?’ तो हसला. म्हणाला, ‘ संध्याकाळ होऊ दे, मग समजेल ‘.
संध्याकाळ झाली. अंधाराचे राज्य सुरू झाले. तसे मित्रासमोर तीन कोंबड्या, एक कोंबडा आणि चार छोटी पिल्ले येऊन उभी राहिली. त्याने पिल्ले उचलली. एका खोलीत मोठ्या टोपल्याखाली झाकली. त्यावर वजन ठेवले. कोंबड्या हे दुरुन पहात होत्या. पिलांची सोय झाली आहे,याची खात्री पटताच एकेक कोंबडी आणि तो कोंबडा क्रमाक्रमाने त्या शिडीवर उड्या मारत मारत झाडावर पोहोचले.
“ आता खाली कधी उतरणार? “ माझा प्रश्न.
“ सकाळी उजाडल्यावरच. रात्रभर त्या झाडावरच झोपणार “ , मित्राचे उत्तर.
थोड्या वेळाने झाडाखाली जाऊन मी पाहिले, तर खोडाला फांदी जिथे जोडली जाते, तिथे त्या डोळे मिटून पायावर बसून विश्रांती घेत होत्या. गावातले भटके कुत्रे आणि रानातले मुंगूस यापासून त्यांना जीवाला धोका. मग त्यांनीच ही सुरक्षित जागा शोधली. रोज प्रयत्न करून त्या छतावर, तिथून झेप घेऊन झाडावर जायच्या. मग मित्रानेच ही शिडी ठेवून त्यांचा मार्ग सुकर केला. आता रोज रात्री त्या झाडावर जातात. ध्यानस्थ होऊन विश्रांती घेतात. उजाडल्यावर खाली येतात. पहाटेची बांगही झाडावरूनच…. मित्राने ही माहिती पुरविली.
हे ‘ कुक्कुट ध्यान ‘ मनात घर करून राहिले. पिलांची काळजी नाही.. ती घ्यायला मालक सक्षम आहे, याची खात्री. उद्याची चिंता नाही. शत्रूपासून सुरक्षित ठिकाण शोधायचं. तिथे ध्यानाची ‘खोड’ लावून घ्यायची की फांदीवरचा तोल समन्वयाने आपोआप राखला जातो. जीवाला स्वस्थता आणि विश्रांतीही.
सहज मनात आलं, आपणही राग, लोभ, मोह, हे आतले शत्रू आणि स्पर्धा, असूया, मत्सर हे बाहेरचे शत्रू यांच्यापासून दूर, सुरक्षित ठिकाण शोधून तिथे निश्चिंतपणे, असेच ‘कुक्कुट ध्यान’, रात्रभर नको …पण दिवसातून थोडा वेळा तरी केलेच पाहिजे. या ध्यानातून मिळणारी स्वस्थता ही ऊर्जा प्रदान करणारी असेल. आत उजेड निर्माण करणारी असेल. उजाडताच पुन्हा नव्या ऊर्जेने उगवलेल्या दिवसाला सामोरी नेणारी असेल. हेच आपले एका दिवसाचे ‘ उजेडी राहिले उजेड होऊन ‘, असे होणे… असे रोज व्हावेसे वाटत असेल तर रोज हे ‘कुक्कुट ध्यानम्’…..
© श्री सतीश मोघे
मो – +91 9167558555
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈