सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुस्तकावर बोलू काही
☆ कैवल्य लेणं… सुश्री लीला गोळे ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
पुस्तक परिचय
पुस्तकाचे नाव – कैवल्य लेणं
लेखिका – लीला गोळे
किंमत -२५० रूपये
प्रकाशक -स्नेहल प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे.
आद्य शंकराचार्यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारी ही कादंबरी आहे .दक्षिणेतील कालाटी या ठिकाणी शंकराचार्यांचा जन्म झाला. पूर्णा नदीच्या काठी असणारे हे छोटेसे गाव होते. काहींच्या मते तो काळ इसवीसन पूर्व आहे तर काहींच्या मते तो इसवी सन 812 आहे. ‘ परंतु जन्मतिथी बद्दल वाद घालण्यापेक्षा शंकराचार्यांनी सनातन वैदिक धर्मातील केलेले कार्य महत्त्वाचे आहे.’ असे लेखिका म्हणते. सनातन हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी शंकराचार्यांनी अफाट श्रम घेतले. या कादंबरीत त्यांनी केलेला प्रवास, आचार्यांची स्तोत्र, त्यांचे मराठी अर्थ उद्धृत केलेले आहेत.
प्रासादिक संतवाड्मयीन चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिण्यात लीला गोळे या अग्रस्थानी आहेत. त्यांचे लिखाण प्रवाही आहे आणि त्यांनी शंकराचार्य यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य स्थान देऊ केलेले आहे.
शंकराचार्य यांचा जीवन प्रवाह उलगडताना कालाटीच्या निसर्गाचे वर्णन मनोहारी आहे. त्यांचे वडील बालपणीच गेले. पण त्यांच्या आईने त्यांना खंबीरपणे पण प्रेमाने वाढवले. त्यांची आईवर खूप निष्ठा होती. शंकराचार्यांची कुशाग्र बुध्दी लहान वयातच दिसून आली. त्यांना ज्ञानप्राप्तीसाठी घराबाहेर पडायचे होते,
पण आईचा त्यांना विरोध होता. या सर्व गोष्टी चांगल्या रंगवल्या आहेत. एक दिवस लहानग्या शंकरने मनाशी निश्चय केला की काहीतरी करून आपण इथून बाहेर पडायचे.
एकदा ते नेहमीप्रमाणे पूर्णा नदीवर आंघोळीला गेले होते. त्या नदीत काही मगरीही होत्या. त्यांनी मगरीने पाय पकडला अशी ओरड केली. सगळे घाबरून त्यांच्या आईला घेऊन नदीवर आले. तेव्हा ‘ तू जर मला ज्ञानार्जनासाठी बाहेर पडू दिलेस तरच ही मगर माझा पाय सोडेल ‘,असे सांगितले. आईने आपल्या मुलाला मगरीने सोडावे म्हणून ‘ तुला मी जाऊ देईन ‘असे मान्य केले.आणि मगच शंकर पाण्याबाहेर आले. आईचा आशीर्वाद घेऊन ज्ञानाच्या शोधार्थ शंकर घराबाहेर पडतो आणि मोठ्या युक्तीने ‘ तू मला संन्यास घेण्याची परवानगी दे ‘ ही गोष्ट आईला सांगतो.
पुढे धर्मयात्रेच्या निमित्ताने त्यांनी देशभरात प्रवास करण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांचा एक मित्र त्यांच्या बरोबर होता, पण शंकरने त्याला तू माझ्याबरोबर नको येऊस, माझा मार्ग खडतर आहे, असे सांगून दूर केले. ते ओंकारेश्वरापर्यत गेले. तिथे त्यांना एक साधू भेटले. त्यांनी त्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन केले.
या सर्व प्रवासात शंकराचार्य भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करत होते.
त्या काळात आपला वैदिक धर्म रूढीवादी कर्मकांड व नास्तिकवादी जडवादाच्या गर्तेत सापडला होता.
बौद्ध धर्माचा निष्क्रिय वाद सगळीकडे बोकाळला होता. कर्म करण्यापेक्षा निष्क्रियतेने कफनी घालून फिरणे, स्त्रियांना ही धर्मासाठी भिक्षुणि करणे आणि त्यातूनच काही वाईट गोष्टी घडत होत्या हे त्यांनी पाहिले. त्यामुळे शंकराचार्यांनी पहिली गोष्ट काय केली तर हिंदू धर्माचा प्रसार अधिक प्रमाणावर सुरू केला. आणि बौद्ध धर्माचा स्वीकार लोकांनी करू नये यासाठी प्रयत्न केला. वेगवेगळ्या क्षेत्री जाऊन तेथील
धर्माविषयी वादविवाद आणि चर्चा सुरू केल्या. धर्म जागृतीचे महत्वाचे काम शंकराचार्यांनी सुरू केले.हिंदू धर्माचे मूलभूत तत्वज्ञान सांगण्यास सुरुवात केली. संपूर्ण देशभ्रमण करत असताना त्यांचा जुना मित्र ही त्यांना येऊन मिळाला. देशात ही जागृती करण्यासाठी देशाच्या चारही बाजूंना हिंदू शक्तिपीठे स्थापण्याचा निर्णय त्यांनी घेतला, आणि चारही दिशांना चार शक्तीपीठ स्थापन केली…. द्वारका, जगन्नाथ पुरी, कालाडी, काश्मीर, आणि काशी…. हिंदू धर्माची पताका खांद्यावर घेऊन संपूर्ण देशात जागृती निर्माण केली. या प्रत्येक ठिकाणी मठपती नेमले. ह्या मठपतीनी कसे वागावे ह्याबाबत आचार संहिता तयार केली. या मठपतींच्या हाताखाली काही स्थानिक लोकांची नेमणूक केली, ज्यायोगे तेथील काम अधिक चांगले होईल. त्यामुळे हिंदू धर्माचा लौकिक दूरवर पसरण्यास मदत झाली…… लेखिकेने हा सर्व तपशील या कादंबरीत खूप छान प्रकारे आणि ओघवत्या भाषेत सांगितला आहे.
शंकराचार्यांचे आईवर अपरंपार प्रेम होते. त्यांनी तिला शब्द दिला होता की तुझ्या अंत्यक्षणी मी नक्की परत येईन. त्याप्रमाणे ते परत आले होते . त्यांची लहानपणापासूनची शेजारी आणि भक्त असलेली गौरम्मा हिने शेवटपर्यंत आईची सेवा केली. आणि संन्यस्त बनून तेथे राहिली.
शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी केलेले कार्य अफाट आहे. त्यांनी अनेक स्तोत्रे, श्लोक लिहिले. ज्ञान, कर्म आणि भक्तीचा समन्वय साधला. भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय शंकराचार्यांकडे जाते.
आपले जीवित कार्य संपल्यावर हे कैवल्याचे लेणे कैवल्याशी एकरूप झाले !
या कादंबरीची भाषा फार ओघवती, प्रासादिक आहे.. कादंबरी खूप छान आणि नवीन माहिती देणारी आहे.
मला कादंबरी वाचनीय वाटली … सर्वांनी अवश्य वाचावी अशी !
परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
वारजे, पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈