सुश्री मंजिरी येडूरकर
विविधा
☆ शाश्वत की अशाश्वत!!! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
पहाटेच्या हळूवार स्पर्शानं सकाळ जागी झाली होती. सूर्य किरणांची लगबग संपून ते स्थिरावले होते. कुठं धुणं धुतल्याचे आवाज तर कुठे भांडयांचा खणखणाट ऐकू येत होता. कुठे ‘‘ दिपे, पाणी काढलंय आंघोळीला जा,’’ अशा हाका, कुणी दोन्ही खांद्यावर पदर घेऊन हातात किटली घेऊन दूध आणायला चाललं होतं. कुणी लगबगीनं नोकरीचं ठिकाण गाठायला निघालं होतं.
सगळं कसं रोजच्या सारखं चाललं होतं. कुठे कुणी अडखळत नव्हतं कि चाचरत नव्हतं. जणू काल काही घडलचं नव्हतं. कालचा दिवस यांच्या आयुष्यात उगवलाच नव्हता. सगळे जगतायत. कां? प्रत्येकाकडं कारण आहे, जगण्याचं! स्वतःसाठी, स्वतः निर्माण केलेलं! कुणाला खूप मोठं व्हायचयं, कुणाला खूप पैसा मिळवायचाय, कुणाला छान संसार थाटायचाय, कुणाला मुलांना मोठ्ठ करायचंय, कुणाला मुलांची लग्न करायचीत, कुणाला नातवंडं पहायचीत, तर कुणाला त्यांची लग्नं….सारं न संपणारं! सा-या मनाच्या समजुती. अन् असं मनाला पटण्याजोगं कारण नसेल ना तर “आत्महत्या करणं म्हणजे भ्याडपणा आहे. संकटांना निधडया छातीनं सामोरं जायला हवं, जीवनाचा क्षण न् क्षण वेचला पाहिजे. त्यातून आनंद मिळवला पाहिजे.” असं अगदी राणी लक्ष्मीचा आव आणून सांगतील. पुळचट! स्वतः पुळचट असतात. आत्महत्या करण्याचं धाडस नसतं आणि ते दाखविणा-याला भ्याड म्हणतात.
पण खरंच! आयुष्यात कांहीतरी करून दाखविण्याची धमक असणारे किती निघणार? हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगे! बाकी सगळे सामान्य अतिसामान्य! संसाराच्या चौकटीत रमणारे. मग सगळेच जर तसे धाडसी असते तर काय झालं असतं? सगळा समाज विस्कळीत झाला असता. त्यांना एकत्र बांधणारा कांही दुवाच राहीला नसता. कुठे कांही लागेबांधेच राहिले नसते. कुठं कुणासाठी अश्रुच वाहिले नसते. सगळं कसं अशाश्वत झालं असतं.
अशाश्वत? अशाश्वत झालं असतं, म्हणजे आता सगळं शाश्वत आहे? आहे तर काय! सगळं शाश्वत आहे. म्हणून तर कुणी उद्यासाठी घर बांधतय, कुणी पैसा साठवतंय, कुणी दागिने करतंय. प्रत्येकजण उद्यासाठी जगतोय. उद्याच्या स्वप्नांसाठी! स्वप्नांच्या पूर्ततेचा आनंद लुटण्यासाठी! पण खरंच जर सगळं अगदी अशाश्वत असतं नां, तर एक मात्र चांगलं झालं असतं. प्रत्येकजण वर्तमानातला प्रत्येक क्षण न् क्षण जगला असता अगदी अधाशासारखा! स्वच्छ, पारदर्शक, निर्भेळ, निरपेक्ष जगला असता. या शाश्वतामुळं जगण्यावरच मळभ साठलंय. कुणी जगत नाहीय, आपोआप जगले जातायत. कुजणारं स्वत्व आणि त्यावर वाढणा-या स्वार्थाच्या आळयांच्या बुजबुजाटात !
अशाश्वताने आपलं अस्तित्व दाखविण्यासाठीच कालचा नंगा नाच केला असावा. शाळेला म्हणून घराबाहेर पडलेली मुलं परतलीच नाहीत. त्यांचे आई बाप हा नियतीचा क्रूर खेळ पहात बसलेत. अशाश्वताच्या विळख्यानं गुदमरत! आपल्या आसपास मात्र सगळं शाश्वत आहे. जणू, काल टी.व्ही. वर दाखवलेला मुलांच्या पालकांचा आक्रोश यांच्या कानापर्यंत पोचलाच नाही. सगळयांची उद्याची आखणी, उद्याची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
मगं खरं काय आहे? शाश्वत की अशाश्वत? कां अशाश्वताच्या धुक्यातून चाचपडत वाट काढू पहाणारं, पैलतीराचं मृगजळ दाखवणारं शाश्वत! कि शाश्वतावर आरूढ होवून त्याला हवं तसं दौडू देणारं पण लगाम मात्र आपल्या हातात ठेवणारं अशाश्वत!
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈