श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (पाचवी माळ) – पंगत ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

लग्नाच्या पंगतीत आज तिने केटरींगवाल्याच्या मागे लागून मसालेभात वाढण्याचं काम मिळवलं. एरव्ही कायम आचाऱ्यासमोर बसून भाज्या चिरून देण्याच्या, काकड्या खिसून देण्याच्या, पु-या लाटून देण्याच्या कामाला ती वैतागली होती. पंगतीत सुंदर सुंदर साड्या, दागदागिने घालून बसलेल्या आणि झकपक मेकअप करून बसलेल्या बायका -मुली तिला बघायच्या होत्या. झालंच तर नवरा-नवरीचं ताट वाढायला मिळालं तर चार दहा रुपये बक्षिसीही पदरात पडण्याची शक्यता होतीच. शिवाय वाढप्यांसाठी असणारा बऱ्यापैकी नीटनेटका ड्रेस घालण्याची संधी तर होतीच होती.

आचा-याच्या हाताखाली अल्पवयीन मुलांना काम करण्यास तसेही कायदा नाही म्हणतो. पण त्याचं हे नाही म्हणणं कुणाच्या कानांवर जात नाही सहसा. आणि भुकेच्या आवाजापुढे अन्य सर्व आवाज क्षीण पडतात. आपल्या ताटांमध्ये आलेले जिन्नस कुणाकुणाच्या कष्टांच्या निखाऱ्यांवरून आलेले आहेत, हे माहित करून घेण्याची गरज लक्षातही येणार नाही अशीच आहे. कुणी काही म्हटलंच तर ‘ ही लहान मुलगी त्या आज्जींची नात आहे, आज त्यांना बरं नाही म्हणून मदतीला आली आहे,’ असं सांगून वेळ मारून न्यायला केटरींगवाल्यांना जमतेच.

भांड्यांच्या टेम्पोत दाटीवाटीनं बसायचं, कामाच्या ठिकाणी जायचं आणि सगळी तयारी होण्याआधी आचा-याने घाईघाईने आणि काहीशा नाखुशीने बनवलेला सांबार भात भराभरा खाऊन मोकळं व्हायचं. आता सर्व उरकल्यावरच हातातोंडाची गाठ पडणार. त्यात निघताना प्रत्येकाचीच घाई. स्वयंपाकातील उरलेले पदार्थ खाऊन खाऊन त्यांचा कंटाळा आलेला असतो, पण घरी न्यावेच लागतात…घरात त्या अन्नाची वाट पाहणारी काही उपाशी पोटं असतात.

रोशनी आठवी इयत्तेत जाऊन शिकण्याचा प्रयत्न करते. चार सोसायट्यांमध्ये धुणी-भांडे करून घर चालवणारी आई आणि तीन भावंडं आहेत. रोशनी सर्वांत थोरली म्हणून तिची जबाबदारीसुद्धा थोरलीच. वडील वस्तीतील दुस-यांची मारामारी सोडवायला गेलेले असताना जीवाला मुकलेले. वस्तीतली झोपडी भाड्याने घेतलेली. भाडं थकलं की दुसरी झोपडी बघायला लागण्याच्या भीतीने, जे पैसे येतील ते भाड्याच्या रकमेसाठी बाजूला ठेवणं क्रमप्राप्तच होते. रोशनी केटरींगच्या कामाला जाते हे शाळेत तिने माहित होऊ दिले नव्हते. कामाच्या ठिकाणाहून रात्री आणलेले पदार्थ ती डब्याला घेऊन जात नसे. परंतु मेजवान्या रोज रोज थोड्याच असतात? आणि असल्या तरी त्या आपल्या कंत्राटदाराला मिळायला पाहिजेत, आणि कंत्राटदाराने आपल्याला कामाला नेलं तर पाहिजे !

चांगल्याचुंगल्या पदार्थांवरून मात्र रोशनीचं मन उडालं होतं. केटरिंगवाला उरलेले पदार्थ वाढप्यांत वाटून द्यायचा. खास चवदार बनवलेलं, भरपूर तेल-तूप, मसाला घातलेलं ..  ते रोशनीच्या घरी एरव्ही येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि हे अन्न नेहमी नेहमी घरी नेलं तर घरच्यांना त्याची सवय लागेल आणि नेहमीच्या खाण्याकडे वाकड्या तोंडाने बघितलं जाईल, हे रोशनीला माहित होतं. त्यामुळे ती सहसा उरलेलं अन्न घरी घेऊन जायचीच नाही. कधीकधी चार गुलाबजाम, जिलेबी असं काहीबाही मात्र न्यायची..  इतर वाढप्यांनी फारच आग्रह केला तर.

रोशनीला हे काम आवडायचं नाही मनातून. लोकांनी जेवून ठेवलेली ताटं, त्यांच्या नटून थटून आलेल्या, हास्यकल्लोळ सुरू असलेल्या गर्दीतून घेऊन जायची, खरकट्या वाट्या, चमचे ड्रमातून वेचून काढायच्या आणि धुवायला बसायचं हे नको वाटायचं. शिवाय गर्दीतल्या कुणाकडे चोरट्या नजरेने पाहून घ्यायचं. कुणाला धक्का लागता कामा नये. पंगतीत एखादी शाळेतली भेटली म्हणजे? पोटात गोळा यायचा. पण रिकाम्या पोटात आलेला गोळाही भुकेला असायचा.

“ रोशनी, अगं चाल पटापट पुढं. ही आख्खी लाईन वाढून व्हायचीय अजून.”  असं केटरींगवाल्यानं टाळी वाजवून म्हणताच रोशनीने हातातील मसालाभाताचं भांडं एका हातावर पेलत पेलत काळजीपूर्वक वाढायला सुरुवात केली. सवय नव्हती…वेळ लागत होता…वाढून न झालेल्या पानांवर बसलेली मंडळी हात आखडून घेऊन बसली होती. ‘वदनी कवळ घेता‘ म्हणायची प्रतीक्षा करणारी अनुभवी मंडळी…’आवरा लवकर’ म्हणत रोशनीच्या वेगात आणखीनच व्यत्यय आणत होती.

निम्मी पंगत वाढून झाल्यावर का कुणास ठाऊक रोशनी थबकली. तिने भाताचं भांडं टेबलावरच ठेवलं आणि दुस-या वाढप्याला नजरेनेच इशारा केला आणि ती मागच्या मागे आचा-याच्या खोलीकडे जवळजवळ पळतच गेली. त्याने विचारले…” काय गं? काय झालं? “ त्यावर रोशनी म्हणाली, “ काय नाही…हात भाजायला लागला गरम भातानं.”  त्यावर तो म्हणाला…” तुला तर मोठी हौसच नाही का वाढपी व्हायची. एवढासा जीव तुझा…चालली वाढायला !”

आणखी काही पंगती झाल्या. लोक हात धुवायला नळापाशी गेले. नवरा-नवरीची पानंही वाढून झाली. त्यांच्या पानांभोवती फुलांची सजावट. त्यांना वाढणा-यांना नवरीमुलीकडच्या लोकांनी खुशीने काही रुपये दिले. रोशनीला मिळू शकले असते त्यातले काही, पण ती तिथं नव्हती. मेजवानी आटोपायच्या शेवटच्या टप्प्यात वाढपे, आचारी, त्यांच्या सोबतच्या माणसांची पंगत हॉलमधल्या अगदी कोप-यातल्या साध्या टेबलवर बसली. रोशनीचं लक्ष काही जेवणात लागणार नव्हतं. त्यांच्यातलाच एक जण सर्वांना जेवण वाढत होता. तितक्यात किचनमधून मसालेभाताचं पातेलं घेऊन मिरजकर बाई आल्या आणि त्यांनी पहिल्यांदा रोशनीला भात वाढला. बाईंना बघून रोशनी गडबडून गेली. बाईंनी इतरांनाही भात वाढला आणि त्या बाहेर जाऊन थांबल्या. केटररसाठी ही गोष्ट नवी होती…लग्नघरच्या मंडळींपैकीच कुणी तरी मोठ्या मनाच्या बाई असाव्यात, असं सर्वांना वाटून गेलं. रोशनीनं पटापटा चार घास गिळले आणि ती लगबगीनं बाई जिथं बसल्या होत्या तिथे त्यांच्यापाशी जाऊन उभी राहिली.

“ कामाची कसली लाज बाळगायची, रोशनी? तू मला पंगतीत बसलेले पाहूनच मागे फिरलीस ना? ” बाईंच्या या प्रश्नावर, एरव्ही वर्गात पटापट उत्तरे सांगणारी रोशनी आता मात्र शांत आणि मान खाली घालून उभी होती. तिच्या मागोमाग केटरींगवाला आला…म्हणू लागला…” काही चुकलं असंल मॅडम तर सॉरी म्हणतो. पुन्हा नाही मी लहान पोरींना कामावर लावणार !”

“अहो, तसं काही नाही हो दादा. ही रोशनी माझ्या वर्गात आहे. उलट मी तिचं कौतुकच करायला तिला बाजूला घेऊन आलीये. तुम्ही जा तुमच्या कामाला ! “ त्या दोघींकडे एकवार कटाक्ष टाकून तो बिचारा निघाला.

“ रोशनी, ठीक आहे. तुझी घरची परिस्थिती अशी आहे की तुला कोणतं न कोणतं काम हे करायलाच लागेल. तुला आवडत नसलं तरी. पण मग मिळालेलं काम आवडून घेतलंस तर सोपं होऊन जाईल, नाही का? ”

“ हो,मॅडम. स्वयंपाक करायला आवडतं मला. वेगवेगळ्या रेसिपी बनवून बघायला मज्जा येते. माझे पोहे, उपीट सगळ्यांनाच आवडतं ” रोशनी उत्तरली.

“ हो तर, स्वयंपाक तर आलाच पाहिजे प्रत्येकाला !” बाईंच्या या बोलण्यावर रोशनी गोड हसली.

“ पण हे असं वाढप्याचं काम किती दिवस करणार आहेस गं तू?” या प्रश्नावर मात्र ती गडबडून गेली.

“ माहित नाही बाई. पण शिक्षण पूर्ण होईपर्यंत तर करावंच लागेल !”तिने सांगितले.

बाई म्हणाल्या, ” हे बघ, आवडीच्या क्षेत्रात करीअर करायच्या खूप संधी आहेत आजकाल. तू केटरींगमध्ये जरी नीट लक्ष घातलंस ना तरी खूप चांगले पैसे मिळवू शकशील. पण आधी शिक्षण नीट पूर्ण कर बाई !” 

बाईंनी तास सुरू केला. त्या नेहमीच मुलींना भविष्याची स्वप्नं दाखवयच्या. त्या स्वत:सुद्धा गरीबीतून शिकल्या होत्या. त्यांच्या आई खानावळ चालवायच्या. त्यांनाही केटरिंगमध्ये गोडी होती. हॉटेल मॅनेजमेंट करायचं असं त्यांनाही शाळेत असताना कधीतरी वाटून गेलं होतं.

रोशनी दुस-या दिवशी शाळेत उशीराच पोहोचली, रात्री सर्व आवराआवरी करायला बराच उशीर झाला होता. “ मधल्या सुट्टीत मला स्टाफ रूममध्ये येऊन भेट,रोशनी !” मिरजकर बाईंनी रोशनीला असं म्हटल्यावर वर्गातल्या पोरींना वाटलं की आता रोशनीचं काही खरं नाही.

रोशनी मधल्या सुट्टीत स्टाफ रूमबाहेर घुटमळली आणि ते पाहून मिरजकर बाईच बाहेर आल्या आणि “ चल,हेडबाईंकडे !” म्हणत पुढे चालू लागल्या. ‘ आता हे काय वाढून ठेवलं असेल आपल्या पानात ‘ या विचाराने रोशनी हळूहळू हेडबाईंच्या खोलीकडे चालू लागली.

“ बाई,ही रोशनी माझ्या वर्गातली. हाताला खूप चव आहे हिच्या. आपल्या बारीक सारीक कार्यक्रमाचं केटरींग आपण हिला देऊयात का? ” मिरजकर बाई आणि हेडबाई यांच्यात यावर काही बोलणं झालं. त्यानंतर शाळेतल्या छोट्या समारंभांवेळी लागणारे खाद्यपदार्थ आणि रोशनी असं समीकरण होऊन गेलं. आणि मोठ्या जेवणाचं काम रोशनी ज्याच्याकडे कामाला जाते त्याच केटररला मिळालं…रोशनी आता त्याची मॅनेजर होती. मिरजकरबाईंच्या नातेवाईकांच्या घरच्या स्वयंपाकांची कामेही रोशनीला दिली जाऊ लागली.

हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी काय करायचं आणि कसं करायचं याची मिरजकर बाईंना माहिती होतीच.

……. 

आज रोशनीचं लग्न. सेवानिवृत्त झालेल्या मिरजकर बाईंना खास आणि आग्रहाचं आमंत्रण होतंच. त्याही त्यांच्या यजमानांना घेऊन गावावरून लग्नाला आल्या. जेवणाचा मोठा थाट होता. कधीकाळी त्याच्याकडे वाढपी म्हणून असलेल्या रोशनीच्या लग्नात केटररने स्वत:हून सर्व व्यवस्था केली होती. रोशनीचा स्वत:चा केटरींगचा छोटासा व्यवसाय सुरू होऊन बरीच वर्षे उलटून गेली होती…व्यवसाय प्रगतीपथावर होता. तिच्याकडे अनेक रोशनी काम करीत होत्या आणि रोशनी त्यांना कायम वाढपी राहू देणार नव्हती.

तिचे अनेक ग्राहक आज तिच्या लग्नातले खास आमंत्रित होते. तिच्या हॉटेल मॅनेजमेंटचा काही स्टाफही होता. मिरजकर बाई आणि त्यांचे यजमान पंगतीत बसले. वाढप सुरू झालं. मिरजकर बाई यजमानांशी बोलण्यात मग्न होत्या. त्यांच्या पानात मसालेभात वाढणारा हात त्यांना दिसला…मेहंदी लावलेला…हिरवा चुडा भरलेला…बोटात अंगठी असलेला ! रोशनी होती मसालेभाताचं भांडं हातात घेऊन, आणि सोबत तिचा नवरा !

“बाई, मागच्या वेळी वाढायचा राहून गेलेला मसालेभात आता वाढलाय !” 

कुणीतरी वदनी कवळ घेताचा गजर केला आणि मिरजकर बाईंनी आपल्या पानातील मसालेभाताचा एक छोटा घास रोशनीला भरवला !…… 

(नवरात्रीत अशा लढाऊ महिलांच्या कर्तृत्वाचं स्मरण म्हणून ही लेखमाला. यातील ही पाचवी माळ )

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments