श्री अमोल अनंत केळकर
इंद्रधनुष्य
☆ भारताचं बोलकं यश… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
आज सारा देश शांतपणे समाधानाने झोपणार आहे. मुलीच्या लग्नात तिची पाठवणी केल्यावर दिवसभराच्या शिणवट्यातून थकलेला बाप जसा कृतार्थ भावनेतून झोपतो किंवा इंडिया – पाकिस्तानच्या सामन्यात त्यांना हरवल्यावर जल्लोष करून भागलेले जीव जसे निवांत पहुडतात तशी झोप आज लागणार आहे..
का? का वाटत असावं असं.? अब्जाधीश व्यावसायिकांपासून खेड्यापाड्यात राहणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्याला सुद्धा चांद्रयान ३ च लँडिंग बघावस वाटलं अस काय होत त्यात.??
ऑर्बिटर, रोव्हर, लँडर ह्यातला फरक पण न कळणारे ह्या यशासाठी देव पाण्यात घालून बसले होते..!! का.?
कारण स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवसापासून ह्या देशाने केवळ आणि केवळ संघर्ष पाहिला आहे. स्वातंत्र्य मिळालं त्या आधी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की ” ह्या अर्धशिक्षित, गरीब..लोकांना स्वातंत्र्य दिले तर काही वर्षातच अराजक निर्माण होईल आणि हा देश गुंड मवाल्यांच्या ताब्यात जाऊन साऱ्यांची दुर्दशा होईल.”
चर्चिल चुकीचा नव्हता..! फुटीरतावादी संस्थांनांचे विलीनीकरण, सर्वांना एका धाग्यात बांधू शकेल अशा संविधानाची निर्मिती, फाळणीतल्या विस्थापितांचे पुनर्वसन, भाषावार प्रांतरचना….ह्या एकेका प्रश्नाची व्याप्ती इतकी होती की देशाच्या पहिल्या काही पिढ्या त्यातच खर्ची पडल्या
फाळणीमुळे सुपीक प्रदेश पाकिस्तानात गेला होता, तर दुसऱ्या महायुध्दात जनता इतकी भरडली गेली होती की सगळी अर्थव्यवस्थाच जेरीस आली होती. त्यात अमेरिका – रशियाच्या शीतयुद्धात कोण्या एकाची बाजू घेतली असती तर स्वावलंबी राष्ट्र बनण्याच्या स्वप्नांना तिथेच सुरुंग लागून देश महासत्तांचे हातचे बाहुले झाला असता त्यामुळे देशाने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.
तेव्हा संपूर्ण जगासाठी भारत एक चेष्टेचा विषय होता.
१९६२ च्या दुष्काळात अमेरिकेकडे गहू मागितला तर जनावरांना खायला घातला जाईल असा नित्कृष्ट दर्जाचा गहू त्यांनी पाठवून भुकेल्या भारतीयांची चेष्टा केली होती.
चीनसोबत झालेल्या युद्धात पुरेशा शस्त्र – साधनाअभावी कडाक्याच्या थंडीत भारतीय सैन्य धारातीर्थी पडले होते. अवकाश मोहीम काढायची तरी रशियाची मदत घ्यावी लागे. कित्येक वर्षे ऑलिंपिकमध्ये पदकांचा दुष्काळ होता. मुठभर ७ – ८ देश जो क्रिकेटचा खेळ खेळतात त्यात विश्वविजेते म्हणवून घेताना आपल्यालाच कुठेतरी पटत नव्हतं. कारगिलच्या युद्धात बोफोर्स तोफा ३ – ३ दिवस खोळंबून होत्या कारण देशाची स्वत:ची GPS सिस्टीम नव्हती आणि जी होती ती अमेरिकेच्या नियंत्रणाखाली…!!!
पण ह्या देशाच्या मातीत एक गुण आहे. कित्येक संकटे आली तरी पुन्हा शून्यातून उभं रहायचं. देश लढत राहिला. ज्या देशात एखाद्या राज्याला त्याच्या शेजारच्या राज्याची भाषा समजत नाही त्या देशात दोघांना एकत्र ठेवणारं एक आदर्श संविधान लिहिलं गेलं. जिथे गहू मागायची वेळ आली होती तिथे हरित क्रांती होऊन देश गहू निर्यात करू लागला. शेजारचं शत्रूराष्ट्र आम्हाला कमकुवत समजत असताना त्याला ९०००० सैन्यासह शरणागती पत्करायला लावली. पाश्चिमात्य देशांनी सुपर कॉम्प्युटर द्यायला नकार दिला तर स्वतः आमच्या तंत्रज्ञांनी परम कॉम्प्युटर घडवला.
आणि आता ज्या मित्रराष्ट्राची अंतराळ मोहीम अपयशी होताना दिसली होती त्याच्याचसमोर आपण अनुभव कमी असताना यशस्वी होताना दिसत आहोत हे यश खूप बोलके आहे. इंटरस्टेलर सारख्या साय – फाय सिनेमाच्या बजेटपेक्षा कमी बजेटमध्ये ही मोहीम आखण्यात आली होती.
चार वर्षांपूर्वी डॉ.सिवन रडले तेव्हा सगळा देश हळहळला होता. कारण त्यांच्या अश्रुंच्यामागे मोठा इतिहास आहे. आज उदयोन्मुख महासत्ता असताना सुद्धा हा खर्च वारंवार परवडणारा नाही. त्यामुळे अपयश म्हणजे काय ह्याचा अर्थ त्यांना माहीत होता. त्यांचं यश – अपयश प्रत्येकाला आपलंसं वाटलं कारण फक्त पैसाच नाही, तर आपल्या गेल्या कित्येक पिढ्या हा दिवस बघायला खर्ची पडल्या आहेत ह्याची जाणीव सगळ्यांना आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच पृथ्वीची क्षितिजे पार करत एका दुसऱ्या भौगोलिक रचनेवर भारताची मोहोर उमटली जात आहे. हा प्रसंगच अभूतपूर्व आहे.
आज इस्रोचा तो प्रवास आठवतोय…
दुसरी कोणतीच सोय नसल्याने सायकल, बैलगाडीवर लादलेले स्पेअर पार्टस, एका चर्चच्या आवारात सुरू केलेलं प्रक्षेपण केंद्र, बिशपच्या घरातच मांडलेलं वर्कशॉप, हे घडवण्यासाठी परदेशातील मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नाकारून भारतातच थांबलेले वेडे देशभक्त संशोधक, विन्स्टन चर्चिलचं भाषण, पाश्चिमात्य कार्टूनिस्टनी इस्रोची उडवलेली खिल्ली, चांद्रयान २ च्या वेळेस पाकिस्तानी मंत्र्यांनी केलेले उपहासात्मक ट्विट……..सगळं डोळ्यासमोर तरळतं आहे.!!
आज झोपी जाताना रात्री दूर त्या चंद्राकडे पाहताना विलक्षण समाधान वाटत आहे. प्रज्ञान रोव्हर आता तिथे कामाला लागला असेल….आणि काळाच्या पटलावर कधीही पुसली जाणार नाही अशी भारताची मोहोर तिथे उमटली जाणार आहे..!!! जय हो इस्रो..!!
लेखक : सौरभ रत्नपारखी
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com