सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 204
☆ कविता ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
बरेच दिवस सुचलीच नव्हती कविता,
घरातले पुस्तकांचे पसारे
आवरता आवरेनात,
खेळ तर मांडलेला असतो,
पण पटावरच्या सोंगट्या
दगा देतात?
की खेळताच येत नाही खेळी?
किती निरागस,
त्या शाळेतल्या सख्या…
कुबेर नगरीत रहात असूनदेखील,
निगर्वी, व्यक्तिमत्त्वात विलोभनीय
सहजपणा!
माझ्यावर कौतुक वर्षाव करणा-या..
थोर प्रशंसक!
आयुष्य किती रंगीबेरंगी—-
काहीच नको असतं ,
एकमेकांकडून…
फक्त अडीच अक्षरे प्रेमाची!
तू ही बोलतोस,
खूप भरभरून…
आयुष्याच्या सांजवेळी..
भरून जाते ओंजळ तुझ्या शब्दांनी,
आणि घमघमतेच एक कविता,
मोग-याच्या दरवळा सारखी !!
आणि सा-या फापटपसा-यातून,
अलगद स्वतःला सोडवून घेत,
मी ही होते…
अशरीरी… मुक्तछंद!
☆
© प्रभा सोनवणे
(१७ ऑक्टोबर २०२३)
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈