सुश्री विभावरी कुलकर्णी

🌸 विविधा 🌸

☆ डब्यातील डबे… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

आज सकाळी मसाल्याचा डबा घासायला काढला आणि त्याकडे बघतच राहिले.कारण आपली महिलांची सवय!डब्यावरचे नाव वाचले,विशेष म्हणजे बाहेरच्या डब्यावर व आतील छोट्या डबीवर नाव वेगळे.मग डब्याकडेच बघत बसले आणि हळूच आठवणीची एक पुडी सुटली.बाहेरचा डबा मैत्रिणीने दिलेला तर आतील छोटे डबे माझ्या जुन्या डब्यातील होते,जो डबा पूर्वी चिरल्यामुळे मोडीत काढला होता.मग लक्षात आले महिलांचा जीव कुठे कुठे अडकलेला असतो.

अगदी आजचे उदाहरण बघायचे झाले तर डबे घरात बघितले तर किती विविध प्रकारचे डबे सांभाळून ठेवलेले असतात.आई कडे असतो तो पर्यंत याचे महत्व लक्षात येत नाही. पण एकदा स्वतः च्या संसाराला सुरुवात झाली की या डब्यात जीव अडकणे सुरु होते.लग्नात आहेरात आलेले डबे अगदी कायमची सोबत करतात.विविध आकाराचे डबे अगदी व्यवस्थित लावून ठेवणे,दर महिन्याला घासून चकचकित ठेवणे.घासून मगच त्यात सामान भरणे.व्यवस्थित साहित्य सापडावे म्हणून त्यावर छान स्टिकर्स लावणे.अशी उत्तम गृहिणीची कामे सुरु होतात.आणि त्या कामाचे सर्वांकडून कौतुक पण होते.अर्थात लेबल असलेल्या डब्यात तोच पदार्थ असेल याची मात्र खात्री नसते.आणि कोणी शेंगदाणे कुठे आहेत? याच्या उत्तरा दाखल “आहेत ना तिथेच,रवा लिहिलेल्या डब्यात.” हे वाक्य ऐकू येते.काय करणार,तात्पुरती सोय केलेली असते.पण कोणाला समजणार?

काही मैत्रिणी तर डब्यांच्या समोर मुद्दाम सेल्फी काढून आपले वैभव दाखवत असतात.पूर्वी तर किचन मधील एक भिंत म्हणजे डब्यांची मांडणी असायची.आणि त्यात चढत्या किंवा उतरत्या डब्यांच्या उंचीच्या क्रमाने डबे लावलेले असायचे.जणू किचनचे वैभवच!

हळूहळू  हळदीकुंकू, मिळालेले आहेर,भेटवस्तू अशा प्रसंगातून छोट्या,मोठ्या,विविध आकाराच्या,रंगाच्या डब्यांची बहीण,भावंडे घरात येतात आणि ऐटीत जुन्या डब्यांच्या समोर किंवा डोक्यावर जाऊन बसतात.त्यात अगदी सध्याच्या पार्सल मध्ये येणारे डबे पण अपवाद नसतात.अगदी टाकून द्यावेसे वाटले तरी “असू दे, वेळेला उपयोगी पडतील.” असे म्हणून ठेवले जातात.इतके डबे असून एखादा डबा  आला नाही तर जीव हळहळतो.आणि दुकाना समोरून जाताना एखादा नवीन फॅशनचा डबा भुरळ घालतोच!

आणि हो आपला जीव अडकलेले डबे घरातल्यांच्या मात्र डोळ्यात खुपत असतात.मग मी एक युक्तीच केली आहे.एक बॉक्स घेऊन त्यात हे डबे छान ठेवले आहेत.काही दिवसांनी मात्र हे डबे त्यात मावत नाहीत.मग मी डबे एकात एक असे घालून जपून ठेवते.आणि छोट्या छोट्या डब्या मोठ्या डब्यांच्या पोटात लपून बसतात. अगदी कोणाची दृष्ट नको लागायला या तत्वाने!अजून एक गंमत सांगू का? हे झाले निवडक डब्यांचे अजून आठवणींचे डबे उघडलेच नाहीत.म्हणजे लहानपणीचे,आज्जीचे,कड्या कुलुपे असणारे,विविध घाटांचे ( आकार ).

आणि हो या डब्यांच्या  मध्ये यांच्या बहिणी बरण्या राहूनच गेल्या आहेत.बरण्यांची गोष्ट पुन्हा केव्हातरी!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

११/१०/२०२३

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments