श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (नववी) – तृतीय पुरूषार्थ ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ती आता दोन जीवांची होती. तिचा आहे हाच जीव तिला नीट सांभाळता येत नव्हता तर तिथं तिच्या पोटातल्या जीवाची काय कथा? जीव राखायला चित्त था-यावर असावं लागतं. किंबहुना चित्तावरच तर देहाचा डोलारा उभा असतो अन्यथा चित्ताशिवाय देह म्हणजे केवळ भास. प्राणवायूचे उपकार वागवणारे श्वास यायला-जायला कुणाची परवानगी विचारत नाहीत. त्यामुळे काया आपल्या अस्तित्वाची पावलं जीवनाच्या मातीवर उमटत पुढे चालत असते. आणि मागे राहिलेल्या पाऊलखुणा पुसट पुसट होत जातात. त्यांचा कुणीही माग काढत येऊ नये म्हणून. चालणारा कुठल्या दिशेला जातो आहे, याचं वाटेला कुठं सोयरसुतक असतं म्हणा !

तिचे नात्या-गोत्यातले तिला आणि ती स्वत:ला विसरून कित्येक वर्षे उलटून गेली असावीत. देहाचे धर्म तिच्या देहाला समजत नव्हते तरीही ती मोठी झाली होती. हाडा-मांसाच्या गोळ्याला निसर्गाने दिलेली आज्ञा पाळत फक्त वाढण्याचं माहीत होतं, आणि निसर्ग आपली कामं करून घेण्यात वाकबगार. तो देहाची आणि बुद्धीची फारकत झालेली असली तरी त्या तनूच्या मातीतून अंकूर फुलवू शकतोच.

नऊ महिने उलटून गेलेले असले तरी नऊ दिवस शिल्लक होते, नवरात्रीतल्या नऊ दिवसांसारखे. पण या नऊ दिवसांत गर्भघटातल्या मातीत निसर्गानं पेरलेलं बीज फळाचं रूप धारण करून प्रकट व्हायला उतावीळ झालेलं असतं. नववा संपला की बाईच्या हाती काही उरत नाही…आता सुटका होण्याची प्रतीक्षा करीत दिवस ढकलायचे !

बाईची आई होण्याचे क्षण नजीक आलेले असताना ती अंधारात एकाकी होती. काया रया गेलेली..  वस्त्रं आपले कर्तव्य पार पाडून स्वत:च गलितगात्र झालेली…  त्यात स्त्रीचं शरीर…झाकावं तरी किती त्या फाटक्या चिंध्यांनी ! पोटात भुकेनं दुखत असेल नेहमीसारखं असं तिला वाटत असावं म्हणूनच ती निपचित पडून राहिली होती. आपल्या पोटात कुणाच्या तरी देहांची आसुरी भूक मांसाचा जिवंत गोळा बनून लपून बसली आहे, हे तिच्या गावीही नव्हतं…तिला मागील कित्येक महिन्यांपासून नेहमीपेक्षा जास्त भूक लागायची याचा अर्थ तिला समजण्यापलीकडचा होता.

इथं देह हाच धर्म मानून माणसं देव विसरून जातात हे तिला उमगायचं काही कारण नव्हतं. कुणी कधी फसवून, तर कधी कुणी भाकरीची लालूच दाखवून तिच्याशी जवळीक साधत होतं….आणि पुन्हा कधीही जवळ करीत नव्हतं. उष्ट्या पत्रावळीवरची शितं वेचून झाल्यावर कावळे पुन्हा त्या पत्रावळीकडे एकदाही वळून पहात नाहीत, अगदी तसंच … .

आजची रात्रही अंधाराचीच होती. नेहमी गजबजलेला उड्डाणपूल आता थोडी उसंत अनुभवत होता. त्याच्याखाली शहराची अनौरस पिलं आस-याला जमा झालेली होती. इथं उजेडाची अडचण होते सर्वांना.

त्या दहा जणी दिवस संपवून आपल्या वस्तीकडे निघालेल्या होत्या. त्यातल्या एकीच्या कानांनी एक ओळखीचा आवाज टिपला. तिच्या पाठच्या भावाच्या वेळी तिच्या आईने ओठ दातांत दाबून धरून रोखून धरलेला आणि तरीही उमटणारा आवाज…आई ! काय असेल ते असो…आई नसली तरी ओठांवर आई कायम रहायला आलेली असते. ती लगबगीने अंधाराकडे धावली. तिच्या सख्या तिच्यामागे झपझप गेल्या. “आई होईल ही….कधीही !” तिने त्यांना खुणावलं.

शृंगार बाईचा असला तरी शरीरं राकट असलेल्या त्यातील दोघी-तिघींनी तिच्या अंगाचं गाठोडं उचललं आणि तिथून दीडशे पावलांवर असलेल्या माणसांच्या इस्पितळाकडे धावायला सुरूवात केली. अपरात्री घराकडे पळणारी श्रीमंत वाहने यांनी हात दाखवून थांबणार नव्हतीच आणि पैशांसाठी माणसं वाहणारी वाहनं यांच्याकडून काही मिळेल की नाही या शंकेने थांबली नाहीत.

इस्पितळ बंद आहे की काय असा भास व्हावा असं वातावरण. लालसर पण जणू मतिमंद उजेड विजेच्या दिव्यांचा. एक रूग्णवाहिका थकून-भागून झोपी गेल्यासारखी एक कोपरा धरून उभी होती. रखवालदार पेंगत होते आणि कुठल्या कुठल्या खाटांवरून वेदनांची आवर्तनं उठवणारे ध्वनीच तेवढे शांतता भंग करीत होते.

त्यांनी तिथलंच एक स्ट्रेचर ओढून घेतलं आणि तिला त्यावर आडवं निजवलं…  मामा, मावशी, दीदी, डॉक्टरसाहेब असा पुकारा करीत त्या आत घुसल्या. दरम्यान रखवालदारांनी डोळे उघडले होते. या कधी आपल्या इस्पितळात येत नाहीत ..  सरकारी आणि मोफत असलं तरी…  आणि आज आल्यात तर एकदम दहाजणी? त्यांच्यातलीच कुणी मरणपंथावर निघाली की काय? आधी एक परिचारिका आणि पाचेक मिनिटांनी डॉक्टर तिथं आले. इथं काहीही होणार नाही….मोठ्या दवाखान्यात न्या…  त्यांनी फर्मावले. त्यांच्या हातापाया पडून अ‍ॅम्ब्यूलन्स मिळवली. त्या आयुष्यात प्रथमच अ‍ॅम्ब्यूलन्समध्ये बसलेल्या होत्या. घाईगडबडीत दुसरं हॉस्पिटल गाठलं. कागदी सोपस्कार तिथल्या एका रूग्णाच्या नातेवाईक पोराने पूर्ण करून दिले. तोपर्यंत आई होणारी शुद्धीवर आलेली दिसत होती. “ काय घाई होती? हिला डिलीवर व्हायला अजून दहा-पंधरा दिवस जातील !” तिथल्या डॉक्टरांनी थंडपणे सांगितले. एका रूग्णाचे असे एवढे नातेवाईक, तेही सारखे दिसणारे त्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच असे एकत्रित पाहिले असावेत. “ घरी घेऊन जा ! आणि पुढच्या वेळेस एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्या !” असं म्हणून डॉक्टरसाहेबांनी केस तात्पुरती हातावेगळी केली. अ‍ॅम्ब्यूलन्स निघून गेली होती.

घरी न्यायचं म्हणजे पुलाखाली? त्यांच्यातल्या प्रमुख दिसणारीने काहीतरी ठरवलं आणि त्यांनी इस्पितळाबाहेर रिक्षेत झोपलेल्या चालकाला हलवून उठवलं…पैसे देईन…म्हणत त्याला इस्पितळात आणलं. स्ट्रेचरवरच्या देहाला रिक्षेत टाकलं आणि रिक्षेत बसतील तेवढ्या जणी त्यांच्या घराकडे निघाल्या. बाकीच्या येतील तंगडतोड करीत…रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसदादांचा ससेमिरा चुकवीत चुकवीत.

ती कितीतरी वर्षांनी घर नावाच्या जागेत आली होती. तिला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या मानवाच्या जीवनावश्यक गोष्टी पहिल्यांदाच एकत्रित मिळाल्या होत्या…आणि त्या थंडीच्या दिवसांत ऊबही….ती विवाहिता नव्हती तरीही तिला माहेर मिळालं होतं….आणि नको असलेलं मातृत्व !

सकाळ झाली. आज कुणीही पोटामागे घराबाहेर पडणार नव्हतं तसंही…त्यांना त्यांच्या देवीचा कसलासा विधी करायचा होता म्हणून त्या सा-या घरातच होत्या. बिनबापाचं लेकरू म्हणून जन्माला येऊ घातलेल्या तिच्या पोटातल्या बाळाने डॉक्टरांची दहा-पंधरा दिवसांची मुदत आपल्या मनानेच अवघ्या बारा तासांवर आणून ठेवली बहुदा ! दुपारचे बारा-साडेबारा वाजले होते….आणि त्या आईसह त्या दहाही जणींनी निसर्गाच्या नवसृजनाचा सोहळा अनुभवला. तिला वेदना झाल्याच इतर कोणत्याही स्त्रीला होतात तशा, पण तिच्या भोवती राठ शरीराची पण आत ओलाव्याच्या पाणथळ जागा असलेली माणसं होती….मुलगी झाली,,,अगदी नैसर्गिक प्रसुती ! या दहाजणींपैकी कुणी आजी झालं, कुणी मावशी तर कुणी आत्याबाई ! त्यांची स्वत:ची बारशी दोनदा झालेली..एक आईवडिलांनी ठेवलेली पुरूषी नावं आणि तिस-या जगात नियतीने बहाल केलेली बाईपणाच्या खुणा सांगणारी नावं…पुरुषपणाच्या पिंज-यात अडकून पडलेली पाखरं !

घरात ढोलक वाजले. नवजात अर्भकाच्या स्वागताची गाणी झाली आणि बाळाची अलाबला घेण्यासाठी वीस हात सरसावले. त्या प्रत्येकीला आई झाल्याचा आनंद झाला जणू ! स्त्री की पुरुष या प्रश्नाच्या जंजाळात अडकून पडलेल्यांच्या हातून एक स्त्री जन्माला आली होती.

घरातल्या कुणालाही नवजात अर्भकाला सांभाळण्याचा अनुभव असणे शक्य नव्हते… त्यांनी तिला घेऊन तडक इस्पितळ गाठले…एकीने दोघा-चौघांना विचारून एका समाजसेवी संस्थेशी संपर्क साधला. कालचे दहा-पंधरा दिवस मुदतवाले डॉक्टर तिथेच होते. आश्चर्यचकीत होत त्यांनी जच्चा-बच्चा उपचारांसाठी दाखल करून घेतले. बाळ-बाळंतीण सुखरूप.

जन्मसोहळा पार पडला आणि आता भविष्याची भिंत आडवी आली. पुढे काय करायचं? कुणी पोलिसाची भीती घातली होतीच. कुठे जाणार ह्या मायलेकी…त्यात ही आई मनाने अधू ! कुणी म्हणालं आता ही सरकारी केस झाली. सरकार ठरवेल यांना आता कुठं ठेवायचं ते.

दहा जणींपैकी एक म्हणाली, ” डॉक्टरसाहेब….ही पोर आम्हालाच देता का? दत्तक घेऊ आम्ही हिला. वाढवू,शिकवू !” 

“ कायदा आहे. सरकारकडे अर्ज करावा लागेल !” त्यांना सांगितले गेले.

त्या निघाल्या….सा-या जणींचे डोळे पाणावलेले ! स्त्री-पुरूषत्वाच्या द्विधावस्थेत भटकणा-या त्या दहाही जणींनी सहज सुलभ अंत:प्रेरणेनं तृतीय’पुरूषा’र्थ गाजवला मात्र होता.

आपल्याकडे बघून पोटासाठी टाळी वाजवणा-या या दशदुर्गांसाठी आपले तळहात जोडले जावेत…टाळ्यांसाठी आणि नमस्कारासाठीही !

( त्रिपुरा राज्यातील गोमती जिल्ह्यातल्या उदयपूर-बंदुआर येथे मागील एका महिन्यापूर्वी घडलेल्या या अलौकिक सत्यघटनेचे हे कथारूपांतर…कथाबीज अस्सल…पदरच्या काही शब्दांची सावली धरली आहे या बीजावर. धड पुरूषही नाही आणि धड स्त्रीही नाही अशा देवमाणसांनी सिद्ध केलेल्या या पुरूषार्थास नवरात्रीनिमित्त नमस्कार. )

लेखक : संभाजी बबन गायके. 

            ९८८१२९८२६०

नवरात्राच्या दुस-या माळेच्या निमित्ताने …..  कॅप्टन शिवा चौहान आपणांस अभिमानाने सल्यूट…जयहिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments