श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ घर… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
तुझ्या न माझ्या स्वप्नांचे घर
दिसतेआहे पैलतीरावर
निरखू आपण मिळून दोघे
उभा राहुनी या काठावर
आनंदाने जगायचे तर
चालायाच्या वाटा खडतर
परस्परांच्या मर्जी खातर
बनतजायचे मालक नोकर
पेरायाची जिभेत साखर
ठेवायाचा बर्फ शिरावर
ठरवायाचे आपले आपण
कोण चुकीचे कोण धुरंधर
रीत जगाची प्रित सांगते
जोडायाला हळवे नाते
खुलेपणाची पारख होते
भविष्यात ती कायम टिकते
अनोळखीचे अंतर सरते
लळाजिव्हाळा मनात जपते
आयुष्याच्या वळणावरती
वळतो जुळतो हेच बरोबर
भवसागर हा मध्ये केवढा
तरावयाला गहन निरंतर
हात घेवुनी हाती आपण
चालायाचे अफाट अंतर
तिथे जावुनी घेत विसावा
निवांत आपण थांबू नंतर
बांधू तेथे विसाव्यास मग
इवलेसे पण मालकीचे घर
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈