सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ चला मिळवून आणू या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“करंजीच्या सारणात थोडी कणीक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो. ” लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची. “पण कणीकच का? तांदळाचे पीठ का नाही?” तर त्यावर “अग, गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. “

“मग आपण खव्याच्या किंवा मटारच्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ?” माझा अजून एक आगाऊ प्रश्न. तर त्यावर “अग, मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते”  – तितकेच शांत, पण तत्पर उत्तर.

अगदी सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समजावल्या.

१. अंगी ओलावा असेल, तर गोष्टी मिळून येतात.

२. ओलावा कमी असेल, तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.

नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding factor चे महत्व पटत गेले. आणि आता दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली.

नात्यांचंही असंच आहे. प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो, जो सर्वाना धरून ठेवतो. मग ते असे मित्र/ मैत्रीण असतील, जे बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणतात.

व्हॉट्सॲप ग्रुप बनवतात आणि “contact मध्ये रहायचं हं” अशी प्रेमळ दमदाटीही करतात. कधीकधी असा binding factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते.

आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factors दिसतात. आपण त्याना अनेकदा भेटलेलोही नसतो… पण ते मात्र आपली चौकशी करतात. काळजीही करतात.

अशा सगळ्या binding factors ना माझा मानाचा मुजरा. ते आहेत, म्हणून समाजातील माणूसपण टिकून आहे, अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही.

मंडळी, आपण वयाने मोठे झालो, मिळवते झालो, चला तर – आता मिळवून आणणारे होऊ या.

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments