श्री सतीश खाडे
🌈 इंद्रधनुष्य 🌈
☆ “चौदा लांडग्यांनी केली नदी जिवंत…” ☆ श्री सतीश खाडे ☆
अमेरिकेतील येलो स्टोन नॅशनल पार्कमधली ही नदी गेल्या शंभर वर्षांत हळूहळू आटत गेली आणि आता ती फक्त पावसाळ्यातच वाहू लागली. पावसाळ्यानंतर अल्पावधीतच नदी कोरडी पडू लागली. भरपूर पाऊस पडूनही ती फक्त पावसाळ्यात वाहत होती. शतकभरापूर्वी ती बारमाही वाहत होती.
बऱ्याच अभ्यासानंतर बारमाही वाहणारी ही नदी आटण्याची कारणे आणि तिला पुन्हा वाहते करण्यासाठीच्या उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाल्या. त्यातून नदी आटण्याचा संबंध लांडग्यांशी आहे आणि लांडग्यांचा संबंध माणसांशी असल्याचे लक्षात आले.
येलो स्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील पश्चिम युनायटेड स्टेटमधील वायव्य कोपऱ्यात विस्तारलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे अमेरिकाच नव्हे, तर जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून मानले जाते. तेथील वन्यजीव आणि अनेक भूऔष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान ओळखले जाते. गेल्या शतकाअखेर म्हणजे सन १९०० पर्यंत या जंगलातील लांडगे तेथील स्थानिक लोकांनी शिकार करून संपवले होते.
लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत होती. त्यातून या लांडग्यांचे अस्तित्त्वच माणसाने पूर्ण संपवले होते. त्यामुळे चक्क नदी आटली होती. पण तुम्ही म्हणाल ‘हे कसं शक्य आहे?’ तर हे रहस्य पुढे उलगडत जाईल….
…अन् नदी जीवंत झाली.
ही नदी बारमाही वाहती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या सूचनेनुसार १९९५ मध्ये येलो स्टोन पार्कच्या जंगलात फक्त १४ लांडगे आणून सोडण्यात आले. आणि पुढच्या पंचवीस वर्षांत परिस्थिती हळूहळू चमत्कार व्हावा तशी बदलत गेली. २०१९ मध्ये नदी केवळ वाहू लागली नाही तर असंख्य जीव तिच्या आश्रयाला देखील आले. तिथे एक समृद्ध जैवविविधतेचा मोठा खजिनाच तयार झाला.
…. तर त्याचं झालं असं, की लांडग्यांची शिकार झाल्यामुळे जंगलातील हरणांची संख्या हळूहळू वाढत गेली. अनेक वर्षे जंगलात हरणांचेच राज्य होते. हरणांना कुणीही भक्षक नसल्याने वर्षानुवर्षे त्यांची संख्या बेसुमार वाढत होती. याच हरणांनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झाडे, गवत फस्त करण्याचेच काम केले होते.
गवताबरोबरच जंगली झाडे, त्यांना आलेली कोवळी पाने खाण्याचा सपाटाच लावला होता. थोडे थोडे करून पाणलोटातील सगळं जंगल त्यांनी बोडखं केलं होतं आणि हेच नदी आटण्याचं कारण होतं. कारण झाडे व गवत नसल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत व पुढे खडकात मुरण्याचे प्रमाण जवळपास शून्यच झाले होते.
पुढे अभ्यासकांच्या सूचनेनुसार जंगलात लांडगे सोडल्यानंतर त्यांनी हरणांची शिकार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हरणांची संख्या फार कमी झाली नाही. परंतु या लांडग्यांना घाबरून हरणे जंगलाच्या काही मर्यादित भागात राहू लागली. हळूहळू लांडग्यांच्या शिकारीमुळे आणि भीतीमुळे हरणांची पैदासही कमी होऊ लागली.
जंगलातील ठराविक मर्यादित परिसरात हरणे राहू लागल्याने त्यांचं इतरत्र भागातील गवत आणि झाडं खाणं थांबलं. त्यामुळे हरणे राहत असलेला जंगलाचा भाग सोडून उर्वरित जंगलातील गवताची आणि झाडांची वाढ व्यवस्थित सुरू झाली. अगदी सहा-सात वर्षांतच जंगल उत्तम फोफावलं. जंगलामुळे आणि गवतामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागले. मातीची धूपही थांबली. धूप थांबल्यामुळे नदीत गाळ येण्याचे प्रमाण कमी झाले.
मुरलेल्या पाण्याने जमिनीखालचे खडक पाण्याने भरू लागले. पावसाळ्यानंतर याच खडकातले पाणी ओसंडून झऱ्याद्वारे नदीत येऊ लागले. हळूहळू चार महिन्यांवरून सहा महिने नदी वाहू लागली. पुढे हळूहळू सहा महिन्यांवरून आठ महिने आणि नंतर बारमाही वाहू लागली. नदी खळखळू लागली… आता नदीच्या काठावरच्या वाढलेल्या झाडांमुळे काठांची झीज अन् पडझडही थांबली.
अन्नसाखळीचे महत्त्व…
आता जंगलातील वाढलेल्या गवतात विविध किडे आले. त्यांना खाण्यासाठी बेडूक, सरडे आले. त्यांना खाण्यासाठी साप आणि इतर सरपटणारे प्राणी आले. सरडे अन् सापांमुळे शिकारी पक्षीदेखील येण्यास सुरुवात झाली. अगदी सुवर्ण गरुडही तेथे आला. जंगलात फळे आणि गवतात किडे भरपूर प्रमाणात मिळू लागल्यामुळे स्थलांतरित पक्षीदेखील येऊ लागले. हजारो पक्षी इथे एकेका ऋतूत येऊन राहू लागले.
या सर्व पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून बिया टाकल्या आणि त्याची झाडं उगवली. या झाडांचे मोठे वृक्ष होण्याकडे वाटचाल सुरू झाली. नदीत शेवाळ आले, कायम पाणी असल्याने सूक्ष्मजीव आले, त्यांना खाणाऱ्या कीटकांच्या प्रजाती आल्या. हळूहळू मासे आले. मासे आल्यामुळे मुंगसासारखा बिवरेज वा पाणमांजरासारखे सस्तन प्राणी आले.
हे प्राणी मासे पकडण्यासाठी नदीत लाकडं, फांद्या टाकून बांध करू लागली. त्यांनी केलेल्या या सापळ्यांमध्ये मासे अडकून त्यांना मेजवानी मिळू लागली. अशातही अनुकूल परिस्थिती असल्याने नदीत माशांची पैदास वाढतच गेली. त्यामुळे बदकं आली, हेरॉन, बगळ्यांसारखे पक्षी आले. जंगलात बेरीची झाडं आणि माशांची संख्या वाढल्याने अस्वलेदेखील आली. बेरीची फळे आणि नदीतील मासे म्हणजे अस्वलांचं आवडतं खाद्य.
तिथे असलेल्या क्वायटीज या लांडग्यासारख्या दिसणाऱ्या रानकुत्र्यांना लांडग्यांनी मारलं. त्यामुळे या रानकुत्र्यांचे भक्ष्य असलेले ससे आणि चिचुंदऱ्या यांची संख्या वाढत गेली. त्यांची संख्या वाढल्यामुळे तिथे गरुड, बहिरी ससाण्यासारखे पक्षी आले. तसेच लांडग्यांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या मांसावर ताव मारायला गिधाड वर्गातील आणि मांस खाणारे पक्षी आले. हे झाले फक्त मोठे ठळक दिसणारे प्राणी.
याशिवाय इतरही बऱ्याच वनस्पती अन् प्राणी सृष्टी पुनर्प्रस्थापित झाली. झाडं, गवतं, नदी आणि सर्व प्रकारचे जंगलातले प्राणी यांची एक समृद्ध अन्नसाखळी तयार झाली. ती केवळ चौदा लांडग्यांमुळेच. हीच तर खरी गंमत आहे. म्हणजेच अन्न साखळीतील एक दुवा तुटल्यावर अगदी नदीसुद्धा आटू शकते. हे या लांडग्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल.
ही गंमत जैवविविधता, निसर्ग आणि पाणी या सगळ्यांचा संबंध किती दृढ आहे हे सांगणारी सत्यकथा आहे. नदीमुळे ही अन्नसाखळी की या अन्नसाखळीमुळे नदी, याचं उत्तर कोंबडी आधी की अंडे याच्या उत्तरासारखंच आहे, नाही का? निसर्गातल्या सगळ्यांच अन्नसाखळ्या अद्वैत म्हणता येतील अशाच आहेत. माणसाच्या बेफाम अन् बेफिकीर वागण्याने पाणी प्रदूषणासोबतच विविध जल स्रोतांतील पाणी आटले आहे.
यामुळे आपण अन्नसाखळीतील कोणकोणते दुवे नष्ट केलेत, किंबहुना अन्नसाखळीचे अनेक मनोरे (Food chain pyramid) नष्ट केलेत याची यादी मोठी आहे. यात आपल्याबरोबर सृष्टीचा नाश ही ओढवून घेतला जात आहे. त्यातून वाचायचे असेल तर जैवविविधता, अन्नसाखळ्या यांचे आकलन आवश्यकच आहे.
© श्री सतीश खाडे.
मो. 9823030218
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈