श्रीमती उज्ज्वला केळकर
इंद्रधनुष्य
☆ पाळीव प्राण्यांना मिळते साप्ताहिक सुट्टी ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
आजही अशी अनेक क्षेत्रं आहेत, जिथे कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळत नाही. घरातले मदतनीस, सहाय्यक यांनाही आठवड्यातून एक दिवस सुट्टीची आवश्यकता असते, हे मान्य करणारे तर खूपच कमी आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतातल्या झारखंड राज्यातल्या लाहेतर या गावातला एक प्रघात स्तुत्य आणि विचारप्रवृत्त करणारा आहे. हे गाव म्हणजे खरं तर छोटं खेडं. या गावात बहुतांश शेतकरी. त्यामुळे शेती आणि पाळीव प्राणी, हेच नागरिकांचे उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत समजले जातात. म्हणूनच या स्त्रोतांवर आपण मदतीसाठी अवलंबून आहोत, त्यांचा विचार माणुसकीच्या दृष्टिकोणातून करणं गरजेचं आहे, असे संस्कार गावकर्यांवर पिढीजात झालेले आहेत.
शंभर वर्षापूर्वी या गावात एका बैलाचा अति कष्टाने थकून मृत्यू झाला. त्याची बोच पिढ्यान् पिढ्या टिकून आहे. म्हणूनच प्राण्यांना विश्रांती मिळावी, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, यासाठी आठवड्यातून एक दिवस पाळीव प्राण्यांना संपूर्ण आराम करू द्यायचा, असा नियम गावकर्यांनी केला. तेव्हापासून आजपर्यंत या नियमाचं पालन केलं जातय.
आठवडाभर काम केल्यानंतर एक दिवस सुट्टी मिळाली, तर माणूस जसा ताजातवाना होऊन नव्या ऊर्जेने कामाला लागतो, तसंच प्राण्यांच्या बाबतीतही घडत असल्याचं गावकरी सांगतात. या गावाच्या आजूबाजूच्या लोकांनाही ही संकल्पना आवडली आणि त्यांनी ती उचलून धरली. त्यामुळे या जिल्ह्यातील अनेक गावांमधल्या पाळीव प्राण्यांना आठवड्यातून एकदा हक्काची सुट्टी मिळते. कृषिप्रधान असणार्या आणि भूतदयेचा अंगीकार करणार्या आपल्या देशात, पुढील काळात आशा गावांची संख्या वाढणं आवश्यक आहे.
माहेर – सप्टेंबर २०२३ वरून (www.menakabooks.com)
© श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मो. 9403310170, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈