सौ. जयश्री पाटील

🔆 विविधा 🔆

☆ एक सुंदर अनुभव – मनातल्या घरात –  श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

मनातल्या घरात (Self – Introspection)

आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे कां ??? 

एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण, इथे तिथे फिरायला जातोच की !!! मग ती  पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या तरी घरी !!! याच्या त्याच्या घरी, या ना त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी ठरवले, कां नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा ???

हो, हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार !!! आपणच आपल्या मनाच्या  घराला भेट द्यावी म्हंटले, बघावे तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाचे घर !!! कोण, कोण रहातात तिथे ???  कसे स्वागत होत ते ???

ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहचलो. अगदी छोटेसे होते, पण छान होते !!! आत काय असेल, या उत्सुकतेने दार वाजवले, तर आतून आवाज आला, “कोण आहे ???? काय पाहिजे ????” असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती पण खरंच आपण कोण आहोत, हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ???

मी ही सांगितले, “मी *स्व  आहे रे !!! ज्याचे तू कध्धी ऐकत नाही. ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी !!!”

आतून आवाज आला, ” बरं…. बरं…उघडतो दार !!!” दार उघडल्या नंतर आत पाहिले, तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारले, ” कां रे एवढा अंधार ???” तेव्हा तो म्हणाला, ” तुमच्याच कृपेने !!! मी म्हंटले, ” माझ्या कृपेने ??? तर तो म्हणाला, “हो !!! तुझ्याच कृपेने !!! कारण इथे उजेड तेव्हा पडेल, जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील.”

मी ही जरा ऐटीतच म्हणालो, “ठीक आहे… ठीक आहे !!! लावतो दिवे” म्हणत, पुढे सरकलो. थोडं पुढे चाचपडत गेलो तर काय !!! तिथं असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होते. मी त्याला पुन्हा विचारले, “काय रे, त्या खोल्यात काय दडलंय ???”

तो पुन्हा म्हणाला, ” बघ की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते.” मग मी हळूच एका खोलीचे दार उघडले.  आणि…फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावले. तेव्हा तो म्हणाला, ” काय झालं ??? दार कां लावले ???” मी म्हंटले, ” कसले भयानक होते रे ते !!! ” तर तो पुन्हा हसत म्हणाला, ” तुम्हीच गोळा केले आहेत ते !!! तुम्ही ज्यांचा ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे ते कळलं कां ??? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती !!!”

हुश्श…अरे बापरे !!! पुढचं दार उघडायचे धाडसच होईना, पण म्हंटले आता आलोच आहे तर उघडावे. तिथे ज्या काही घटना पहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिस्कीलपणे म्हणाला, ” काय, काय झालं…??? मी म्हंटले, “अरे बाबा, हे काय ??? तो पुन्हा म्हणाला, ” तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करीत गेलास, त्याला मी तरी काय करणार ??? आता तर साठवून ठेवायला या खोल्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत.”

तिथं अशा किती तरी खोल्या होत्या, ज्यांना उघडायच धाडस माझं झालं नाही. मग त्याने त्या उघडून दाखवल्या, ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्षा, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली अशा अनेक खोल्या पाहिल्या, सर्वच्या सर्व अंगावर येत होते.

आता मात्र माझं डोकं गरगरायला लागले, अस्वस्थता वाढली होती. किती भयावह होत ते सर्व !!! त्यामुळे पुढं काय आहे, हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारं भयाण बघून अंगाला काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता.

मी त्याला म्हंटले, “मी जातो आता. मला काही बघायचं नाही आता.” तो म्हणाला, ” थोडं…थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा.”

थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो….तिथं संपूर्ण जाळ लागलेला होता…मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय….आहा…..हा हा…स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होत, तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान शांती ने भरलेले, अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व काही होते.

मी म्हंटले, “काय रे हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी कां नाही दाखवलं ???” तर तो मिस्कील पणे हसत म्हणाला, ” अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे.” मग मी म्हणालो, ” जे आधी पाहिलं, ते काय होतं ???” तो पुन्हा हसत म्हणाला, ” त्या…त्या…तुम्ही अतिक्रमण करत वाढविलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, इर्षा, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी याची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारा पुढे पहारेकरी बनून बसले आहेत, जे तुम्हाला इथं पर्यंत येण्यास अडवत आहेत.”

आम्ही वर्तमान काळात सजग नसतो, त्या वेळी आमच्या स्वभावाची नशा असते, आणि नंतर कळते तेंव्हा पञ्चाताप झालेला असतो…

क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख, आनंदाच्या कडे जाणारा रस्ता, या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता पण ठरवलं की, आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख समाधान, शांती कडे जाणारा मार्ग सोपा करायचा.

बरं झालं. आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं.

मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर, दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची.

साफसफाई करायची म्हणजे काय तर स्व दर्शन म्हणजे ध्यानावर यावे लागेल त्यासाठी ध्यान करावे लागेल…

मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो.. तुम्ही तुमच्या मनाच्या घराला कधी भेट देत आहात ???

आपण सुरुवात छान केलेली आहे..

BE POSITIVE… BE HAPPY

सकारात्मक रहा.. आनंदी रहा..

पत्रकार श्री विकास शहा, तालुका प्रतिनिधी दैनिक लोकमत , शिराळा ( सांगली )

प्रस्तुती – सौ.जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments