श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “महिषासुरमर्दन : ५ अलक…” – लेखिका : श्रीमती भारती डुमरे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
अलक – 1
स्वतःला ढिगभर साड्या असूनही दसऱ्यासाठी खास घेतलेली 3000₹ची साडी कपाटात ठेवताना, मनाशीच म्हटलं- या अष्टमीला नको आता एखाद्या कुमारिकेला ड्रेस घेत बसायला.त्यापेक्षा घरात आहेत, आपण वापरणार नाही,असे रुमाल त्यातच ओटी भरू. नाहीतरी भांडेवालीच्या पोरीला तर घेणार होतो. पण आता खर्च पण खूप झालाय घरातल्यांच्या कपड्यावर.
तेवढ्यात आवाज भांडेवालीचाच
“ताई आज भांड्याचे पैसे द्या बरं का मला.निदान दोनशे तरी द्या.अहो, गल्लीत एक लै गरीब कुटूंब आलंय त्यांच्या पोरीची वटी भरते. एक फ्रॉक घेऊन देते तिला. 200 रु द्या लगेच.”
हिने दिले पण हिला जाणवलं-
मनातल्या स्वार्थाचा महिषासुर मारून गेली ती.
अलक – 2
राजगिऱ्याचे लाडू अगदी घरच्यासारखे आहेत ना,.. बघू made कुठलं आहे.अरे वा! आपल्याच शहरातलं आहे. अगदी घरगुती दिसतंय. पत्ता पण दिला आहे.चला. नाहीतरी 200 लाडू उद्या दुकानातून घेणार होते,अनाथाश्रमात द्यायला.आता ह्या पत्त्यावर जाऊन बघू.
बेल दाबताच थरथरता आवाज आला ‘थांबा’,… गोऱ्यापान आजी आल्या . “या, इथेच तयार होतात लाडू. तशी सधन आहे मी.पण नवरा वारला. लेकी सुना त्यांच्या संसारात मग मनातला एकटेपणाचा महिषासुर त्रास देत होता. रिकाम्या डोक्यात छळ मांडायचा विचारांचे. एक दिवस एक गरजू बाई आली दारात काम मागायला. आणि हे लाडू येतच होते.फक्त बळ नव्हतं. मग सगळंच जुळून आलं.लोकांच्या खाण्यात आणि माझ्या विचारात पौष्टिकता आली आणि एकटेपणाच्या महिषासुराचा बिझी वेळेने वध केला नाही का!
अलक – ३
ती नवीनच हजर झाली नोकरीवर. अतिशय बदमाश मुलांचा वर्ग तिला मिळाला. वर्गातल्या भिंतीवरच्या गुटख्याच्या पिचकाऱ्या तिला बरंच काही सांगून गेल्या. ती दोन पोरंच सगळ्या वर्गाला त्रास देतात हे कळलं तिला. तिने जाहीर केलं- उद्या एक दिवसाची सहल जाणार. कुठे ते सस्पेन्स आहे. ह्या पोरांना तर उधानच आलं. सगळी जय्यत तयारी. फुल गुटखा पुड्यासोबत खिशे भरून. सगळे उत्साहात गाडी थांबली कॅन्सर हॉस्पिटलला. घशाचा, तोंडाचा, व्यसनी कॅन्सर पेशंटला ह्यांनाच प्रश्न विचारायला लावले.सहल संपली. दुसऱ्या दिवशी भिंती स्वच्छ झालेल्या. आजही 20 वर्षानंतरही दोघे येऊन भेटतात. आपल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाची रूपरेषा मॅडमला सांगतात. तिला मनोमन वाटतं,पुस्तकी ज्ञान तर देणं कर्तव्यच होतं माझं,पण तरुण पिढीतील हा व्यसनी महिषासुर मारणं जास्त गरजेच होतं नाही का!
अलक – 4
“आई ग, तेंव्हा जुन्या काळी असतील राक्षस. म्हणून देवीने मारलं त्याला. आता कुठे गं राक्षस? मग कशाला हे सगळं करतो आपण?” ” अगदी खरं, मनु, तुझं म्हणणं. पण रोज आपण देवीला तुझ्या आवडीचे पेढे आणले. ते तुला लगेच खायला मिळत होते का?नाही ना? त्यावेळी तुझ्यातला हावरट राक्षस मारला जात होता. तू धिटाईने, सुरात आरती म्हणत होतीस मग तुझ्यातला स्टेजवर भीती निर्माण करणारा राक्षस देखील मारला गेला. तिची पूजा,तिला हार,फुलं, रांगोळी, सगळं उत्साहाने करताना आपल्यातला आळशी राक्षस पण मारलाच गेला ना? “
मनु म्हणाली, “अग बाई आई,बाबाला पण रोज एक तास आरतीला द्यावा लागला मग त्याचाही मोबाईलबाबा हा राक्षस थोडे दिवस तरी पळाला ना?”आई हसत म्हणाली,” अग बाई, खरंच की!”
अलक – 5
“माझ्याशिवाय घरात काही नीट होणार नाही.बघा तुम्ही,”असं म्हणणाऱ्या छायाताई पडल्या पाय घसरून.ऐन दुसऱ्या माळेला.सगळं सूनबाईवर आलं. निमूटपणे, आरडा ओरडा न करता तिने सगळं नवरात्र व्यवस्थित केलं. छायाताई नवऱ्याला म्हणाल्या,” आपला उगाच भ्रम असतो नाही का, माझ्या शिवाय काही होत नाही.खरंतर आपण निमित्त. करता करविता तोच ना!”नवऱ्याला एवढ्या वर्षांनी तिच्यातील अहंकाराचा महिषासुर मेलेला दिसला.
असे अनेक महिषासुर स्वभावातून, सवयीतुन दिसत असतात जे वाईट असतात . त्यांना संपवणे हेच नवरात्रीचं नव्हे तर अहोरात्री प्रयत्न व्हायला पाहिजेत.
लेखिका – सुश्री भारती डुमरे
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈