? इंद्रधनुष्य ?

☆ “चांगल्या कर्मातच देव आहे…” – अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

॥ चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो, चांगल्या कर्मातच देव आहे ॥ 

“देव बीव सगळं झूठ आहे. थोतांड आहे. ‘मेडिकल सायन्स’ हाच खरा परमेश्वर आहे. गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्समुळे जेवढे प्राण वाचले असतील, तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत. मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे ‘ऑपरेशन थिएटरच्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात.” — डॉक्टर कामेरकरांच्या ह्या वाक्यावर, सभागृहात एकच हशा उठला. डॉक्टर कामेरकर एका ‘मेडिकल कॉन्फरन्स’ मध्ये बोलत होते…  डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर. त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत.

कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले. वाटेतच त्यांच्या ‘मिसेस’ चा मेसेज होता की ” मी आज पार्टीला जातेय. मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत. जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय. घरी गेलात की 

जेवा “. डॉक्टर घरी आले. हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले. जेवण आटोपल्यावर लक्षात आलं, की बरचस जेवण उरलय. आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं. म्हणून उरलं सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधल आणि कुणातरी भुकेलेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले.

लिफ्टमध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं. ” देव बीव सगळं झूठ आहे ” हे वाक्य त्यांच्या भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं. डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक, देव अशी कुठलीही गोष्ट, व्यक्ती, शक्ती जगात नाही ह्यावर ठाम. ‘ जगात एकच सत्य. ‘मेडिकल सायन्स’… बाकी सब झूठ है ‘

डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले. जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं. ते त्या दिशेने चालू लागले. जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक मध्यम वयाची बाई, आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे. ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं. ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती. डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई तिच्या मुलाला म्हणाली “बघ बाळा. तुला सांगितलं होतं ना. आज आपल्याला जेवायला  मिळेल. देवावर विश्वास ठेव. हे बघ. देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलय”. हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते त्या बाईवर कडाडले, “ओह शट-अप. देव वगैरे सगळं खोट आहे. हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय. देव नाही. हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो. पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय. काय देव देव लावलयस. नॉन – सेन्स. “

“साहेब. ! हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलत ह्यासाठी मी तुमची आभारी आहे. पण साहेब. देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो. माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस, हा देवच आहे. आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधायला जातो एवढंच. माझ्यासाठी तुम्ही ‘देव’ च आहात साहेब. आज माझ्या लेकराच तुम्ही पोट भरलंत. तुमचं सगळं चांगलं होईल. हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला. “

डॉक्टर कामेरकर त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले. एक रोगट भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती आणि ते ह्याच विचारात दंग झाले की ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ? चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो. चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे. चांगल्या माणसात देव आहे. प्रत्येक ‘सतकृत्यात’ देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही ? आपण ‘देवावर विश्वास’ ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ?  तर आपल्याला चांगली माणसं भेटतील, चांगली परिस्थिती निर्माण होईल ह्यावरच तो विश्वास असतो. डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं. आपल्या भुकेल्या लेकराला ती माऊली भरवत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. एक कणखर, डॉक्टर त्या दोन अश्रूत त्याचा इगो  विरघळला होता. डोळे मिटून, ओघळत्या अश्रूंनी, डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते…

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
2 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments