सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
जीवनरंग
☆ आली माझ्या घरी ही दिवाळी… ☆ सुश्री स्वप्ना मुळे (मायी) ☆
बेडरूमच्या खिडकीचं तोरण निसटलं म्हणून ती लावत असताना त्याने खोडकरपणा करत आपल्या हातांचा विळखा तिच्या कमरेला घातला,… तशी ती डोळे वटारून म्हणाली, ” नेहमी सारखे राजराणी नाही आपण घरात,… दिवाळीचं माणसांनी घर गच्च भरलंय माझं,…” तो म्हणाला, “तुलाच हौस होती सगळयांनी एकत्र दिवाळी करण्याची,…” ती लाडात म्हणाली, ” हम्म मग एकटी असते तर तू तर अभ्यंग स्नानही घालशील मला,”…
तिला अलगद कड्यावर घेत त्याने खाली उतरवलं आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला,
“खूप thanku,… माझ्या खेड्यातल्या आई बाबांना आणि भाऊ, वहिनीला इतकं मानाने आणि प्रेमाने बोलवलं तू दिवाळीला,… खरंच मला खुप आनंद वाटतोय ग अगदी खरी दिवळी झगमगली आहे मनात,…”
ती म्हणाली, “अरे thanku काय त्यात,…? सून म्हणून मला माझीही कर्तव्य करायलाच पाहिजे ना,…एरवी आपण दोघेच तर असतो ह्या एवढ्या मोठ्या घरात,… आणि आज तू जे काही मोठ्या पदावर आहेस ते तुझ्या आई वडिलांमुळे,… त्यांना विसरून कसं चालेल,…? असले जरी खेड्यातले तरी खुप मायाळू आहेत रे,… खुप प्रेमाने वागतात आणि नाही वागले तरी मलाही सहन करता आलं पाहिजे ना,… कारण वर्षात काही दिवस तर येतात,… आणि तू खुश तर मग खरा संसार आणि खरी दिवाळी नाही का आयुष्याची,…?”
तेवढयात सासुबाई आल्या,.. दोघे उगाच खोकल्यासारखं करून दूर झाले,… तेव्हा सासुबाईच हसून म्हणाल्या, ” अरे मीच चुकीच्या वेळी आले वाटतं,.. पण मी फक्त एवढंच सांगायला आले,.. अरे आज पाडवा सूनबाईला काहीतरी छान भेट घेऊन ये,… लवकर जाऊन या मी स्वयंपाक करून ठेवते,… आपली ताई पण येईलच उद्याच्या भाऊबीजेला,…”
दोघे बाहेर पडले. तिने मात्र स्वतःला सोडून सगळ्यांसाठी छान साड्या घेतल्या,… भाचे,पुतण्या सगळ्यांसाठी गिफ्ट घेतले,… तो म्हणाला आणि तुला काय घ्यायचं,… ती म्हणाली, ” इतकं भरलं घर दिलंस मला,… अरे शिक्षण नोकरी असली तरी शेवटी अनाथाश्रमात वाढलेली मी ह्या माणसांच्या सुखासाठी फार तरसली आहे रे,… ते सुख तुझ्यामुळे मिळालंय मला,.. आता काही नको,… नेहमी अशीच आनंदी दिवाळी राहू दे आयुष्यात,…”
संध्याकाळी औक्षणात त्याने आईलाही साडी दिली,… सासुबाई म्हणाल्या, ” सुनबाई चांगली जादू केली माझ्या मुलावर अग आजपर्यंत त्याने काही घेतलं नाही मला,.. मला तशी अपेक्षा नव्हती ग,… पण आपल्या लोकांसाठी असं मनातून घ्यावं वाटलं पाहिजे,… प्रेम त्या वस्तूवर नसतं ग,… पण ज्याच्यासाठी घ्यायचं त्या व्यक्ती विषयी असतं,… आणि ह्या क्षणांच्या ह्या आठवणी असतात,… खरंतर त्या वस्तूशी निगडित नसल्या तरी त्या वस्तूसोबत आलेल्या भावनेत असतात ना,… खेड्यात रहात असल्या तरी विचाराने किती प्रगल्भ आहेत ह्याचं तिला कौतुक वाटलं,…
तिने त्याला औक्षण केलं,… खिशातील 100 रु ची नोट त्याने ताटात टाकली,… तेवढ्यात सासरेबुवानी एक पॅकेट त्याच्या हातात दिलं,… हे दे सुनबाईला आणि म्हणाले…” अरे ह्या सासु सुना सारख्याच असतील माहीत होतं मला,… तुझ्या आईने पण पहिल्या दिवाळीला असंच सगळ्या साठी घेतलं स्वतःला नाही,… मग माझ्या वडिलांनी असंच खोक ठेवलं होतं हातात,… सुनबाई बघा भेट आवडते का,…?”
तिने हसत ते उघडलं,… गिफ्ट बघून तिला आश्चर्यच वाटलं,… तिला आवडलेला तो मोत्याचा तन्मणी,…” अय्या बाबा,तुम्हाला कसं कळलं मला हेच पाहिजे होत,…?” बाबा मघाशी आलेल्या ताईकडे म्हणजे तिच्या नणंदेकडे बघून हसले,… नणंद म्हणाली, ” अग तू ऑनलाइन ज्या ग्रुपवर तन्मणीची चौकशी केलीस त्या ग्रुपवर मी पण आहे,… मग ठरलं माझं आणि बाबांचं,…”
तिचे डोळेच भरून आले,… गळ्यातला तन्मणी अजूनच खुलून दिसत होता,… माणसं जपायची तिची दिवाळी सुरुवात छानच झाली होती,… भरल्या घरातुन,…. सगळे तोंडभरून आशीर्वाद देऊन गेले,… दिवाळीही गेली. तरीपण हिचं गाणं गुणगुणणं सुरूच होतं,… ” सप्त रंगात न्हाऊन आली आली माझ्या घरी ही दिवाळी,…”
नाते जपण्याची,प्रेमाची,चैतन्याची दिवाळी एकमेकांना जुळवून घेत अशीच प्रत्येकाच्या आयुष्यात येवो …
© सुश्री स्वप्ना मुळे (मायी)
मो +91 93252 63233
औरंगाबाद
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈