सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ बृहन्नडा… भाग-१ – लेखिका : सुश्री संगीता मुकुंद परांजपे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

आज सुगंधाच्या मनात संमिश्र भावना होत्या. लग्न होऊन उद्या सासरी जाणार होती ती. आज तिची हळद होती. सगळ्या मैत्रिणी, नातेवाईक गोळा झाले होते. त्यात ‘तो’ पण होता. त्याला ‘तो’ म्हणायचं खरं पssssण !!!!! त्याची सारी लक्षणं ‘तो’ च्या ऐवजी ‘ती‘ ची होती. त्याचं नाव होतं खंडू. खंडोबाच्या नवसानं झालेलं पोर म्हणून त्याचं नाव खंडोबा च ठेवलं होतं. लवकरच खंडोबाचं खंडू झालं आणि आता त्याला सगळे खंडू, खंड्या असं म्हणत. सुगंधाच्या बाबांना तो त्यांच्या घरी आलेला अज्जिबात आवडत नसे. पण त्याच्यापुढे सगळ्यांनी हात टेकले होते. त्याला कितीही ओरडा, बंदी घाला तो कशाकशाला म्हणून जुमानत नसे. तात्पुरता बाजुला होई आणि दहा मिनिटांनी बघावं तर स्वारी परत हजर. सणसमारंभात बायका काय काम करतील असं काम करत असे हा!! बायकी चालायचा, बायकी बोलायचा. सगळ्या आवडीनिवडी सुद्धा बायकीचं होत्या. सुगंधाच्या बाबांच्या सख्ख्या बहीणीचा मुलगा होता तो. म्हणजे सुगंधाचा आत्तेभाऊ. सुगंधा जन्माला आली तेव्हा हा आठदहा वर्षांचा होता. एकाच गावात दोघांची घरं होती. सुट्टीत आईच्या मागे लागून तो सुगंधाच्या म्हणजे त्याच्या मामाच्या घरी रहायला येई, लहानग्या सुगंधाला तो मांडीवर घेई आणि अतिशय छान सांभाळे. तिला अगदी छान खेळवत असे तो. रडली तर कडेवर घेऊन फेऱ्या मारून शांत करत असे. वेळ पडली तर अंगडी टोपडी बदले.. छान पावडर लावून एखादया बाईला लाजवेल असं तयार करीत असे. सगळे जण आश्चर्य करत. आणि चेष्टाही !! पण त्याला त्याचं काहीच वाटत नसे. त्याच्या मनाला येईल, वाटेल तसंच तो वागे. शाळेत  एक दिवस वरच्या यत्तेतील मुलांनी नको त्या जागी हात लावून तो मुलगा आहे की नाही याची खात्री करण्याचा प्रसंग शाळेत घडल्यानंतर त्याने शाळेला कायमचा रामराम ठोकला. ती मुलं अचकट विचकट इशारे करून एकमेकात खिदळत होती, त्याला चिडवत होती.. परत परत त्याच्या मागे लागत होती. अतिशय सालस, मनस्वी आणि कोमल मनाचा खंडू रडवेला होऊन जीव घेऊन त्या दिवशी जो शाळेतून पळत सुटला तो थेट आईच्या कुशीत येऊन कोसळला. घडला प्रसंग आईला सांगताच ती सुद्धा धाय मोकलून रडली होती. हबकून गेली होती बिचारी. तिला तिच्या लेकराची होणारी कुचंबणा कळूनही त्याला जवळ घेण्यापलीकडे ती काहीच करू शकत नव्हती. खंडूचा बाप खंडूच्या बायकी असण्याचा वागण्याचा राग राग करू लागला होता. खंडोबाला नवस करून पोटाला आलेलं पोर असं निपजलं म्हणून त्यानं आजकाल खंडेराया चं नाव सुद्धा टाकलं होतं. आणि अश्या पोराला जन्म दिला म्हणून बायकोला सुद्धा. खंडूला सुगंधाचा भारी लळा होता. मामाची नजर चुकवून सुगंधाशी खेळायला हमखास येत असे तो. सुगंधाची आई आपल्या गरीब गायीसारख्या नणंदेकडे बघून खंडूला घरात घेई. तिलाही त्याची दया येई पण सुगंधाच्या वडिलांपुढे तिचंही काही चालत नसे. जमेल तसं खंडूला आणि त्याच्या आईला मानसिक आधार द्यायची ती. हसताना खंडूच्या  गालाला पडणाऱ्या खळीने त्याचं हसू निर्व्याज परंतु चेहरा आणखीनच बायकी भासे. बापानं नाकारलेलं अन् गावानं चेष्टेचा विषय बनवलेलं लेकरू बिचारं जमेल ते पडेल ते काम करून जगायला शिकलं होतं. कुणी पैसे हातावर ठेवत तर कुणी फक्त पोटाला काही बाही देत.. तर कुणी असंच राबवून घेत.. वर कुचेष्टेने हास्यविनोद करत. पहाटेच उठून तो कुणाच्या शेतावर राबायला जाई तर कुणा घरच्या समारंभात पडेल ते काम करी. कधी रंगाऱ्याकडे तर कधी इलेक्ट्रिकल  कंत्राटदाराकडे.. अगदी तालूक्यापर्यंत जाई कारण तिथे कामाच्या संधी जास्त मिळत. रात्र झाली की पडवीत थकून भागून झोपी जाई. ते निरागस आणि बाप असूनही पोरकं झालेलं लेकरू पाहून आईचा जीव तीळतीळ तुटत असे. ती रात्री त्याच्या डोक्यावर तेल घाली जणू इतक्या लहान वयात त्याच्या डोक्याला झालेला ताप तिच्या परिने ती शांत करू पाही. त्याच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवून त्याचा मुका घेई. ती रोज त्याच्या बापाची नजर चुकवून त्याला भाजी भाकरी, ठेचा, कधी कालवण अन् भात, कधी सणावारी खीर पुरी असं काही बाही शिदोरीत बांधून देई. तेवढचं तिच्या हाती होतं. असं करत करत खंडू आता मोठा झाला होता.. तरणाबांड झाला होता. पण बोलणं चालणं वागणं बायकीच. आणि आता तर ते जास्तच ठळकपणे जाणवत असे. काबाडकष्ट करून तयार झालेलं राकट दणकट शरीर आणि आतं मन मात्र एका स्त्रीचं!! अशी विचित्र सांगड दैवानं घातली होती. एका लग्नात काम पूर्ण झाल्यावर यजमानांनी खंडूला पैश्यांबरोबरच साडी चोळी आणि बांगड्याही दिल्या. पाहुण्यांच्यात खसखस पिकली. वर यजमान मिशीला पीळ देत मर्दुमकी गाजवल्यासारखे हसले !!!! खंडूच्या जिव्हारी हा अपमान लागला परंतू गरजवंताला अक्कल नसते या नियमाने त्याने तो अपमान चहाच्या घोटाबरोबर गिळून टाकला. परंतू ती हिरव्या रंगाची जरिकिनार असलेली साडी बघून त्याचं मन हरखून गेलं. त्या दिवशी लगोलग शेतांत जाऊन त्याने ती साडी नेसली, बांगड्या घातल्या. दाढी मिशी काढून घोटून घोटून चेहेरा गुळगुळीत केला. त्याने हात हलवून बांगड्यांचा किणकिणाट करून पाहिला. पदराशी चाळा करत स्वतःभोवती आनंदातिशयाने गिरकी घेतली. आज त्याच्या काळजांत त्याला सुख सुख जाणवत होतं. त्या साडी चोळीत त्याच्यातलं स्त्रीपण त्याला दृश्य स्वरूपात सापडलं होतं. त्याची मनीषा पूर्ण झाल्यासारखी त्याला वाटत होती. स्त्रीसुलभ भावना अधिकचं जागृत झाल्या होत्या. काय करेल बिचारा.. खंडोबाने त्याच्या आयुष्याचा पुरता खेळखंडोबा करून ठेवला होता. निसर्गानं केलेली चूक आयुष्यभर भोगायची होती त्याला. हा जो काय वणवा दैवानं त्याच्याभोवती आणि त्याच्या आतं पेटवला होता तो कसा विझवणार होता तो? चापून चोपून साडी नेसल्यावर आरश्याच्या फुटक्या तुकड्यांत स्वतःला पाहून तो अपरिमित खूश झाला. पण त्याला माहीत नव्हतं की त्या आरशाच्या फुटक्या तुकड्यासारखंच त्याचं नशीबही फुटकंच आहे ते. काही गोष्टी वगळल्या तर तो त्याच्या जगात खूश होता. काळोख झाल्यावर; नेसलेली साडी आईला दाखवायला तो मोठ्या कौतुकानं मागच्या दाराने घरी गेला. आईने त्याला ओळखलच नाही. त्याने बोलायला तोंड उघडलं आणि त्याच्या तोंडून आई म्हणून हाक ऐकताच ती माऊली त्याचं ते रूप बघून जी बेशुद्ध पडली ती परत उठलीच नाही. साडी चोळी आणि बांगड्यांनी डाव साधला होता!! खंडू उर फुटेस्तोवर रडला त्या दिवशी आणि त्या दिवसापासून तो वेशीवरच्या खंडोबाच्या देवळात कायमचा वस्तीला गेला. ज्याच्या नवसाने जन्माला आलो त्यांनाच आता माझी काळजी घ्यावी असंच जणू त्याला म्हणायचं होतं.

इकडे सुगंधाही मोठीं झाली होती. सुगंधा त्याला अहो खंडूदादा म्हणायची. मान द्यायची, मोठेपणा द्यायची जो त्याला कुठेही मिळत नव्हता. दोघांच्या हृदयात एकमेकांबद्दल अपार प्रेम होतं. त्याच्या आईनंतर जर कुणी त्याला प्रेम दिलं असेल तर ती फक्त सुगंधाचं होती. लहान लेकराला लिंगभेद समजत नसतो. त्याला कळतो तो फक्त स्पर्श.. प्रेमाचा स्पर्श.. आवाजातला ओलावा.. मग तो हात किंवा आवाज कुणाचाही असो स्त्री, पुरुष, किंवा किंवा खंडूसारखं कुणी !!! खंडू ज्या प्रेमाने तिला लहानपणी सांभाळी ते प्रेम अन् ती मायाचं त्या दोघातला घट्ट दुवा बनली होती. त्याचा अतिशय लळा होता तिला. अगदी तिच्या बाबांना तो आवडत नसला तरीही. आणि आज तिच्या हळदीच्या प्रसंगाला म्हणूनच तो तिच्या घरी आला होता. तिने लग्न होईपर्यंत तिथेच रहाण्यास त्याला बजावले होते आणि बाबांच्याही गळी उतरवले होते. खंडूने आल्या आल्या सांगून टाकले होते की तो सुगंधाची पाठराखीण म्हणून लग्न झाल्यावर तिच्या सासरी जाऊन महिनाभर तरी रहाणार आहे म्हणून. सुगंधाच्या बाबांना हे ऐकून चक्करच यायची बाकी होती. पण सुगंधाच्या आईने खाणाखुणा करून त्यांना म्हंटल असू दे हो. हो म्हणा आत्तापुरतं. नंतर सुगंधानी समजावल की ऐकेल तो. हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर त्यानेही मोठ्या प्रेमाने सुगंधाला हळद लावली. तिच्याकडे पाहून त्याचे डोळे झरू लागले. बाकीच्या बायका हळद लावायला रांगेत उभ्या होत्या म्हणून रडणं आवरत तो बाजूला झाला.

– क्रमश: भाग पहिला 

लेखिका : सुश्री संगीता मुकुंद परांजपे

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments