इंद्रधनुष्य
☆ पांडवकालीन किरीट… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
दीपावली लक्ष्मीपूजन व सोमवती अमावस्येनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग मंदिरात दुर्मिळ असा प्राचीन रत्नजडीत मुकूट व सुवर्ण मुखवटा भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या मुकुटाला स्थानिक जन पांडवकालीन किरीट संबोधतात.
हा मुकूट अत्यंत मौल्यवान असून आजच्या बाजारभावानुसार सोने व रत्नांच्या किंमतीचा विचार करता त्याचे मुल्य २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, मात्र त्याचे प्राचीनत्व लक्षात घेता हा मुकूट अत्यंत अमोल आहे. या मुकुटाचे उल्लेख सहाशे वर्षांपूर्वीच्या कागदपत्रात सुद्धा सापडतात.
शुद्ध सोन्याच्या या मुकुटाचे तीन भाग असून देशविदेशातील अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान रत्ने जडविलेली आहेत. पैलू न पाडलेले हजारो अतिदुर्मिळ गुलाबी हिरे, पाचू, माणिक, पुष्कराज, श्रीलंकेतील नीलम, अति मूल्यवान बसरा मोती या मुकुटावर जडवलेली आहेत. मुकुटाच्या आतील बाजूवर प्राचीन कन्नड लिपीत अक्षरे कोरलेली आहेत.
असा हा अतिशय मौल्यवान मुकुट सुर्याजी त्रिंबक प्रभुणे या मराठा सरदाराने इसवी सन १७४०मध्ये त्र्यंबकगडावरील विजयाप्रित्यर्थ श्री त्र्यंबकराजाच्या चरणी अर्पण केला. हा मुकुट पूर्वी म्हैसूरच्या राजघराण्याच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून तो मोगलांनी लुटला. नंतर मराठ्यांनी दिल्ली काबीज केल्यानंतर अनेक जडजवाहिरांसमवेत तो पेशव्यांच्या खजिन्यात दाखल झाला व नंतर वर उल्लेख केल्याप्रमाणे त्र्यंबकेश्वराच्या पदरी आला. मंदिराच्या खजिन्यात असल्यामुळेच इसवी सन १८२० मध्ये ब्रिटीशांनी त्र्यंबकच्या केलेल्या लुटीतून तो बचावला.
या मुकूटासोबतच पेशव्यांनी पंचमुखी सुवर्णमुखवटाही श्री त्र्यंबकेश्वरास अर्पण केला. हा मुखवटाही शुद्ध सोन्याचा असून तब्बल साडेनऊ किलो वजनाचा आहे. हा मुखवटा दर सोमवारी कुशावर्त तीर्थात स्नान झाल्यानंतर नगरप्रदक्षिणेदरम्यान पालखीतून मिरवला जातो. भाविक दुतर्फा उभे राहून दर्शन घेतात.
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈