श्री मनोज मेहता
मनमंजुषेतून
☆ “हाय फाय, न्हाय काय“… ☆ श्री मनोज मेहता ☆
माझ्या वडिलांचं इंग्रजी अतिशय उच्च दर्जाचं होतं. मला मराठीत कमी मार्क मिळाले तर ते खूप ओरडायचे, पण इंग्रजीत कायम काठावर पास होऊन सुद्धा कधीच काही बोलले नाहीत.
माझे सर्व नातेवाईक अजूनही सांगतात की तू ३/४ वर्षांचा असताना सन, मून, दुडियाच वगैरे शब्द मध्ये टाकत ३० मिनिटं थुकी न गिळता भाषण करायचास.
तर मंडळी आजही माझं इंग्रजी असं-तसंच आहे, तरीही माझ्या मैत्र खजिन्यात, परदेशी मित्रांची मोठी संपत्ती आहे. मनापासून सांगतो, मी भारत भ्रमंती करतो त्यावेळी मी फॉरेनर ह्या आकर्षणामुळे सहज त्यांच्याशी गप्पा मारायला जायचो, अन् पुढे ते माझे छान मित्र-मैत्रिणी झाले. ते सगळे आजही संपर्कात आहेत, हे माझ्यासाठी विशेष आहे.
आता तुम्ही म्हणाल ‘त्यात काय इतकं ?’ हं, इथेच तर खरी गंमत आहे. हाय, हॅल्लो, व्हॉट इज युअर गुड नेम?, यु कमिंग फ्रॉम?, व्हॉट आर यु डुइंग? डु यु लाईक इंडिया? ओह, या या, हं, ओके ओके, वाव व्हॉट अ लव्हली, गिव मी युअर एड्रेस प्लिज, ओके सी यु अगेन, बाय!
हसू नका, माझ्याकडून इतकं इंग्लिश संभाषण म्हणजे भरपूर झालं हो! पण त्यांचं बोलणं मला कळतं आणि मग माझं टेबल टेनिस सुरु होतं. आणि म्हणूनच आमची गट्टी हो. असो, माझ्या व्यवसायात खऱ्या अर्थाने माझी परीक्षा देवानेच घ्यायची ठरवली म्हटल्यावर काय ?
बायर इंडिया हे माझं अशील. (क्लायंट) डोंबिवलीचा माझा मित्र, ज्येष्ठ गिर्यारोहक श्री. सतीश गायकवाड ह्याच्या कडून १९८३ ला युनियनच्या सदस्यांचे फोटो काढायची पहिली ऑर्डर मिळाली अन् चांगल्या दर्जाच्या फोटोमुळे बघता-बघता अर्थातच मी तिथल्या प्रत्येकाचा मित्रही झालो.
एके दिवशी अचानक मला ठाणे- कोलशेत ऑफिस मधून श्री. पाटणकर यांचा दूरध्वनी आला, “मनोज, तुला आव्हानात्मक छायाचित्रं काढायची आहेत, दुपारी दोन पर्यंत पोच.”
मग काय स्वारी खूष! मी कपंनीत पोचल्यावर त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. ती हकीकत अशी होती की, ‘मुंबई ऑफिस मधून हे पार्सल आलेलं होतं. मुंबईच्या फोटोग्राफर्सनी केलेली कामं आवडली नाहीत, म्हणून आता हे आपल्याला आव्हान म्हणून स्वीकारून, टकाटक करून दाखवायचं आहे.
मी कामाला लागलो. सुमारे दोन तासांनी पूर्ण केलं व उद्या मी फोटो घेऊन येतो, असं सांगून मार्गस्थ झालो. माझी स्वतःची रंगीत फोटोची लॅब असल्यामुळे, रोल डेव्हलप करून झक्कास प्रिंट्स बनवून बायर इंडिया कोलशेत ऑफिसला पोचलो. ती देशपांडे सरांना दाखवताच ते अन् पूर्ण ऑफिसातले सगळे उडालेच! “मनोज, यार तू कमाल आहेस, मस्त मस्त !” असं म्हणत त्यांचे बॉस म्हणजेच जर्मन डायरेक्टरना त्यांनी ते दाखवले. त्यांनाही आनंद झाला, “ब्युटीफुल फोटोज् !” मान वरखाली करून त्यांनी मला दाद दिली.
दोन दिवसांनी मी बिल दिलं तर फोटो पाहून उडाले होते, त्यापेक्षा जास्तच उडाले. “तू काय स्वतःला मोठा फोटोग्राफर” वगैरे… सुरु झालं. “इतकं बिल? अजिबात इतके पैसे मिळणार नाही,” हे पांच सहा दिवस सुरु होतं.
शेवटी मी त्यांना संगितलं की “मला तुमच्या डायरेक्टरला भेटायचं आहे, मला अपॉइंटमेंट घेऊन द्या.”
इकडे माझ्या घरी अजून वेगळाच धुमाकूळ. “स्वतःला काय समजतो, तुला इंग्रजी बोलायला येत नाही अन् कोणाला भेटायला चाललाय, व्यवसाय करायची अक्कल नाही” वगैरे मोठ्या बंधूनी हाणला.
खरंच मला इंग्रजी बोलायला येत नाही, पण मी स्वतःशी ठाम होतो. काहीही झालं तरी माझं म्हणणं मी पटवून देणार, कारण मी खरा होतो.
तारीख, वेळ ठरली. मी श्री. केलर साहेबांच्या केबिनमध्ये शिरल्यावर, लगेच त्यांनी मला हॅलो, करून शेकहँड केला. उंचेपुरे, निळे डोळे आणि सोनेरी केस, क्या बात! प्रसन्न व्यक्तिमत्व! मला चहा की कॉफी विचारून फोनवर ऑर्डर दिली, अन मी सुरु झालो ना ! “नमस्ते, गुड मोर्निंग सर, आय एम् मनोज, प्रोफेशनल फोटोग्राफर, धिस जॉब इज ॲबसुल्यूटली कमर्शिअल, अँड माय ब्रेनी वर्क, धिस इज नॉट फंक्शनल फोटोग्राफी, सो आय सबमिटेड द बिल! प्लीज, सर यु अंडरस्टॅण्ड ना ?”
तोपर्यंत चहा आला, पांढरे चौकोनी तुकडे चमच्यात घेत, त्यांनी विचारलं “हाऊ मच?” मी गोंधळून म्हटलं “फ फोर!” माझ्या आयुष्यात प्रथमच साखरेचे क्यूब पहात होतो. काय सांगू .
ती माझी दोन तासांची आयुष्यातील पहिली प्रोफेशनल मिटिंग, साखरेपेक्षा गोड झाली. माझं म्हणणं मी पटवून दिलं, ते त्यांना पटलं अन् लगेच मुंबई ऑफिसला फोन करून, त्यांनी माझं बिल द्या म्हणून ऑर्डरच काढली.
मी खूष होऊन त्यांना अक्षरशः मिठी मारली व डोंबिवलीला येण्याचं आमंत्रण दिलं आणि मला एका आठवड्यात चेक मिळाला.
इकडे केलर साहेबांच्या कॅबिन बाहेर बसलेल्या माझ्या मित्राला घाम फुटला होता.
मंडळी, बरोब्बर पंधरा दिवसांनी रविवारी श्री. केलर, त्याची बायको, मुलगी व मुलगा चौघेही आमच्या बंगल्यात चक्क जेवायला आले. माझा भाऊ आणि वहिनींबरोबर त्याचं बोलणं सुरु होतं. मध्येच मी “या, या, परफेक्ट !” म्हणून दाद द्यायचो. मजा करून मंडळी निघाली, तेव्हा केलर यांची मुलं मलाही चल म्हणत होती. हा माझ्यासाठी आयुष्यातला खास क्षण होता, आहे व चिरंतन असणार.
माझ्या या ‘मैत्र पोतडी’त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, इराण, नेदरलँड्, चायना, जपान, सिंगापूर, कॅनडा, अमेरिका व भारतातील विविध राज्यातील मित्र-मैत्रिणी आहेत. उगाच नाही अमेरिकेत जाऊन आंतरराष्ट्रीय टुरिस्ट बसमध्ये, मी ‘लाल टांगा घेऊनी आला’ हे मराठी गाणं गायलं.
जगात कुठेही फिरा, काम करा, मजा करा, मनापासून स्वतःवर प्रेम करत असाल, तर भाषेची भिंत कधीच आड येणार नाही.
© श्री मनोज मेहता
डोंबिवली मो ९२२३४९५०४४