सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ आठवणींचा त्रिपूर…! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आज त्रिपुरी पौर्णिमा! दसरा- दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते! त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो!
तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो. लहानपणी त्रिपुर पाहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू! वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून गेलेली दिसत असे.गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दीपमाळा मी खूप पाहिल्या..
त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही,असा वर मागून घेतला.या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना मुद्दाम खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना .देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली, तेव्हा शंकरांनी त्रिपुरासुराची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाऊ लागले.
या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. एकादशी पासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध आणि शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.
पण….. माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला. सासुबाई सांगत, “समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला.” त्याकाळी जन्म वेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! त्यामुळे लग्नानंतर तारखेपेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला यांचा वाढदिवस साजरा केला जाई!
सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात माझे धाकटे दीर आणि मुले यांचा पुढाकार असे. आम्ही सर्वजण पणत्या, मेणबत्ती घेऊन त्रिपुर लावण्यास मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या प्रकाशाने उजळून गेलेले पाहण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे.शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे निरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खूपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!
प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस ऊबदार शालीत गुरफटून घेत डिसेंबर, जानेवारी येतात., पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.
ह्यांच्या आयुष्याचा एक एक त्रिपुर पूर्ण होत असताना मनाला खूप आनंद होतो! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो, असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे ह्यांना कायम मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरदः शतम्!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈