सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
इंद्रधनुष्य
☆ आंदोलनं झोक्याची–झेप फिनिक्सची – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
श्रावण महिना. नागपंचमीचे दिवस . छान गोड हिरवाईचा पसरलेला सुगंध, मोठ्या वडाच्या झाडाला ,एका मोठ्या फांदीला, एक मोठा झोका बांधलेला होता. मुली झोका खेळत होत्या. झोका उंच उंच चढवत होत्या. झोका जास्त उंच जायला लागल्यावर मात्र बाजूला उभ्या असलेल्या बघ्यांचा दंगा, आरडा ओरडा चालू व्हायचा. झोका खाली यायला लागल्यानंतर मात्र मुलींना पोटात खड्डा पडल्यासारखं व्हायचं. झोक्याबरोबर सगळेच छान रंगले होते . सगळं दृश्य मी गॅलरीत बसून पाहत होते. झोक्याची ती आंदोलनं पहात असताना, मला सीताबाई म्हणजे, पूर्वाश्रमीच्या ‘ हेमवती ‘ या एका कर्तबगार स्त्रीने , उंच झोक्याचे स्वप्न पाहिले होते, त्याची आठवण झाली . सांगलीची हेमवती ही भावंडाची सर्वात मोठी बहीण. तिच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत असं रूप ! चेहऱ्यावर एक प्रकारच्या टवटवीतपणाचं सौंदर्य, सुडौल बांधा , विपूल केश संभार, आत्मविश्वासू वृत्ती, आणि तडफदार भाषा असंच व्यक्तिमत्व होतं तिचं. मुलींनी जास्त शिक्षण घेणं , त्या काळातल्या समाजाला मान्य नव्हतं . काळच वेगळा होता तो. हेमवतीच चौथीपर्यंतच शिक्षण झालं. आता शिक्षण भरपूर झालं ,पुरे आता शिक्षण, असा घरात विचार सुरू झाला. हेमवती अभ्यासू वृत्तीची, हुशार, नवनवीन खाद्यपदार्थ शिकण्याची आवड, शिवणकाम, विणकाम, भरतकाम ,सगळ्या कला पुरेपूर अंगी बांणलेल्या होत्या.
हेमवती आता 13 -14 वर्षाची झाली . म्हणजे काळानुसार उपवर झाली . स्थळं बघायला सुरुवात झाली. कोणीतरी कोल्हापूरच्या मुलाचं सुयोग्य वर म्हणून स्थळ सुचवलं . मुलगा रामचंद्र हा मुंबईला पोस्टात अधिकारी पदावर नोकरीला होता. कोल्हापूरला स्वतःचं घर, घरात सासू-सासरे , दीर, असं घर भरलेलं होतं आणि सर्वात भावलं म्हणजे श्री अंबाबाईच्या वासाचं पवित्र तीर्थक्षेत्र — दक्षिणकाशी अस कोल्हापूर.
दोन्हीकडूनही नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. पसंता पसंती झाली. लग्न ठरलं. आणि झालंही. रामचंद्र यांनी आपल्या नावाशी अनुरूप असं पत्नीचं नाव ‘सीता ‘ असं ठेवलं.’ हेमवती’ आता ‘ सीताबाई ‘ झाल्या.
रामचंद्र आणि सीताबाईंचा मुंबईला आनंदाने संसार सुरू झाला. माहेरी दहा-बारा जणांच्या कुटुंबामध्ये राहिलेल्या, सीताबाईंना , मुंबईला प्रथम एकाकीपणा वाटायला लागला. पण नंतर त्या लवकरच छान रुळल्या . काही दिवसातच पाळणा हलला आणि कन्यारत्न झाले .खरोखरच ‘रत्न ‘ म्हणावी अशीच गोरीपान , सुंदर , घारे डोळे अगदी तिच्याकडे पहात रहावं असं रूप! सासरच्या घरातली पहिली नात. कोल्हापूरची म्हणून अंबाबाई असं नामकरण झालं. सर्वजण तिला अंबू म्हणत. सीताबाई अनेकदा कन्येच्या सौंदर्याकडे पहात रहात आणि माझीच नाही ना दृष्ट लागणार हिला , असं म्हणून तिच्या गालावरून हात फिरवून बोट मोडायच्या. अंबू साडेतीन वर्षाची झाली आणि सीताबाईंना बाळाची चाहूल लागली . आता बाळंतपणासाठी सासरी, कोल्हापूरला आल्या. दुसरी कन्या झाली . अंबुची बहीण म्हणून ही सिंधू ! दोघेही खूप विचारी होते. त्यामुळे दोघेही नाराज नव्हते. बाळाला तीन महिने होत आले. आता बाळ बाळंतिणीला मुंबईला घेऊन जावे, या विचाराने रामचंद्र कोल्हापूरला आले. दोन दिवसांनी निघायची तयारी झाली . सामानाची बांधाबांध झाली.
सगळ्या गोष्टी सरळपणान होऊन, त्यांना आनंद मिळू देणं नियतीला मान्य नव्हतं. सगळं उलटं पालटं झालं. रामचंद्रना हार्ट अटॅक आला . आणि त्यातच त्यांना देवाज्ञा झाली. सीताबाई खोल गर्तेत गेल्या. आभाळ कोसळलं त्यांच्यावर . घरदार दुःख सागरात बुडाले. कोणाला काहीच सुचेना. बाळाला तर वडील कळण्यापूर्वीच नियतीने हिरावून नेलं. वर चढलेला झोका खाली येणारच, पण खाली येताना पोटात खड्डा पडला. आणि झोका मोडूनच पडला.
दुःखद बातमी मुंबईच्या ऑफिसला कळवली गेली. तिकडे सामान आणायला जी व्यक्ती गेली , ती दोन-तीनच वस्तू घेऊन आली. बाकी सामानाचं काय झालं , ही गोष्ट कोण कोणाला विचारणार! ती विचारण्याची वेळही नव्हती. आता पुढे काय? हे प्रश्नचिन्ह प्रत्येकासमोर उभे होते. दिवस वार झाल्यानंतर माहेरच्यांनी विचारणा करून , बदल म्हणून सीताबाईंना माहेरी घेऊन गेले. आपल्या मुलीला सावत्र सासूजवळ कशी वागणूक मिळेल याची काळजी होती. सीताबाई माहेरी दोन अडीच महिने राहिल्या. एरवी माहेरी जाण्यातला आणि रहाण्यातला आनंद वेगळा आणि आताचं माहेरपण म्हणजे, नाराजीचे सूर आणि अश्रूंचा पूर , असं चित्र होतं. सतत कोणी ना कोणी समाचाराला यायचं. त्यांचे वेगवेगळे उपदेश ऐकायला लागायचे. सीताबाईंना कोणी, मुलीचा पायगुण म्हणायचे. मुलीची काय चूक असं त्यांना वाटायचं. आणि डोळ्यातून अश्रू धारा वहायला लागायच्या. सीताबाई विचार करायच्या, -“त्या सीतामाईला वनवासात श्रीरामासारख्या पतीचा भक्कम आधार होता. पण मी ही सीता मात्र दोन लहान मुलींना घेऊन हाताशपणे उभी आहे. माझं काय चुकलं असेल बरं? रामचंद्रना देवाने अशा आनंदातल्या संसारातून उचलून का नेलं असेल बरं? अनेक प्रश्न , अनेक विचार मनात गर्दी करायचे. पण त्या प्रश्नांना अजून उत्तर सापडत नव्हतं. माहेरचे लोक त्यांना “आता इकडेच रहा ” म्हणत होते. तेव्हा सीताबाईंनी निक्षून सांगितलं , “मुंबईचं माझं घर हक्काचं होतं , ते काळानं हिरावून नेलं .आता मी कोल्हापूरच्या घरात राहिले तर, सासर आणि माहेर अशी मला दोन घर मिळतील. दोन्हीकडे मी राहू शकेन. पण माहेरीच राहिले तर सासर तुटेल “. एक बुद्धिमान स्त्रीच इतका विचार करू शकेल.
– क्रमशः भाग पहिला
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
बुधगावकर मळा रस्ता, मिरज.
मो. ९४०३५७०९८७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈