सुश्री मंजिरी येडूरकर
विविधा
☆ अंगाई… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
अंगाई हा शब्द कसा आला असेल? खूप विचार केला. अगदी आपल्या गुगल गुरूला पण विचारलं. काही पत्ता लागला नाही. मीच उत्तर मिळवायचा प्रयत्न केला. पूर्वी ‘ गायी गं गायी, माझ्या बाळाला दूध देई ‘ असं म्हणायचे. म्हणजे बाळाच्या परिचयाच्या दोन्ही गोष्टी असणार. गोठ्यात गाय असणार आणि दूध ती देते हे बाळानं पाहिलं असणार. बाळ रडायला लागलं की त्याची समजूत या गाण्यानं काढली जात असेल व गायी बद्दल आदर लहानपणीच निर्माण होत असेल. नंतर हळू हळू गोठे, गायी काळाच्या उदरात गडप झाल्या. नंतर ते गाणं ‘ गाई गं अंगाई ‘ असं झालं. त्याचा अर्थ असा लावला गेला असेल की बाळाला, गाई म्हणजे झोप, ती येण्यासाठी गायलं गेलेलं गाणं म्हणजे अंगाई! ही आपली मी माझी काढलेली भाबडी समजूत! पण हे नक्की की आई व्हायचं झालं तर त्या मुलीला अंगाई म्हणता आली पाहिजे असा अलिखित नियम होता. होता म्हणते आहे कारण आज काल आईच्या मदतीला मोबाईल नामक मैत्रीण येते. अंगाई म्हटलं की एक शांत, सौम्य, सोज्वळ गाणं लागतं. अजूनतरी हं ! पुढची पिढी कदाचित ‘ आवाज वाढव डी जे ‘ सारखी गाणी लावतील सुद्धा! कारण तोपर्यंत मुलांना नाजूक आवाजातली गाणी ऐकू येणं बंदही झालं असेल, त्यांनाही मोठ्ठया आवाजातली गाणीच आवडायला लागतील.
मुलांना झोपवताना गाणं म्हणायची पद्धत खूप जुनी असावी. जसं जात्यावर बसलं की ओवी सुचते. तसं बाळ मांडीवर आलं की अंगाई सुचते. ओवी गाण्यासाठी जसं चांगला आवाज किंवा संगीतातील ज्ञान असावं लागत नाही तसंच अंगाईलाही! आपल्याकडे अजून लहान मुलांना झोपताना ऐकवायच्या ट्यूनची खेळणी आली नव्हती, त्या काळात मी लंडनला मला नात झाली म्हणून गेले होते. नातीसाठी तशी म्युझिकवाली खेळणी आणली होती. पण ती रडायला लागली की एवढ्या मोठ्ठयांदा रडायची की त्या खेळण्याचा आवाज कुठे ऐकूच यायचा नाही. मग पारंपारिक मोठ्या आवाजात ‘ हात हात गं चिऊ, हात हात गं काऊ ‘ अशी गाणी किंवा ओरडावं लागायचं. मला त्यावेळी वाटलं की इंग्रज लोकांच्यात अंगाई गाण्याची परंपराच नसावी. त्यामुळं हे संगीत ऐकवण्याची पद्धत पडली असावी. पण तसं नाही म्हणे! तिथे बाळ आई वडिलांजवळ झोपतच नाहीत. बाळ हे बाळ असल्यापासून त्याची बेडरूम वेगळी असते. त्यामुळं बाळ रडलं तरी आईने जवळ घेण्याचा किंवा अंगाई गाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून ते म्युझिक!
आपल्याकडच्या परंपरा जरा माणसाच्या मानसिक गरजा बघून बनवल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. केवळ आपलंच कुटुंब नाही तर सगळा समाजच एकत्र बांधून ठेवणाऱ्या प्रथा आहेत.
स्पर्शात ओलावा असतो, तो शब्दात मिळणं सुध्दा अवघड आहे. स्पर्शात प्रेम असतं, आधार असतो, आता कशाचीही भिती नाही हा विश्वास असतो. हा विश्वास लहान बाळांना देण्यासाठी मांडी, कूस, पदर, बाळाशी केलेला संवाद यागोष्टी महत्त्वाच्या असतात. आपल्याकडे लहान बाळांना बोललेलं सगळं कळतं असं आपण समजतो. बाळ जन्माला आल्यावरच असं नाही तर अभिमन्यू सारखे गर्भातही संस्कार होतात हा आपला विश्वास आहे. जिजाऊ यांनी तर शिवाजीला वीरश्रीने भरलेल्या गोष्टी ऐकवल्या, अंगाई ऐकवली आणि तो शूरवीर झाला. आपल्या सामान्य माणसांच्या अंगाई मध्ये चिऊ, काऊ, झाडं, चंदामामा अशी निसर्गाची ओळख असते.अंगाई वरून एक गम्मत आठवली. माझ्या दुसऱ्या मुलाला मुलगा झाला. तो जरा रडवाच होता. माझा मुलगा जरा जास्तच हळवा त्यामुळं तो रडायला लागला की हा कासावीस व्हायचा. त्याला तर मराठी गाणी, अंगाई असं काही म्हणायला येत नव्हतं. हिंदी सिनेमातली गाणी यायची पण प्रेमाची नाहीतर विरहाची! ही सोडून एक गाणं त्याला यायचं, ते कुठलं सांगू? ‘हमारीही मुठ्ठीमे आकाश सारा ‘ आणि तो हेच गाणं म्हणून मुलाला झोपावयाचा. मला खूप उत्सुकता आहे, तो नातू पुढे मोठ्ठा झाल्यावर कोण बनेल, कोणतं कर्तुत्व गाजवेल याचं!
आपल्याकडे एक जगावेगळी आई होऊन गेली, मदालसा! अंगाई चा विषय निघाल्यावर मदालसा चा उल्लेख व्हायलाच हवा. एकमेव आई जिने अंगाई तून मुलांना अध्यात्माचे धडे दिले. असं कां, हे कळण्यासाठी तिची गोष्ट थोडक्यात सांगावीच लागेल. ही ऋतूध्वज राजाची राणी ! पातालकेतू राक्षसाच्या मायावी कृत्यामुळे तिने मृत राजा पाहिला, आणि अग्निकाष्ठ भक्षण करून देह विसर्जित केला. राजा अतिशय दुःखी झाला. त्याला वैराग्य प्राप्त झाले. अजून राजाला मूलबाळ ही नव्हते, राज्यकारभार कोण पाहणार? मग कंबल व अश्र्वतल या नागऋषींनी शिवाराधना करून तशीच दुसरी मदालसा प्राप्त करून घेतली. ती शिवाचा अंश असल्यामुळे वैराग्यशील होती. अगदी नाईलाज म्हणून संसार यात्रा आक्रमू लागली. पहिल्या मुलाच्या नामकरणाच्या वेळी ती म्हणाली, नश्वर देहाला नाव कशाला ठेवायचे, मृत्तिका व शरीर दोघांची योग्यता सारखीच.राजाने तिला नामकरण व आत्मोन्नत्ती याची माहिती दिली, पण परिणाम उलटाच झाला. मुलांनी राज्यशकट हाकण्यापेक्षा आत्मोद्धार करावा म्हणून ती निवृत्ती विषयक, आध्यात्मपर अंगाई गात असे. त्याचा साधारण अर्थ असा – ‘सुबाहू उगा रडून शिणू नकोस, पूर्व जन्मीच्या संचितानेच या मायाजालात अडकलास, सावध हो, डोळे मिटून घे पण झोपू नकोस, दृष्टी प्रभुकडे ठेव, अज्ञानाने तू भवबंधनात अडकला आहेस, पण आत्मा मुक्त असतो, ही मायेची बंधने तुटणे कठीण आहे, सावध हो.’
या पुढे जाऊन ती विश्व निर्मितीची क्रिया, मायेचे पाच उद्गार, पंचतत्वे , पंचवायू, पंचेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच अवस्था, जड देह, लिंग देह, शरीर रचना, सर्व नाड्या व शटचक्रांची माहिती सांगते. पुढे नाडी जागृत करणे, आत्मज्योतीचे दर्शन, मोक्ष यांचीही माहिती देते. परिणामी सुबाहू, शत्रुमर्दन, शुभकिर्ती ही तिन्ही मुले राजवैभवाचा त्याग करून अरण्यात जातात. शेवटच्या अलर्क या मुलाच्या वेळी राजा तिची मनधरणी करतो त्यामुळे ती अलर्क ला राजनीतीचे पाठ देते, पुढे तो अनेक वर्षे राज्य करतो. ज्यावेळी तो लढाईत हरतो त्यावेळी आईने जपून ठेवण्यासाठी दिलेले पत्र वाचतो, त्या पत्राप्रमाणे तो सह्याद्री पर्वतावर श्री दत्त प्रभुंच्याकडे जातो, त्यांचा अनुग्रह प्राप्त करून मुक्त होतो. मदालसाने ‘ माझ्या पोटातला गर्भ, कुण्या दुसऱ्या आईच्या पोटात जाणार नाही ‘ अशी प्रतिज्ञा केली होती. त्याप्रमाणे तिने तिन्ही मुलांना मुक्तीमार्ग दाखवला. ज्ञानेश्वरांनी लिहिलेले मदालसेचे अभंग म्हणजेच तिच्या अंगाईचे भाषांतर!
एकूण सांगायची गोष्ट अशी की हा आपला विश्वास आहे की अगदी लहानपणापासून आपण बाळांना जे सांगतो, जे शिकवतो ते ती आत्मसात करतात. त्यालाच आपण ‘ बाळकडू ‘ म्हणत असू.
आपण असं कितीही मानलं तरी याला कितीतरी अपवाद असल्याचं आपल्या लक्षात येतं. बाळ मोठ्ठं झाल्यावर कसं निपजेल हे सांगता येत नसलं तरी हे खरं आहे की आई आणि बाळ यांच्यात एक स्पर्शाचं नातं असतं, एक हळुवार नातं असतं, हे नाजूक बंध जास्त दृढ होतात, जेंव्हा आई त्याला आपल्या हाताने न्हाऊ, माखू घालते, चिऊ काऊ चे घास भरवते. मातृत्वाचं जे सुख असतं ते बाळाच्या बाललीलात, बालसंगोपनात ओतप्रोत भरलेलं असतं. हे संगोपन परक्याच्या हातात सोपवून, जन्माला आल्याबरोबर स्वतंत्र बेडवर, स्वतंत्र बेडरूम मध्ये झोपवून, आई या मातृसुखाला पारखी होत नसेल? कदाचित बाळ त्यामुळं धीट, स्वावलंबी आपल्या बाळापेक्षा लवकर होत असेल पण अशा बाळाला जन्मदात्रीशी सांधणारा दुवा निर्माणच होत नसेल तर तो दुवा इतर कुठल्याही नात्याला सांधण्यासाठी निर्माण होणार नाही. त्यामुळं माणूस नुसता एकटा पडत नाही तर तो कोरडाही होतो. अर्थात ही आपल्या पिढीची मतं झाली. पुढच्या पिढ्या पाश्चिमात्य संस्करावर, विज्ञानातील प्रगतीवर जोपासल्या जाणार आहेत. त्यामुळं जन्माला आल्यापासून मोबाईल किंवा त्याचं दुसरं एखादं व्हर्जन बघत बघत झोपतील, आईची किंवा अंगाईची गरज संपलेली असेल. असो, कालाय तस्मैनमः|
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈