सुश्री वर्षा बालगोपाल
जीवनरंग
☆ अबोला… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
एकाच क्षेत्रात काम करणारे ते••• ती दिसायला सुरेख••• तो राजबिंडा••• तो लहान वयातच मोठ्या हुद्द्यावर ••• ती त्याची असिस्टंट असली तरी सहकारीच जास्त••• कामा निमित्ताने सारखे बरोबर••• मग निखार्याला बघून लोणी वितळले नाही तरच नवल•••
एकमेकां बरोबर काम करताना जीवनही एकमेकां सोबत जगावे असे त्या दोघांनाही वाटले•••
पण••• दोन्ही घरातून जातीय विरोध••• उच्च नीच भेदभाव••• दोघेही अगदी एकमेकांना पूरक आहेत, लक्ष्मीनारायणाचा जोडाच आहेत असे वाटले तरी दोघांच्याही घरातून याला कडाडून विरोध झाला•••
परिणाम म्हणून दोघांनीही मित्र मैत्रिणींच्या साथीने, साक्षीने कोर्ट मॅरेज केले. अगदी साधेपणाने लग्न झाले तरी दोघेही I.T.मधे असल्याने मोठा फ्लॅट भाड्याने घेऊन नव्या नवलाईसह नव्या संसाराला सुरुवात केली.
नव्याचे नऊ दिवस सरले. आणि दोघांनाही एकाच ऑफिसमधे काम करणे अशक्य वाटू लागले. त्याला आता ती आपल्या कामात ढवळाढवळ करत आहे वाटू लागले•••
तिला आता तो नवरा आहे म्हणून आपल्यावर जास्तच ‘ बॉसिंग’ करतो आहे वाटत होते.
झाले••• ऑफिसमधे सगळ्यांसमोर रागावता येत नाही म्हणून घरी येऊन तो राग एकमेकांवर निघू लागला••• छोट्या छोट्या कुरबुरींचे भांडण वाढू लागले••• लोकांसमोर दाखवायला प्रेम आणि घरी भांडण रुसवे फुगवे असे दुहेरी जीवन नकळत सुरू झाले•••
तिला तर रडूच येत होते. घरच्यांचा विरोध स्विकारून आपण प्रेमासाठी सगळे सोडून आलो आहोत पण त्याच्या गावी ती गोष्टच पोहोचली नाही असे वाटले तर तो सुद्धा आपल्या आई वडिलांच्या मर्जीविरुद्धच आपल्याशी विवाहबद्ध झाला आहे याबद्दल तिला आपल्या प्रेमाचा अभिमानच वाटायचा. पण सध्याचे त्याचे वागणे बघता आपण काही चूक तर नाही ना केली असे वारंवार वाटू लागले•••
एक दिवस छोट्या भांडणाने मोठ्या भांडणाचे रूप घेतले••• कडाक्याच्या भांडणात मी तुझ्याशी बोलणारच नाही म्हणाली••• नको बोलूस जा•• तो पण रागाने म्हटला••• मी जातेच घर सोडून, पुन्हा येणार नाही म्हणाली.
जातेस तर जा••• मी काही अडवणार नाही तुला••• असे त्याने पण म्हणताच खरोखर ती घर सोडून निघाली••• घराबाहेर पडलीसुद्धा•••
आपल्याच तंद्रीत कितीतरी अंतर चालून झाले आणि ती भानावर आली••• मग ती विचार करू लागली आता माहेरी तोंड दाखवायला जागा नाही••• सासरच्या माणसांनी तर अजून तिला स्विकारलेच नव्हते ••• आता जायचे कोठे? विमनस्क अवस्थेत ती समुद्रकिनार्यावर पोहोचली.
संध्याकाळची वेळ होती. पक्षी घरट्याकडे परतत होते आणि हे वेडे पाखरू नवर्याशी अबोला धरून घराबाहेर पडले होते.•••
सूर्य सगळ्या चराचराला सोनेरी मिठी मारून या सृष्टीचा निरोप घेत होता. आणि हिच्या मनातील सूर्य रागाला मिठी मारून सगळे संबंध त्या रागात जाळत होता•••
आता सगळे संपले••• आता सगळीकडे काळोख येणार••• माझ्या मनात, जीवनातही काळोख येणार हा विचार तिच्या मनात आला•••
सूर्यास्ताचे सौंदर्य बघायला किनार्यावर तिच्यापासून लांब कितीतरी जण होते. ते सगळे मनाच्या कॅमॅर्यात मोबाईलमधे ते सौंदर्य कैद करत होते आणि हिच्या मनात मात्र आता काळोख होणार पुढे काय? सगळे गेले की आपल्या जीवनाच्या सूर्याचाही आपण अस्त करायचा अशा विचारांच्या ढगांनी मनाच्या सूर्यावर सावट आणायला सुरूवात केली•••
तेव्हाच कोणा एका रसिकाने मोबाईलमधे जुने एक गाणे लावलेले तिला स्पष्टपणे ऐकू आले•••
नच सुंदरी करू कोपा
मजवरी धरी अनुकंपा
तिने कानांवर हात ठेवले आणि थोड्यावेळाने खाली घेतले तर दुसरे नाट्यपद ऐकू आले•••
रागिणी मुखचंद्रमा
कोपता खुलतो कसा
वदन शशीचा लालिमा
रूप बघूनी लज्जिता
होती पूर्वा पश्चिमा•••
त्या पूर्वा पश्चिमेच्या शब्दांनी जणू तिच्यावर जादू केली. मावळतीचा सूर्य जणू तिला सांगत होता, मी जाणार आहे, थोडावेळ काळोख असणार आहे, पण उद्या सकाळी मी पुन्हा नव्याने येणार आहे•••
त्या सूर्याने तिचा अबोला हा थोड्यावेळासाठीच असावा असा संदेश दिला होता. जरी भांडणाची काळी रात्र आली तरी उद्या सकाळी आशेच्या किरणांसह नवा चांगला दिवस आणणे आपल्याच हातात आहे हे तिला पटले•••
घर म्हटले तर भांडणे होणारच, पण राग आला तर मनात १ ते १० मोजायचे म्हणजे थोडावेळ अबोला धरायचा. बोलण्याला अबोल्याची साथ मिळाली तर शब्दाने शब्द वाढणार नाहीत याची जाणिव झाली•••
आता राग निवळला होता. ती उठून घरी जायला निघाली तर तिच्या मागे तो पण उभा असलेला दिसला•••
ती तशीच अबोला धरून उभी••• पण त्याने पण काही न बोलता तिला आपल्या मिठीत घेतले•••
आता मात्र दोघांचा अबोलाच बोलत होता.••••
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈