सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “डिसेंबर अर्थात मार्गशीर्ष…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

इंग्रजी डिसेंबर महिन्याची सुरवात आणि मराठी मार्गशीर्ष नुकताच लागलेला, म्हणजे आनंददायी, उत्साहवर्धक वातावरण.मस्त हवीहवीशी गुलाबी थंडीची सुरवात असते.ह्या थंडीला गुलाबी विशेषण देणा-या रसिकाला सँल्युट. ह्या दिवसात हवामान एकदम मस्त, दुधदभतं, फळफळावळ,भाजीपाला ह्यांची रेलचेल. दिवसभर भरपूर उत्साहाने काम करायचं मग आपल्या सुखाच्या,हक्काच्या झोपडीत परतायचं,रात्री मस्त मऊमऊ ,उनउनं खिचडी, गरमागरम टोमॅटो चं सूप ओरपायचं आणि मग मस्त दिवसभराच्या दगदगीनं मस्त मऊमऊ गोधडीत अवघ्या काही मिनीटातच निद्रादेवीच्या अधीन व्हायचं, खरचं सुखं, सुखं म्हणतात ते हेच,आपल्यापाशीच असतं फक्त आपल्याला हुडकून त्याच्या आस्वाद घेता यायला हवा.

मार्गशीर्ष मास वा डिसेंबर महिना हे धार्मिक दृष्टीने पण खूप महत्त्वाचे, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार,चंपाषष्ठी,दत्तजयंती ह्याच काळातील.

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे . मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात . मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना आळवण्याचा हा दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

लगेच येणारा उत्सव म्हणजे दत्तजयंती चा उत्सव.मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असतं. बडने-या जवळ “झिरी”येथे.दत्तमहाराजांचे जागृत देवस्थान आहे.

असा हा हवाहवासा मार्गशीर्ष व डिसेंबर महिन्याच्या शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments