सौ. गौरी गाडेकर
जीवनरंग
☆ क्रायसिस मॅनेजमेंट – भाग-2 ☆ सौ. गौरी गाडेकर ☆
(सुशांत आतल्या खोलीत बसून शांतपणे लिहीत होता. ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली.) – इथून पुढे
सुरेशला यायला उशीर झाला.
‘‘अहो, मी तुम्हाला फोन केला होता. निरोप ठेवला होता. ”
‘‘मी बाहेरच्या बाहेरच आलो; पण कशाला केला होतास फोन?”
‘‘अहो, सुशांतची प्रयोगाची वही हरवली. उद्या… ”
पुढचं ऐकूनही न घेता त्याने ओरडायला सुरवात केली.
याला आधी आपल्या वस्तू सांभाळायला नको. दप्तर एकीकडे, कंपास एकीकडे, घरभर पसारा पडलेला असतो. व्यवस्थितपणा म्हणून नाहीच अंगात. तू आणखी लाड कर त्याचे… ”
‘‘अहो, ऐका तरी. त्याने नाही हरवली वही. त्याने बाईंना दिली होती गेल्या आठवड्यात. त्यांच्याकडून हरवली. ”
‘‘काय? बाईंकडून हरवली? कोण बाई आहेत त्या? प्रिन्सिपलकडे कम्प्लेन्ट केली पाहिजे. मुलांच्या वह्या हरवतात म्हणजे काय? हेच संस्कार करणार मुलांवर? एक्सप्लेनेशन मागा म्हणावं त्यांच्याकडून. आज वही हरवली, उद्या पेपर हरवतील. आणि सांगतील गठ्ठ्यात पेपर नव्हता त्याअर्थी बसलाच नसणार परीक्षेला. ”
बाबांचा आवाज ऐकून धावत आलेला सुशांत रडवेला झाला होता. सुधानं त्याला खुणेनंच आत जाऊन लिहायला सांगितलं.
‘‘अरे बापरे, प्रयोगाची वही नसेल तर प्रयोगाची परीक्षाही जाणार? म्हणजे वही आणि प्रयोग – दोन्हींचे मार्क गेले. शास्त्रात कमी मार्क म्हणजे पुढच्या वर्षीही त्याची ‘अ’ तुकडी गेली. म्हणजे पुढच्या वर्षीही तो मार खाणार. त्याचा परिणाम पुढे एसएससीलाही कमी मार्क मिळणार म्हणजे चांगल्या कॉलेजात ऍडमिशन नाही. चांगलं कॉलेज नाही म्हणजे बारावीलाही बोंबला. मग काय? व्हा कसंबसं बीएससी! पुढे नोकरी मिळतानाही मारामार… ”
जेवणं झाली तरी सुरेशची बडबड चालूच होती.
‘‘अहो, उद्या लवकर निघणार ना तुम्ही?”
‘‘कोणी सांगितलं?”
‘‘सुशांतच्या शाळेत जाणार आहात ना?”
‘‘कशाला?”
‘‘प्रिन्सिपलना भेटायला. ”
‘‘असल्या हजामती करायला मला अजिबात वेळ नाही. तूच जा आणि चांगली सालटी काढ त्यांची. ”
मागचं आवरून बिछाने घालून सुधा सुशांतच्या शेजारी येऊन बसली.
‘‘आई, तू मॅडमना तुंगारेबाईंचं नाव नको सांगूस. तुंगारेबाई खूप चांगल्या आहेत. मॅडम त्यांना रागावतील. शिवाय तू तक्रार केल्याचं बाकीच्या बाईंना कळलं तर त्या माझ्यावरच वैतागतील आणि मला मुद्दामहून कमी मार्क देतील.
‘‘मी मॅडमना भेटायला नाही येणार, ” सुधा सुशांतच्या केसातून हात फिरवत म्हणाली, ‘‘फक्त सगळं व्यवस्थित होतं की नाही ते बघायला येणार. शाळेच्या बाहेरच थांबीन मी. तुंगारेबाईंनी वहीवर सह्या केल्या, की माझं समाधान होईल. नाहीतर दुपारी तू घरी येईपर्यंत माझा जीव टांगणीला लागणार. ”
सुशांतचं समाधान झालं.
‘‘किती राह्यलंय रे बाळा?”
‘‘दोनच पानं आहेत आता. ”
‘‘मग झालं?”
‘‘हो. ”
‘‘आणि आकृत्या?”
‘‘मघाशी लिहून लिहून कंटाळा येत होता ना. तेव्हा आकृत्या काढून घेतल्या. त्यामुळे आकृत्याही संपल्या आणि झोपही गेली. ”
‘‘माझं सोनुलं ग ते. ” सुधाने त्याचा पापा घेतला.
सुशांतने लिहायला सुरवात केली.
‘‘आई, झालं पुरं. ”
‘‘अरे वा रे माझ्या छाव्या! बघ, अर्ध्या दिवसात अख्खी वही लिहून काढलीस रे सोन्या. ”
‘‘कव्हर घालशील तू? आणि उद्या लवकर उठव हं नक्की. ’’
सुधानं सुशांतच्या हाताला तेल लावून मालिश केले. गाढ झोपलेल्या बाळाचा पापा घेतला.
वहीला कव्हर घालून त्यावर नाव घालून ती त्याच्या दप्तरात ठेवली.
‘तसा त्रास पडला माझ्या बाळाला, पण उद्या परीक्षेला जाताना टेन्शन नसणार. ’
सकाळी शाळेच्या दारातच तुंगारेबाई भेटल्या. धावत जाऊन सुशांतनं त्याची प्रयोगाची वही आणि झेरॉक्स त्यांच्या हातात दिली.
‘‘अरे वा! अख्खी वही लिहून काढलीस तू?”
‘‘होय बाई. ”
पाठीवर मिळालेल्या बाईंच्या शाबासकीने आदल्या दिवशीचा सगळा शीण पळून गेला.
बाई स्टाफरूममध्ये गेल्या. पाच मिनिटात मार्क आणि सह्या आटपून त्यांनी वही सुशांतच्या हातात दिली. त्यापूर्वी बाहेर उभ्या असलेल्या सुधाला वही उंचावून खूण करायला विसरल्या नाहीत त्या.
सुधा शांत मनानं घरी आली.
‘‘भेटलीस प्रिन्सिपलला? चांगला दणका दाखवला पाहिजे त्या बाईला. ”
सुरेशकडे लक्ष द्यायला वेळ तरी कुठे होता तिला? ती घाईघाईत त्याच्या नाश्त्याच्या, डब्याच्या तयारीला लागली. सुरेश ऑफिसात गेल्यावर तिनं मस्तपैकी चहा केला. एक एक गरमगरम घोट घेत कालच्या दिवसाचा समाचार घ्यायला सुरवात केली. काल हे संकट येऊन कोसळल्यावर ती कशी भेदरून गेली, ‘त्यां’ना फोन करण्याचा किती प्रयत्न केला, ‘ते’ येऊन संकटातून सोडवणार म्हणून…
पण ‘ते’ आल्यावर तर त्यांनी ओरडायला सुरवात केली. परीक्षेला बसायला मिळणार नाही म्हटल्यावर तर दादाच्या भाषेत सांगायचं तर ‘पॅनिकी’च झाले. बडबडत बडबडत पार त्याच्या नोकरीपर्यंत पोचले.
एवढं करून काय? तर उपाय सांगितलाच नाही. उलट प्रिन्सिपलशी भांडून परिस्थिती आणखीच बिकट झाली असती. बिचा-या सुशांतची तर वाटच लागली असती. त्याउलट आपण किती शांतपणे, न चिडता; पण तातडीनं योग्य निर्णय घेतले आणि त्यांची व्यवस्थित अंमलबजावणी केली.
मग तिनं मागच्या गोष्टीही तपासल्या.
लहानपणी सुशांतला ताप आल्यावर तिनं मिठाच्या पाण्याच्या घड्या घातल्या होत्या. सुरेश मात्र ताप कसा आला, याचीच कारणमीमांसा करत बसला होता.
मागे सुधा मावसबहिणीच्या लग्नाला निघाली होती. नेहमीप्रमाणे सुरेश बाहेरगावी गेला होता. चार – पाच वर्षांच्या सुशांतला घेऊन सुधा जाणार होती. तसा तीन तासांचाच प्रवास होता. बसचं रिझर्व्हेशनही केलं होतं.
पहाटे लवकर उठून सगळं आटोपून सुधा निघाली. दाराला कुलूप लावलं आणि सुशांतला ‘शी’ झाली. मग पुन्हा घर उघडून सुशांतचं सगळं झाल्यावर बस स्टेशनवर पोचेपर्यंत बस निघून गेली होती.
सुधा रडवेली झाली. याच्या नंतरची बस अडीच तासांनी म्हणजे लग्न चुकणार.
ती कंट्रोलरकडे गेली – ‘‘सर, आता सुटलेली बस मला पुढच्या स्टॉपवर मिळू शकेल का?”
‘‘का? काय झालं?”
मग तिने थोडक्यात सगळं सांगितलं.
‘‘ही समोरची बस आत्ता सुटतेय. ही मधल्या रस्त्याने जाते. त्यामुळे त्या बसच्या आधी पोचेल. तुम्ही तुमचे सीट नंबर सांगा. मी त्या डेपोमध्ये फोन करून तुम्ही येइपर्यंत ती बस थांबवून ठेवायला सांगतो. ”
आणि खरंच, ती बस पुढच्या स्टॉपला गाठून सुधा लग्नाआधी व्यवस्थित पोचली.
उगीच चेष्टेचा विषय व्हायला नको म्हणून हॉलमध्ये ती कोणालाही – अगदी आईलाही काही बोलली नाही.
दोन दिवसांनी राहवलं नाही म्हणून सुरेशला सांगितलं.
‘‘एवढं काय अडलं होतं नसते उपद्-व्याप करायचं? तू गेली नसतीस तर काय लग्न लागायचं राहणार होतं?”
तेव्हा सुधा हिरमुसली होती; पण आज तिला स्वत:च्या समयसूचकतेचं कौतुक वाटलं. खरंच किती पटापट निर्णय घेतले आपण!
सुधानं आपल्या जागी आई, सासूबाई, दादा… एकेकाला उभं केलं, पण कोणीच एवढं शांतपणे विचारपूर्वक निर्णय घेऊ शकलं नसतं. सुरेशचं पितळ तर उघडं पडलंच होतं. समोरच्या आरशात सुधाला दिसली तेजस्वी, ‘स्व’ ची ओळख पटलेली सुधा.
ती उठली. आरशाच्या जवळ गेली. ‘त्या’ सुधाच्या डोळ्याला डोळा भिडवून चक्क इंग्रजीत म्हणाली – ‘I am a confident lady. I can take my own decisions. ’
– समाप्त –
© सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈