सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “आवडनिवड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
प्रत्येक व्यक्तीचा स्वतःच्या आवडीचा जणू एक साचाच असतो. त्या साच्यातून तो आपल्याला आवडणारं राहणीमान, खानपान, वाचन,गायन,जीवन जगण्याची पद्धत ह्या सारख्या आवडी जपतं असतो. त्यामुळे तो जीवनात स्वतःला आवडणा-या गोष्टींचा आस्वाद घेतो पण हा आस्वाद घेतांना जर कधीतरी अवचट आपल्या आवडीचं वळण बदलून दुसऱ्यांच्या आवडीच्या वाटेवर चालून बघितलं तर ते कधीकधी जास्त पण आवडून जातं. पण असा बदल हा एखादेवेळीच स्विकारला जातो, एरवी आपली स्वतःची आवड,कल हा तसा ठाम असतो.
जबाबदा-या,कर्तव्य उरकंत आल्या की वेध लागतात स्वतः कडे नीट लक्ष देण्याचे, आपल्या आवडीनिवडी जपण्याचे, बरीचशी आवडती कामं,कला,छंद जोपासण्याचे. ह्या आवडीनिवडी,छंद जोपासण्याची पण एक गंमत आहे.आपण दुसऱ्या ला सहजसहज सल्ले देतो,अमूक एक गोष्ट कर म्हणून आग्रही होतो पण विचार केला तर लक्षात येतं आपण सुचवलेली गोष्ट ही समोरच्या व्यक्तीच्या आवडीनुरुप आहे की नाही ? की आपण आपली मतं त्यावर लादतोय.माझा स्वतःचा पिंड नोकरी करण्याचा ह्या उलट माझ्या बहिणीचा पिंड हा अतिशय उत्कृष्ट, आदर्श अशी गृहीणी होण्याचा.माझ्या बहिणीसारखी सुगरण,टापटिप घर ठेवणारी,अगदी बारीकसारीक सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणारी, घरच्यांच्या आरोग्याची उत्तम सुश्रुषा करणारी आणि घरच्या अगदी लहानात लहान कामापासून ते मोठमोठ्या कामांचा पण भार लिलया पेलू शकणारी स्त्री अभावानेच आढळते. आणि ही सगळी कामं ती अतिशय आवडीने, आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे करते. जर अशावेळी मी तिला बाहेर नोकरी करण्याचे सल्ले दिले तर तो तिच्यावर नुसता अन्यायचं होणार नाही तर तिच्या उत्तम व्यवस्थापन कौशल्याचा एक प्रकारे अपमानच होईल. थोडक्यात काय तर प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते,त्यामुळे आवडीनिवडी बदलविण्याच्या चुकीच्या अट्टाहासापेक्षा त्या व्यक्ती मधील गुणांना पुरक कौतुकाची थाप देणं,तिला उत्तेजन देणं ही खरी माणुसकी.
मला स्वतःला विचाराल तर आता नोकरीमुळे असलेल्या अतिशय व्यस्त दिनचर्ये पेक्षा निवृत्ती नंतरचे आयुष्य हे अतिशय शांत, कमी गजबजलेल्या ठिकाणी घालवायला आवडेल, त्यामध्ये माझं वाचनं आणि शांत ठिकाणी भ्रमंती व पर्यटन हे आलचं. प्रवासाचं म्हणाल तर माझ्या बकेटलिस्ट मध्ये सागरीप्रवास याने की क्रुझ वरुन सागराच्या शांत सानिध्यात फेरफटका मारणे,अगदी “मै ओर मेरी तनहाई अक्सर बाते करेंगे”च्या स्टाईलमध्ये “डोंट डिस्टर्ब”चा बोर्ड न लावताही मिळणारा एकांत, बाजूला मंद,अलवार,हळू आवाजात ऐकू येणारे पण ह्रदयाला भिडणारे संगीत, ती अर्थपूर्ण हिंदीमराठी गाणी,स्वतःमध्ये रमुन जाण्याचे क्षण ह्याला मी नक्कीच अग्रक्रम देईन. बघूया आपली बकेटलिस्ट बनवून ठेवायला तरी हरकत नाही.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈