श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ माणुसकीचे कफन… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
“वाचवा. !.. वाचवा.. !. कोणी हाये का तिथं?… ऐका !… ऐका. !. मी बुडतोय!… अहो कुणीतरी लवकर मला बाहेर काढा हो!… नाका तोंडात पाणी गेलयं… श्वास कोंडलाय!… लवकर धावून या!.. नका उशीर करू… आता फार वेळ दम धरवणार नाही!… कसेही करा पटकन इथे उडी मारून या आणि मला इथून बाहेर काढा… “
जिवाच्या आकांताने तो ओरडून सांगत होता बिचारा… पाण्याच्या खोल डोहात फसला होता.. गरगर फिरत होता… त्याचे स्व:ताचे सुटकेचे प्रयत्न निष्फळ ठरले होते… तो अधिकाधिक डोहात गुरफटत गेला होता… त्याचा आरडाओरडा ऐकून बघ्यांची खूप गर्दी जमा झाली तेथे.. पण त्यांना या लाईव्ह ऑंखे देखा हालचं व्हिडिओ शुटींग करण्याचा मोह आवरला नाही.. ते बुडणाऱ्या माणसाला म्हणाले,
” अरे थांब!लगेच असा बुडू नकोस.. दोन मिनिटे आधी शुटींग करून घेऊया मग तुला कसा यातून वाचविता येईल याची आम्ही आपआपसात चर्चा करतो… पट्टीचा पोहणारा तरी आमच्यात कुणी दिसत नाही.. एखादा मोठा दोरखंड मिळतोय का ते पहावे लागेल.. तो आणे पर्यंत तरी तुला असेच थांबणे गरजेचे आहे… आमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शुटिंग करून झाले कि मग कुणाला तरी गावात पाठवतो.. तुझ्या घरी तसा निरोप देऊन ताबडतोब मदतीला या म्हणून सांगतो.. तू आता काळजी करू नकोस… तुझ्या जीवावर बेतलं आहे याची आम्हाला काळजी किती वाटते ते या व्हिडीओ शूटिंग व्हायरल झाले कि सगळ्यांना कळेल.. जो धाडसी आणि पट्टीचा पोहणारा असेल त्याने हा व्हिडिओ बघितला कि तो लगेच धावून आल्याशिवाय राहणार नाही… मग तू नक्की वाचशिल यात शंका नाही… तुला वाचताना पुन्हा आम्हाला शुटींग घेता येईल… एक माणूस, सुजाण नागरिक या नात्याने आम्हाला आमचं माणुसकिचं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मिळेल… तू धिराचा आहेस, .. अखेर पर्यंत तुला लढा द्यायचा आहे… हिथं थांबून आम्ही हे शुटींग करता करता तुझं माॅरल कसं वाढेल हे आम्ही पाहतो… तू थोडावेळ असाच धीर धरून रहा मदतीला कोणी येईलच इतक्यात… आणि कुणी आलं कि तुला आम्ही मोठ्याने आवाज देऊ… होईल होईल तुझी सुटका नक्की होईल… मग आमच्या सोबत एक सेल्फी घेऊ… चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झळकवू काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. देव तारी त्याला कोण मारी अशी सनसनाटी हेड लाईन देऊन आम्हीच तुझ्या वतीने मुलाखत देऊ… या या व्हिडिओ शुटींगचा रिल व्हायरल झाल्याने बुडणाऱ्या माणसाचे प्राण वाचवले… पण पण हे केव्हा तूला मदत मिळून बाहेर काढल्यावरं.. बघं एका रात्रीत तू हिरो होणार आहेस.. तोवर हे तुला या डोहात गटांगळ्या खाऊन का होईना जिवंत राहावे लागणार आहे… अरे टि आर. पी. किती वाढेल याची तुला काहीच कल्पना करता येणार नाही.. ते सगळं आम्ही बघून घेतो.. तू मात्र डोहात लढते रहो हम कपडा संभालके देखते है… “
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈