सुश्री मानसी विजय चिटणीस
परिचय
ग्रंथसंपदा : * सृजनभान, सांजवर्खी शकुन, माझ्यातील बुद्धाचा शोध हे तीन कवितासंग्रह . उत्सव कथांचा हा प्रातिनिधिक कथा संग्रह प्रकाशित नामांकित मासिकातून लेख प्रकाशित . वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन , तसेच सदर लेखन. विविध विषयांच्या पुस्तकांचे परिक्षण, परिचय व रसग्रहण वर्तमान पत्रातून प्रसिद्ध. २० हून अधिक पुस्तकांसाठी प्रस्तावना लेखन* मराठी सोबतच हिन्दी व इंग्रजी कविता लेखन *In Marathi, बोभाटा या प्रसिद्ध पोर्टल साठी लेखन
सामाजिक : १. समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा- कार्यवाह२. महाराष्ट्र राज्य कामगार साहित्य परिषद- कार्यकारी विश्वस्त ३. पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य व कला आकादमी- मुख्य कार्यवाह ४. यशवंतरावजी चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभाग- सदस्य.
मानसन्मान व पुरस्कार:
१. शब्दधन काव्यमंच यांचा ‘छावा’ पुरस्कार २. नवयुग श्रावणी काव्य स्पर्धेत ‘प्रथम’ परितोषिक ३. कोकण म सा प राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत द्वितीय परितोषक प्राप्त; चारूतासागर प्रतिष्ठान यांचे उत्कृष्ट लेख पारितोषक४. सर्वोदय साहित्य पुरस्कार, कोल्हापूर ५. बाल कुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांचा ‘साहित्यसृजन’ पुरस्कार
६. ‘आवाज महाराष्ट्राचा’ या न्यूज चॅनल चा ‘क्रांतीज्योती’ पुरस्कार ७. महाकवी कालिदास प्रतिष्ठान,पुणे यांचा ‘कालिदास काव्यगौरव पुरस्कार’ ८. ग.दी.मा.प्रतिष्ठान,पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद,भोसरी व कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांचा ‘ग.दी.मा. साहित्य पुरस्कार ‘ ९. करम प्रतिष्ठान चा ‘करमज्योत’ पुरस्कार १०. डॉ. अशोक शिलवंत काव्यभूषण पुरस्कार.
मराठी चित्रपटासाठी गीतलेखन, चित्रपट कथालेखन व रेडियोसाठी जाहिरात लेखन, विविध कादंबर्या, कथासंग्रह, काव्यसंग्रह यांचे शब्दांकन, विविध संस्था,संमेलनात व्याख्याती म्हणून सहभाग,
स्वत:च्या कथांच्या अभिवाचनाचे प्रयोग. कथाकथन, कविता लेखन,अभिवाचन, बालगीते,नाट्यछटा स्पर्धा यात परीक्षक म्हणून सहभाग *’कवितासखी’ या स्वरचित कार्यक्रमाचे सादरीकरण तसेच ‘ ही कविता आली तुम्हास भेटायला’ या समूह कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन *विविध शाळांमध्ये कथाकथनाचे कार्यक्रम
उपक्रम : ‘कवितासखी’ हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम
विविधा
☆ “मनचाफा…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस ☆
संध्याकाळची गडबड चालू होती.. मी आपली स्वयंपाकात मग्न. लौकर स्वयंपाक संपवून मला लिहायला बसायचे होते. मी पोळ्या करता करता त्याला हाक मारली पण रोजच्यासारखी आलो, आलो ची आरोळीही आली नाही की काय गं सारखी हाका मारत असतेस ची भुणभुणही आज नव्हती. कुठे गेला हा असा संध्याकाळचा? असा मी विचार करतानाच
हयाने मागून येवून घट्ट गळामिठी मारली.. मी ओरडले,
“अरे काय हे !!!दिसत नाही का पोळ्या करतेय.. एवढा मोठा झालास तरी खोड्या काही संपत नाहीत तुझ्या. “
तो हिरमुसला… पटकन हातातल्या रूमालाची पुरचूंडी त्याने कट्ट्यावर ठेवली आणि गेला… मी लक्षच नाही दिले.. नंतर तो ही अजिबात आला नाही लूडबूड करायला..
जेवायची वेळ झाली तरी नेहमीसारखा भूक म्हणून पण ओरडला नाही.. मीच दोन हाका मारल्या पण एक नाही की दोन नाही. अचानक लक्ष कट्ट्यावरच्या रूमालाकडे गेलं. उघडून पाहिलं तर मला आवडणारी चाफ्याची फूलं होती.. माझी चटकन ट्यूब पेटली आणि लक्षात आलं.. महाराज कुठे गेले होते ते. मी तसाच रूमाल घेवून त्याच्या खोलीत गेले.. खिडकीतून बाहेर बघत पाठमोरा उभा होता.. माझ्या हातातली फुलं बघून मला म्हणाला, ..
“आई… तुला आवडतात ना गं.. म्हणून तेजस च्या बागेतल्या झाडाची तोडून आणलीत.. मी स्वतः चढलो गं वर…. हे बघ ना कित्ती सुंदर आहेत ना… !!”
खरंच नुकतीच उमललेली ती चाफ्याची फुलं खूप सुंदर होती.. आणि त्यांच्या दरवळानं माझेही हात सुगंधीत झाले होते. मी क्षणभर तो सुगंध मनात भरून घेतला.. माझे डोळे भरून आले… त्याला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवतं राहीले काही न बोलता.. सुगंध काय फक्त फुलांनाच येतो? नात्यातला सुगंधही असाच अविट असतो. काही दरवळ फक्त नाकाचीच नाही तर मनाचीही तृप्ती करतात. नात्यांचे दवरळही तसेच असतात काहीसे. निरनिराळ्या भावनांचे, तशाच वेगवेगळ्या फ्लेवर्सचे प्रत्येक नात्याचा गंध वेगळा, तसाच दरवळही वेगळा. जे नातं पुन्हा जगावासं वाटतं त्या नात्याचा फ्लेवर आठवायचा आणि अनुभवायचे त्यांचे दरवळ. खासकरून त्यात मायेचा ओलावा मिसळला असेल तर ते तसेच दरवळत राहतात वर्षानुवर्ष..
काही नाती जन्मभर जोडलेली असतात काही बंधनात अडकतात तर काही जपली जातात कोणतेही नाव न देता.. एकमेकांना सांगितले जाते, नात्याला काही नाव नसावे तु ही रे माझा मितवा.
हा जो काही नात्यांचा बंध असतो तो सहवास, आपुलकी, माया अशा धाग्यांनी गुंफला गेला तरच चिरकाल टिकतो.. त्यातली सहजता तितकीच महत्वाची. आपण जितके एखादे नाते सहजतेने वागवू तेवढे ते फुलत जाते, मोकळे होते. हे सहजपण म्हणजे तरी काय? तर उत्स्फुर्तता जपणे. क्रियेला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देणे आणि गुंफण गुंफत राहणे. हे नात्यांचे रेशिमबंध घट्ट असतील तर त्यातील मऊ, मुलायम, स्निग्ध भाव.. आणि तेच बंध उसवलेले, विसविशीत असतील तर त्यातील टोकदारपणा, शुष्कता.. हे देखील तेवढ्याच संयतपणे समजून घेण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करणे हे देखील गुंफण जपणेच होय..
सहजतेवरून आठवले नाती जपताना, गुंफताना माणसं घडवायची पण आपल्या हातातली छिन्नी दिसू द्यायची नाही.. मुळात घडवायची हा शब्दही चूकच.. त्यांना त्यांच्या कलेन घडू द्यायचं.. त्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार व्हायचं.. शान्तपणे सोबत करायची.. अविर्भावाचा असुरी रंग स्वतःला स्पर्शू द्यायचा नाही… अशा नितळ प्रक्रियेतच खरेपण जोपासायचे ही नात्यांची विण आणि गुंफण.. मनात विचारांच्या सरी झिरझिरू लागल्या आणि डोळ्यांतून ओघळताना हातातल्या चाफ्याला भिजवू लागल्या.
माझे भरलेले डोळे पाहून त्याचा रुसवा क्षणात छू.. झाला. तो गोंधळला. त्याला कळेना आपली आई का रडतेय?…
“आई.. रडू नको ना गं.. ! काय झालं तुला…. ?तू रागावलीयस का माझ्यावर? अगं काय झालं तुला?” तो विचारत राहीला..
काहीच नाही बोलले.. पण एक मात्र नक्की, नात्यांतले हे दरवळ नकळत जपताना आज तो माझी आई झाला होता..
© सुश्री मानसी विजय चिटणीस
केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈