सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “आनंद मानायला शिकूया…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
दोन तीन दिवसांपूर्वीच त्यांचं आमच्या घरी आगमन झालयं आणि जणू खूप तहान लागली असतांना समोर फक्त आणि फक्त अथांग समुद्र असावा किंवा नुकतीच शुगर डिटेक्ट झाल्याबरोबर समोर पंचपक्वान्नाचे ताट यावे,असा फील आलाय. कारणं बँकेचे ऑडिट सुरू असल्याने बँक सोडून बाकी कशालाही जणू वेळच उरत नाही. अर्थातच बँकेचे काम हे नोकरी असल्याने माझ्यासाठी प्रायोरीटी मध्ये वरच्या क्रमांकावर.
परवा मस्त दिवाळीअंकाचा गठ्ठा घरी आला.समोर वाचण्यासाठी इतकी वाचनसंपदा पसरली आहे आणि आपली अतिव्यस्त दिनचर्येमुळे आपण त्याचा धडपणे आस्वाद घेऊ न शकल्याने मन खरचं व्यथित होतं.
खरचं बोटांवर मोजण्याइतक्या काही व्यक्ती असतात त्यांना आपल्या आवडीनिवडी आणि आपल्या जबाबदा-या ह्यांचा योग्य समतोल साधण्याचं कसबं असतं.नाहीतर बहुतेक ठिकाणी दात असले की चणे नसतात आणि चणे येतात तेव्हा दात गायब होतात.
सहसा आपण लोकं आधी पैसा मिळवणे, तो साठवणे ह्या मागे इतके हात धुवून लागतो की आपण आपल्याच साठी क्षणाचीही उसंत घेत नाही. प्रसंगी आपण आपल्या आवडींना फाटा देतो आणि आधी कर्तव्य बजावायला सज्ज होतो.हे करतांना स्वतःची मोठी स्वप्ने पूर्ण करण्याच्या ध्यासाने इतके कामात गुरफटतो की स्वतःच्या आवडीच्या छोट्या छोट्या गोष्टींचाही आस्वाद घेण्यात वेळ घालवायचा विसरतो.आणि जेव्हा सगळ्या जबाबदा-या आटोपून आपण जरा हूश्श् करतो आणि आपल्या आवडींकडे वळू असे ठरवितो तेव्हा आपलेच शरीर आपल्याला साथ देत नाही.
सध्या आपण चार ओळी वाचायला वेळ काढत नाही आणि जेव्हा वेळच वेळ मिळतो तेव्हा वाचण्यासाठी आपली नजर,आपले डोळेच साथ देत नाहीत. हीच गोष्ट पर्यटनाच्या बाबतीत पण लागू पडते.कित्येकदा आपण परदेशी फिरण्याच्या स्वप्नापाई तरुणपणात नुसती ढोर मेहनत करतो. जेणेकरून सगळ्या जबाबदा-या उरकल्या की सहजतेने परदेशी फेरफटका मारता येईल. पण वस्तुस्थिती अशी येते की तेव्हा पैसा तर येतो पण परदेशी फिरण्याची शरीरात ताकदच नसते.ह्या परदेशी फिरण्याच्या ध्यासापायी आपण आपला भारत देश सुध्दा धड पूर्णपणे बघत नाही.
खरचं मला फार कौतुक वाटतं अशा लोकांच जे आयुष्यातील जबाबदा-या पार पाडतांना प्रत्येक पायरीवर काही क्षण का होईना विसावा घेतात,त्या विसाव्यातच आपल्या आधी लहान का होईना पण आवडी,ईच्छा पूर्ण करतात.नाहीतर काहीजणं भराभर पूर्ण जीना घाईघाईने चढायच्या नादात कधीकधी अजिबात विराम न घेता धावतपळत ध्येय गाठण्यासाठी उरापोटावर जावून इच्छित स्थळी पोहोचतात तर खरं पण पोहोचेपर्यंत पार दमून गेल्यामुळे त्यातला आनंद, त्यातला रसच गमावलेला असतो.
त्यामुळे शरीराला आणि मनाला सुध्दां टप्प्याटप्प्यावर विश्रांतीची ,थकवणा-या मोठमोठ्या स्वप्नांमागे न धावता छोट्याछोट्या गोष्टीतही आनंद मानायला शिकण्याची सवय हवी हे नक्की.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈