श्री मंगेश मधुकर
इंद्रधनुष्य
☆ “थुंकेगिरी…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
रिक्षाचा स्पीड कमी करून ड्रायव्हर पचकन रस्त्यावर थुंकला.तेव्हा राजा संतापला.
“दादा,थांबा.असं रस्त्यावर थुंकणाऱ्या रिक्षातून मला जायचं नाही !!”
“माफ करा साहेब, पुन्हा असं करणार नाही ” वयस्कर रिक्षावाला म्हणाला, पण राजाने ऐकले नाही.तो रिक्षातून उतरलाच…
राजा.. वय चाळीशीच्या उंबरठ्यावर, शिडशिडीत अंगकाठी, जेमतेम साडेपाच फुट उंची, डोक्यावर निम्मं उडालेले छप्पर, बारीक डोळे आणि नाकावरून सतत घसरणारा चष्मा एका हाताने सावरत बोलायची सवय. .बायको- दोन मुलींसह छोट्या फ्लॅटमध्ये राहणारा टिपिकल मध्यमवर्गीय. पंधरा वर्षापूर्वी एका कंपनीत चिकटला आणि तिथंच इमाने-इतबारे नोकरी करीत राहिला. एरवी नाकासमोर चालणारा राजा एका बाबतीत मात्र कमालीचा तिरसट होता. थुंकण्याची त्याला प्रचंड किळस वाटायची. एरवी सशाप्रमाणे भिऊन जगणाऱ्या राजाला कोणी थुंकताना दिसले की त्याच्या अंगाचा तिळपापड व्हायचा. लगेच टकळी सुरु व्हायची. याचमुळे अनेकदा भांडणे झाली. राजाची बायको आणि मुली त्याच्या या सवयीला वैतागली होती. अनेकदा समजावले पण राजाच्या वागण्यात फरक पडला नाही.
दिवाळीच्या सकाळीच चकचकीत फोर व्हीलर मधून जाणारा एकजण रस्त्यावर थुंकला आणि त्याचा प्रसाद बाईकवरून जाणाऱ्या राजाला मिळाला. मग काय !!!!
प्रकरण पोलीस चौकीत गेले…..
“ तुम्ही चांगल्या घरातले दिसताय ” चढ्या आवाजातच इन्सपेक्टरांनी राजाला विचारले.
“ साहेब माझी काहीही चूक नाही ” राजा
“ परत तेच, चांगले शिकलेले वाटता आणि असा विचित्र हट्ट करता ”
“ प्रश्न तो नाही. मला यांना सॉरी म्हणायचे आहे ” आडदांड,दाढीधारी,महागडे कपडे घातलेल्या आणि सोन्याने मढलेल्या नवश्रीमंताकडे बोट दाखवत राजा म्हणाला.
“ तुम्हांला का सॉरी म्हणायचं?? ”
“ साहेब,मी सांगतो ” .. नवश्रीमंत
“ यांच्यानंतर मी बोलतो ” .. राजा.
“ साहेब,चूक झाली. कान धरतो पुन्हा असं करणार नाही. त्याचं झालं असं की सकाळी आम्ही फॅमिली मेंबर स्कोर्पियोमधून प्रोग्रामला चाललो व्हतो. मला गायछापची सवय, बार लावला होता. सवयीने मी पिंक टाकली आणि ती नेमकी याच्या अंगावर पडली आणि समदा तमाशा झाला. लगेच “सॉरी” बोल्लो… एकदा नाही तीनदा. पण हा माणूस उलटा माझ्यावरच xxxx xxx. आमच्या गाडीसमोर बाईक आडवी लावून भांडायला लागला. तोंडाला येईल ते बोलायला लागला. माज्या चुलत्याने पन हात जोडून माफी मागितली. आपल्या रुमालाने याच्या कपड्यावरचे पडलेले डाग पुसले. पण ह्यो ऐकायलाच तयार नाही. लई समजून सांगितले. पण यानं भांडण सुरु केलं. एवढ ऐकण्याची आपल्याला सवय नाही आणि हा कायबी बोलायला लागला. डोकं सटकलं, दिली एक ठेवून. मला वाटलं,आता तरी गप बसलं .. पण कसलं काय? हा जास्तच पिसाळला. गाडीसमोर आडवा झाला. गर्दी जमली. ट्राफिक जाम, निसता गोंधळ.. कुणीतरी पोलिसांना फोन केला म्हणून आम्ही इथं ”.
“ एवढंच होय. फार ताणू नका. चूक झाली माफी मागितली विषय संपला. वाढवू नका ” इन्स्पेक्टर यांनी राजाला समजावले.
“ साहेब,आता मी बोलू.” .. राजा.
“आता काय बोलायचे. आपसात मिटवून टाका. चला निघा ” .. इन्सपेक्टरांनी ऑर्डर दिली तेव्हा इतका वेळ उभा असलेला राजा चटकन खुर्चीत बसला.
“ हा अन्याय आहे. तुम्हांला माझी बाजू ऐकून घ्यावीचा लागेल. त्याशिवाय मी इथून जाणार नाही आणि यांनाही जाऊ देणार नाही. परत गाडीपुढे आडवा पडेन ” .. एका दमात राजा बोलला.
“ हात वापरू नको. कमरेत लाथ घाल. पट्ट्याने तुडव. सगळी आकड निघाली पाहिजे ” लॉकअप मध्ये एकाची धुलाई चालली होती तिकडे पाहत इन्सपेक्टर म्हणाले. तेव्हा तिकडून मारण्याचा आणि ओरडण्याचा आवाज वाढला. इन्सपेक्टरांनी राजाकडे पाहिले तेव्हा तो प्रचंड घाबरला पण त्यांच्या नजरेला नजर न देता उसनं अवसान आणून बसून राहिला. खुर्चीचे दोन्ही हात घट्ट पकडले होते. उजवा पाय जोरजोरात हालत होता.
“ मग,तुम्हांला अजून काय पाहिजे,बोला ” शक्य तितक्या शांत आवाजात वैतागलेल्या इन्सपेक्टरांनी राजाला विचारले.
“ धन्यवाद साहेब…. रस्त्यावर थुंकताना आपल्याकडे लोकांना काहीच वाटत नाही. मनाची नाहीच तर जनाचीही लाज नसते ”
“ ए,लाज कोणाची काढतो.xxxx” राजाच्या बोलण्यामुळे नवश्रीमंत भडकला. इन्सपेक्टरांनी दटावले तेव्हा तो शांत झाला.
“ जरा सांभाळून आणि मुद्द्याचं बोला ” इन्सपेक्टर
“ साहेब,थुंकताना कमालीचा कोडगेपणा आपल्या लोकांच्यात भिनला आहे. पाणी पिऊन गुळण्या करणारे, तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर सडा टाकणारे बाईकवाले , कारवाले सगळीकडे दिसतात. आताच्या साथीच्या आजारात सुद्धा अनेक ठिकाणी पचापच चालूच आहे.” राजा तावातावाने बोलत होता.
“ साहेब,भाऊकीत टिळ्याचा प्रोग्राम आहे. आधीच लई उशीर झालाय.आम्ही जाऊ का?? ” नवश्रीमंत.
.. इन्सपेक्टरांनी राजाकडे पाहिले. “ माझी काहीच हरकत नाही. फक्त मला पण यांना सॉरी म्हणायचे आहे .ते यांनी म्हणू दिले की जाऊ दे ” राजा
“आता तुम्ही कशाला सॉरी म्हणताय?? ” इन्सपेक्टर वैतागले.
“ तोच तर प्रोब्लेम आहे. म्हणून तर सगळे इथे आले आहेत ” हवालदार म्हणाले.
“ म्हणजे !! काय ते नीट सांगा ” इन्सपेक्टर
“ साहेब,हा माणूस येडायं, आम्ही हात जोडून सॉरी म्हटलं पण हे बेणं ऐकायला तयार नाही. तोंडाला येईल ते बोलायला लागला. आदी गप होतो पण लईच डोक्यात जायला लागला म्हणून मग……” नवश्रीमंत.
“ गाडीमधून रस्त्यावर थुंकलेलं नेमकं यांच्या अंगावर पडले परंतु लगेच माफी मागितली. आता या साहेबाचं म्हणणं आहे की ते यांच्या अंगावर आधी थुंकणार आणि नंतर माफी मागणार ” हवालदार म्हणाले तेव्हा इन्सपेक्टरांनी मिश्कीलपणे राजाकडे पाहिले. तो कमालीचा शांत होता. चेहऱ्यावर ठामपणा होता.
खरंतर इन्सपेक्टरांना राजाचे म्हणणे मनापासून पटले होते. रस्त्यावर कुठेही कसेही थुंकणाऱ्या लोकांबद्दल त्यांच्याही मनात सुद्धा प्रचंड राग होता.
राजाची “सॉरी” म्हणण्याची आयडिया फार आवडली, पण तसे उघडपणे बोलले असते तर प्रकरण वेगळ्याच दिशेला गेले असते.म्हणून त्यांनी हवालदारांना बोलवून काही सूचना केल्या. लगेचच हवालदार सगळ्यांना घेऊन चौकीच्या बाहेर आले.
“ दादा,हा माणूस तिरपागडा दिसतोय. गप बसणार नाही आणि माग बी हटणार नाही. तेव्हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे होऊ द्या आणि मॅटर संपवा. उगीच टाईम घालवण्यात काही फायदा नाही आणि तुम्हांलाच उशीर होतोय.” हवालदार नवश्रीमंत आणि त्याच्या घरच्यांना समजावत होते.
“हवालदार साहेब, तो अंगावर थुकणार म्हंजी….. याच्या तर आयला xxxxxx ” नवश्रीमंताने राजाची गचांडी पकडली.
हवालदाराने पोलिसी खाक्या दाखवला तेव्हा तापलेला नवश्रीमंत शांत झाला. अखेर “नाही-हो” करत तयार झाला. तेव्हा राजाने लगेच खिशातून मसाला पान काढले. ते पाहून हवालदाराने कपाळावर हात मारला.
नवश्रीमंत राजापुढे जाऊन उभा राहिला, पण “नाही नाही” म्हणत परत मागे गेला. असे दोनतीन वेळा झाले. शेवटी हवालदारांनी कायद्याच्या भाषेत दम दिला. तेव्हा पान खाणाऱ्या राजापुढे महागडा शर्ट घातलेला नवश्रीमंत गच्च डोळे मिटून उभा राहिला.
काहीवेळातच पचकन थुंकल्याचा आवाज आला आणि नंतर “सॉरी,सॉरी,माफ करा ” असे राजाचे शब्द ऐकु आले. शर्टवर उमटलेली लाल रंगाची नक्षी बघून नवश्रीमंताला स्वतःचीच प्रचंड किळस आली. चटकन त्याने अंगातला शर्ट काढला. हाताच्या चिमटीत पकडून त्याने गाडीच्या डिकीत टाकला.
“आई शप्पथ यापुढं रस्त्यावर कदीच थुकणार नाही. तर पब्लिकमध्ये थुकताना हजार येळेला इचार करीन.” .. नवश्रीमंत.
“ तुम्हांला त्रास झाला त्यासाठी माफ करा. पण माझा नाईलाज होता. घरात आपण कुठंही थुंकत नाही मग रस्त्यावरच का?? ”
राजाची अनोखी थुंकेगिरी इन्सपेक्टरांना पटली होतो. खिडकीतून राजाकडे पाहत अंगठा उंचावून त्यांनी “वेल डन” खुण केली.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈