डॉ. जयंत गुजराती
विविधा
☆ जी सरकार ☆ डॉ. जयंत गुजराती ☆
कधीकधी मला इतका राग येतो ना की मला क्रांती कराविशी वाटते. बंडाळी, क्रांती, उठाव हे शब्द वामपंथीयांचे साहित्य वाचल्यामुळे डोक्यात भिनलेले. आता त्याशिवाय म्हणजे क्रांति शिवाय पर्याय नाही. बंड करावेच लागेल. उठाव करावाच लागेल. जुलूम सहन करता कामा नये. किती सहन करावं. सारखं तेच तेच अन्यायच अन्याय. मग एक दिवस असा उगवतो की कडेलोट होतोय असं वाटताना उद्रेकच होईल असं ठाम मत होतं. असा एकच दिवस नव्हे तर महिन्यातून एक दिवस उगवण्याचे ठरलेलेच व बहुतेक तो रविवारचाच दिवस असतो, ज्यादिवशी हक्काची सुट्टी असते व त्याला कारण आमचं सरकार!!
तसं आमचं सरकार अजबच म्हणायचं. (तसं म्हणण्याची हिम्मत होत नाही ही गोष्ट वेगळी!) तर आमचं सरकार, आलं देवाजीच्या मना या धर्तीवर, चला आपण ही खोली साफ करूयाचं फर्मान सोडून मोकळं होतं. सरळ सरळ ब्रह्मांडच आठवतं. निम्मा दिवस तरी वाया जाईल याची अक्षरशः मनाची खात्रीच पटते. रविवार म्हटला की कसं, सकाळीस उशिरा उठणं, सावकाश दाढी उरकणं मग मनसोक्त शॉवर खाली आंघोळ, मग गरम गरम नाश्ता व हातात वर्तमानपत्र, वा मोबाईल, त्यातील व्हॉट्स एप व फेसबुक फ्रेंड्स, इन्स्टा, स्नॅपचेट, वाटच पहात असतात की हा गडी कधी ऑनलाईन होतो. यापरतं परमसुख नाही. थोडं…. . फार इकडे तिकडे सर्फिंग केलं की रविवार मजेत जाणार याची ग्यारंटी! पण कधीकधी तसं घडायचं नसतं!
बायको एका हातात झाडू, दुसऱ्या हातात खराटा, काखेत वरची जळमटं काढायला लांब काठीला बांधलेला झाडू, तीन चार बादल्या पाण्याने भरलेल्या, हिपोलीनच्या पुड्या, ओली फडकी, कोरडी फडकी, जय्यत तयारी करून समोर उभी ठाकलेली. मग मनातले मांडे बाजूस सारून आपसूकच उभं होणं आलं. हिचं आपलं ओठातल्या ओठात पण खरमरीत पुटपुटणं चालूच असतं, “ नाही तरी तुम्हाला कामाचा कंटाळाच तेवढा. हातातून मोबाईल खाली ठेवता ठेववत नाही.” मी आपला तिच्या वाक् बाणांकडे कानाडोळा करत होतो. पण खरं सांगू का? ते क्रांती, बंड, उठाव यांचं अवसान गळूनच पडलं होतं. बघता बघता कपाटं रिकामी होत असलेली, खिडकीचे पडदे काढणं, भिंतींवरचे फोटोफ्रेम, काय काय ते खोलीच्या मधोमध माझ्या उंचीचे ढीगच ढीग. शिवाय शेजारी मोठालं स्टुल ठेवलेलं. त्यावर मलाच चढणं भाग होतं. पंखा, ट्युबलाईट पुसायला. अडगळीची खोली, पोटमाळा असला की त्या स्टुलावरून एकदा चढणं झालं की मोहीम फत्ते झाल्याशिवाय उतरणं होत नसे.
“ एकेक वस्तु द्या बरं पुसून, अगोदर कोरड्या फडक्याने मग ओल्याने. ” मी म्हटलं, “ हुकूम सरकार! ” हे झालं का? ते झालं का? हे इथे नका ठेवू, ते तिथे बरं दिसेल. पुढे सरकवाना पुढे. ते तेवढं बाजूला ठेवा. मग मोलकरीणला देऊ, भंगारात काढू, अहो हे माझ्या मावशीची चुलत भाची हे केव्हापासून मागत होती. तिच्यासाठी राखून ठेऊ. ती इतक्या वेगाने ती निर्णय घेत होती की मला काय मत द्यावं ते उमजत नव्हतं. मग तिने एकेक बॉक्स काढायला घेतले, तसं माझं पित्त खवळलं, “ अगं त्यात वर्तमानपत्रात व मासिकांत आलेले माझे लेख आहेत. ती अडगळ नाहीये, पाहिजे तर पुसून देतो पण ते बॉक्स जसेच्या तसे परत ठेव. ” यावर “कोण वाचतंय इतकं सगळं? नुसती जागा अडून राहिलीय.” कुणीतरी गरम शिसं कानात ओततंयची फिलींग आली बुवा. पण मग मी निक्षून सांगितलं. “त्याला हात लावू नको, पाहिजे तर दुसरं कपाट आणून देईन मी!” मग ते तेवढ्यावर निभावलं.
बारा वाजले तरी पसारा आ वासून डोळ्यापुढे! म्हटलं, “ ए बये, तू आणखी नको करू उचकपाचक, नाहीतर ह्यातच संध्याकाळ व्हायची. ” तिनं उलट उत्तर दिलं, “ तुम्हीच पटापट हात चालवा बघू. आवराआवर करायला वेळ लागत नाही. ” मी कपाळाला हात लावला. हिच्या समोर कोणतीही संथा चालत नाही. आलिया भोगासी म्हणत(अर्थात मनातल्या मनात!) एकेक वस्तूंवरून हात फिरवू लागलो. तिचा चेहेरा सगळं मनासारखं होत असल्याचं सांगून जात होता.
झालं एकदाचं आवरून. माझं तर तसं कंबरडंच मोडलेलं. तरीही हुश्श, साहीसुट्ट्यो असं सवयीने मनातल्या मनात म्हणून घेतलं. तिचं बारीकसारीक सामान इथे तिथे लावणं चालूच होतं. तेही एकदाचं आटपलं, मग माझ्यासमोर जितंमयाच्या आवेशात पहात ती बोलली, “आता कसं दिसतंय सगळं?” अनाहूतपणे मी बोलून गेलो, “काही फरक पडलेला नाही, जसंच्या तसंच तर आहे सगळं!” हे ऐकल्या बरोबर तिचं मुसमुसणंच सुरू झालं. बाकी एकदम शांतता पसरली. मी किती घोर अपराध केलाय याची प्रचंड जणीव मला झाली. अचानक तिला वाचा फुटली, “ तुम्हाला तर माझी किंमतच नाही. कितीही कष्ट करा, मर मर मरा, राब राब राबा, सगळं पालथ्या घड्यावर पाणीच. ” आता घड्याच्या जागी मीच मला दिसू लागलो व अंगावरून गार पाणी वाहत असल्याचा भास झाला. तेव्हा लक्षात आलं, दोघांच्या आंघोळी लटकलेल्या. तसं मी तिला जवळ घेत म्हटलं, “ नाही गं, तुला छानच जमतं सगळं यथास्थित लावणं. जशी तू देखणी तशी तुझी ही खोली. चल, आज तसा उशीरच झालाय, तू सैंपाक करण्याच्या भानगडीत पडू नकोस, बाहेरच जेवू!!” मी अंदाज घेऊ लागलो. माझ्या शब्दांचा परिणाम होत असलेला. तिचं मुसमुसणं थांबलं. म्हणाली, “तसं आपण दोघेही दमलोय तेव्हा तू म्हणतोस तसंच करू. मी आंघोळ करून येते. तोपर्यंत….” तिने चक्क मोबाईल माझ्या हाती दिला. अन् मी खरडू लागलो. अजून लेख लिहून पूर्ण होत नाही तो बाथरूममधून हाक आली, हाक कसली दमदार आवाजातला आदेशच. “आंघोळ करून घ्या बघू! अन् तो मोबाईल ठेवा खाली!!” मी लगेच म्हटलं, “जी, सरकार….”
© डॉ. जयंत गुजराती
१०/१२/२०२३
नासिक
मो. ९८२२८५८९७५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈