सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

एकटेपण? नाही फक्त सुंदर एकांत… – लेखिका : सुश्री नीला शरद  ठोसर ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

मी २०१३ पासून एकटी राहते. म्हणजे वयाच्या ७६व्या वर्षांपासून. आज माझे वय ८७+ आहे. हे एकटे राहणे मी मनापासून निवडले आणि त्याचा मला कधीच पश्चात्ताप करावा लागला नाही. कारणानिमित्ताने मी मुलाकडे जाते पण तेथे राहत नाही २ दिवसाच्या वर. मला तेथे करमतच नाही. ना काम ना धाम. वाचन आणि टीवी ह्यात वेळ घालवायचा. शिवाय प्रत्येकाची खोली वेगवेगळी. ते मला झेपतच नाही.

आत्ताच काही दिवसापूर्वी तब्येतीच्या कारणाने दीड महिना मुलाकडे राहिले..तर ढगांचे आकार बघण्याचा छंद  लागला… खिडकीतून फक्त तेच दिसतात ना? त्यातही मजा असते बरे का.  मुलगा आणि सून बाई कायम आग्रह करतात की आता येथेच राहा. मुलगा म्हणतो “आई फक्त बरे नसले तरच येतेस”..  मी त्यांना म्हणते, “अजून माझे हातपाय चालू आहेत. ते थकले की तुमच्याकडेच तर यायचे आहे.”

दिवसा गुड मॉर्निंगचा संदेश आणि रात्री गुड नाईटचा संदेश नेमाने पाठवते. विशेष काही घडले की फोन करतो एकमेकांना. शिवाय आजकाल विडिओ कॉलचीही सोय असतेच. म्हणजे तसे आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो. शिवाय माझ्या एक असे लक्षात आले आहे की मी समोर असले की दोघांना माझी जास्तच काळजी वाटायची. ते बाहेर जाताना हजार सूचना केल्या जायच्या. माझ्यात दोघे अडकून पडायचे. तेव्हाच ठरवले की आता घरी परतलेच पाहिजे. परंतु माझ्या अशा एकटे राहण्याचे अनेकांना आश्चर्य वाटते. प्रथम प्रथम बरे – वाईट तर्क – कुतर्क  आपापल्या मगदूराप्रमाणे लोकांनी केले. पण आता बहुतेक वृध्दांना माझी राहणी पटू लागलीये.

अनेकांना  जागेची दुसरी सोय नसल्याने जीव मारून एकत्र राहावे लागते. सर्वांचीच त्यामुळे मानसिक कोंडी होते आणि चिडचिड वाढते. कोणी आर्थिकदृष्टया मुलांवर अवलंबून असतात.  त्यामुळे एकत्र राहावेच लागते. काही वेळा तब्येत चांगली नसते आणि कोणाच्या तरी आधाराची सतत गरज भासते. देवदयेने अजूनपर्यंत मला ह्या परिस्थितीतून जावे लागले नाही. म्हणून उगीचच मुलाच्या संसारात गुंतून राहणे मला पटले नाही. तसे अडीअडचणीला सून आणि मुलगा फोन केल्याबरोबर धावून येतात.   हे पुरेसे नाही का? लांब राहून गोडी टिकवणे मी जास्त पसंत करते.

आता दुसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे एकटे राहिले की दुखणे येऊ नये म्हणून मी  माझ्या आरोग्याची नियमित काळजी घेते. व्यायाम/आहार / विश्रांती सर्व वेळच्यावेळी करते. दिनक्रम व्यवस्थित आखून घेतल्यामुळे उगीच आळसात वेळ घालवत नाही. कालपर्यंत घरातील सर्व कामे मीच करत होते. आता काही लोक ह्याला कंजुषी म्हणतील. पण ह्यात खूप फायदे आहेत. पैसे वाचवणे, हा हेतू नाहीच आहे. पण मन कामात व्यग्र राहते, वेळ चांगला जातो, आपोआप शरीराला व्यायाम होतो हे फायदे महत्त्वाचे आहेत. मला पहिल्यापासून व्यायामाची  आवड आहे. पहाटे  ४ वाजता उठून ६ पर्यंत त्यात वेळ जातो आणि मग घराकडे बघायचे. पूर्वी  मॉर्निंग वॉक घेत असे. आता घरातल्या घरात एकाच जागेवर तसेच अगदी थोड्या जागेत इंग्लिश 8 च्या आकड्याबरहुकूम चालून चांगला व्यायाम होतो, हे शिकले आहे. यु ट्युबवर पाहून.. शिवाय बाहेरची सर्व कामेही मी करते. (आता एक मदतनीस आहे. ) मुलाची शक्यतोवर मदत घ्यायची नाही, असा नियम केला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आपण पेलू शकतो, हा आत्मविश्वास मिळतो आणि त्यातून जगण्याची ऊर्जा मिळते. माझे छंद मला त्यामुळेच आजपर्यंत जोपासता आले.

आतापर्यंत व्यवस्थित चालले आहे. उद्याचा विचार मी करतच नाही. रोज देवाचे आभार मानते, ज्याने मला सुजाण आईवडील,प्रेमळ भाऊबहिणी,आनंदी लहानपण,उत्तम शिक्षण,चांगले नातेवाईक आणि  प्रेमळ कुटुंब दिले. आता एकटे राहण्यामुळे जुन्या आठवणी  मनात जागवताना मनाला निरलस शांतता मिळते. आज तरी एकटे राहणेच मला आवडते. ना कसली इच्छा ना कसली अपेक्षा.. उद्या काय होईल, त्याचा विचार मी करतच नाही. तब्येतीने साथ देणे सोडले की आहेतच मुलगा आणि सूनबाई..!

लेखिका : श्रीमती नीला शरद ठोसर

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments