सौ कल्याणी केळकर बापट
विविधा
☆ “आयडेंटिटी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
मध्यंतरी एका कार्यक्रमाला जायचा योग आला तेव्हा त्यांनी माझा परिचय करून देताना माझ्या बद्दल काही माहिती सांगून ओळख करून दिली.तेव्हां जरा लक्षात आल एकाच व्यक्तीची किती वेगवगळ्या प्रकाराने ओळख दडलेली असते.ती ओळख कधी नात्यातून तर कधी आपण करीत असलेल्या कामावरून तर कधी कधी आपला स्वभाव, आपला जनसंपर्क ह्यावरून ठरत असते.
एकदा नोकरीत असतांना सर्व्हिस बुकमध्ये बोटांचे ठसे घेतले तेव्हाही ही आपली अजून एक ओळख हे ध्यानात आले. इंशुरन्स पाँलिसी काढतांना ओळख म्हणजेच आयडेंटिटी मार्क विचारतात ही पण एक ओळखच. अशा निरनिराळ्या प्रकारच्या आपल्या एकाच व्यक्तीच्या ओळखी बघुन अचंबित व्हायला झालं.
सहजच मनात आलं खरचं एवढीच असते आपली ओळख?आपली आयडेंटिटी?नक्कीच नाही.
मग ठरवलं आपली ओळखं आपली आयडेंटिटी आपण स्वतः तयार करायची.
सहसा घरच्या सगळ्या जबाबदा-या पार पाडता पाडता स्त्रीला स्वतः चा विसरच पडतो आणि मग इतर लोक जसे तिला गृहीत धरायला लागतात तसेच ती पण स्वतः ला गृहीत धरायला लागते.
कोणाची बायको,कोणाची आई म्हणून ओळख असणं आनंद देतचं पण आपल्या ओळखीला परिपूर्णता तेव्हाच मिळते जेव्हा आपली आपल्या स्वतःवरून ओळख पटते.
तिचं सगळं वागणं,बोलणं,आवडनिवड,सोयी ह्या सगळ्या घरच्यांचा आधी विचार करूनच ठरल्या जातात.अर्थात हा तिच्या स्वभावाचाच भाग असतो.ह्याचे प्रमाण सिमीत असेल तर तिला त्यात आनंदही मिळतो. ह्या गुणांमुळे घर एकत्र बांधून ठेवायला मदतच होते. पण ह्याचा अतिरेक झाला तर ती स्वतः मधील “स्व” च विसरते.
ह्याचाच परिणाम म्हणजे स्वतःचा स्वतः वरील विश्वास उडतो म्हणजेच आत्मविश्वास कमी होतो. लहानसहान बाबींमध्ये सुध्दा दुसऱ्या वर अंवलंबून राहायला लागतो.
समोरच्यांच्या मतांचा आदर जरूर करावा पण तेवढेच आपल्या मतांनाही प्राधान्य द्यावे.
शेवटी काय तर आपण केलेले कर्म आणि करीत असलेले कार्य च खरी दाखवतात आपली आयडेंटिटी.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈