सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ नशीब जीवनअंताचे ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

तात्यासाहेब… आमच्या भागातले एक सुपरिचित व्यक्तिमत्त्व … सतत माणसांच्या घोळक्यात असणारे … अल्पशा आजाराने काल रात्री त्यांचं निधन झालं … रात्री म्हणजे १२ च्या सुमारास. हां हां म्हणता ही बातमी वा-यासारखी पसरली, आणि लोक त्यांच्या घरासमोर जमा व्हायला लागले. आमच्या घरासमोरच त्यांचं घर, त्यामुळे आमचा चांगला घरोबा होता. त्यामुळे आम्हीही रात्री लगेचच त्यांच्या घरी गेलेलो होतो. बघता बघता गर्दी प्रचंड वाढली… तात्यासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी धक्काबुक्की व्हायची वेळ आली. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला, आणि मग रांगेने दर्शन घेणे सुरु झाले… ते थांबेपर्यंत सकाळचे नऊ वाजत आले होते. अखेर फुलांनी शाकारलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा निघाली. तो ट्रक दिसेनासा होईपर्यंत आम्ही थांबलो, आणि मग घरी परतलो. या घटनेने अस्वस्थ झालेले मन मात्र एव्हाना शांत होण्याऐवजी जास्तच अस्वस्थ झालं होतं… कारण ….. 

कारण मला सारखे आठवत होते आमचे तात्यासाहेब… खरंतर या टोपणनावातलं साधर्म्य सोडल्यास या दोन तात्यासाहेबांमध्ये काडीचंही साधर्म्य नव्हतं. आमचे तात्यासाहेब… त्यांच्या एकूण सहा भावंडांमधलं शेंडेफळ… पण म्हणून त्यांचे विशेष लाड करण्याचा तो काळ नव्हता. लहानपणापासून त्यांना फीट्स येण्याचा त्रास सुरू झाला, आणि तो त्रास त्यांचं आयुष्य… त्यांचं व्यक्तिमत्त्व सगळंच व्यापून टाकायला लागला… ते अगदी शेवटपर्यंत. औषधोपचारांमुळे तरुण वयात येतांना तो त्रास थांबला खरा… पण स्वत:चे दूरगामी परिणाम मात्र तात्यांच्या सोबतीला ठेवून गेला. लहानपणापासूनच त्यांची जीभ जड झालेली असल्याने बोलण्यातही ते जडत्व आले होते. मोठे तिघे भाऊ उत्तमरित्या शिकून, चांगल्या नोक-या मिळवून आयुष्यात स्थिरावले होते… पण तात्यांच्या नशिबात तो योग नव्हता. आजारपणामुळे पुरेसे शिक्षण घेणे शक्य झाले नाही… त्यामुळे स्थिर स्वरुपाची नोकरी नाही. आणि अर्थातच् लग्न हा विषयही आपोआपच लांब राहिलेला… हळूहळू इतरांच्या विस्मरणात गेलेला…. आणि बहुतेक तात्यांनीही स्वतःच स्वतःची समजूत घालून तो संपवलेला असावा. थोडक्यात काय, तर त्यांच्या नावातला ‘ वसंत ‘ प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यात कुठल्याच रूपात कधीच फुलला नव्हता.                

त्यांच्या लहानपणीच त्यांचे वडील गेले असल्याने आई शेवटपर्यंत थोरल्या भावाकडे राहिली, आणि तिच्याबरोबर तात्याही. दुस-या कुणावर आपला सगळा भार टाकायचा नाही ही समजही होती आणि संस्कारही. घरी वहिनीला लागेल ती सगळी मदत करायची… अगदी घरकामापासून ते बाजारहाट करण्यापर्यंत. आणि एका तपकिरीच्या कारखान्यातही माल आणणे, पोहोचवणे व मालक सांगतील ती इतर कामे मनापासून करणे… बस् एवढंच मर्यादित आयुष्य होतं त्यांचं. वहिनीच्या हाताखाली त्यांना काम करतांना पाहिलं की नकळत एकनाथ महाराजांच्या घरच्या ‘श्रीखंड्याची’ आठवण व्हायची. मोठ्या भावाला, म्हणजे आमच्या मोठ्या काकांना दोन मुलं होती. पण तात्यांमुळे त्यांच्यावर कुठल्याच कामाचा भार कधी पडायचा नाही. मोठा मुलगा खूप शिकला… खूप लांब, वेगळ्याच राज्यात उच्च पदाची नोकरी मिळवून तिकडेच स्थायिक झाला, त्यामुळे कधीही आला तरी पाहुणाच. आणि धाकटा मुलगा त्याच्या अगदी उलट… मंदबुध्दी… घरासाठी निरुपयोगी… पण त्यामुळे घरात काहीच फरक पडत नव्हता… कारण तात्या होते ना कायम हाताशी.

कालांतराने वहिनी गेली. भाऊ पक्षाघाताने कायमचा आजारी झाला. पण तात्यांनी श्रावणबाळ बनून त्यांची लागेल ती सगळी सेवा केली… अगदी शेवटपर्यंत. भाऊ गेला आणि मग मात्र तात्या ख-या अर्थाने एकाकी झाले… तसेही, ते एका कुटुंबात रहात असूनही, आत कुठेतरी कायम एकटेच होते, असं मला नेहेमी जाणवायचं.

नात्यातल्या… ओळखीच्या लोकांकडे ते अगदी नेमाने जायचे. थोडा वेळ थांबून परतायचे. पण तेवढ्या वेळात सगळ्या चौकश्या करायचे… अर्थात् त्यात भोचकपणा करणे हा हेतू मात्र जाणवायचा नाही. मनातून माणसांच्या आपुलकीची आस तेवढी जाणवायची त्यात… आपलं कुणीतरी आहे, जिथे आपण न सांगता, न विचारता जाऊ शकतो, हा एक अनामिक दिलासाही मिळत असावा कदाचित्… असा विचार मनात आला की माझं मन खूप अस्वस्थ व्हायचं… एक अपराधीपणाची जाणीव बोचायला लागायची. मोठे काका गेल्यावर तर तात्याच ख-या अर्थाने ‘पोरके’ झाले होते. पण त्यांच्या वागण्या बोलण्यात त्यांच्या मनातली उद्गिग्नता ते कधीच दाखवायचे नाहीत, आणि मला…आम्हा चुलत-आत्ये भावंडांना जास्तच अपराधीपणा जाणवायचा.

हळूहळू तात्याही थकले. पूर्वीसारखं काम होईनासं झालं. आता यांचं कसं होणार? हा विचार करण्यापलिकडे आम्ही कुणीच काही केलं नाही… करू शकत नव्हतो. कारण प्रत्येक जण आपापल्या मर्यादित संसाराच्या चक्रात गुरफटलेला… अखेर तात्यांना वृध्दाश्रमात ठेवायचे हाच एकमेव पर्याय असल्यासारखा… सगळ्यांनी निर्णय घेतला होता… आणि इथेच खूप खूप प्रकर्षाने पुन्हा एकदा जाणवलं, की तात्या आत… आत कुठेतरी सदैव एकटेच होते, आणि हे एकटेपण त्यांनी आयुष्यभर शांतपणे… मनापासून स्वीकारले होते. इतक्या वर्षात त्यांनी स्वत:साठी म्हणून कुठल्याच गोष्टीसाठी त्रागा केला नव्हता… आणि हा वृध्दाश्रमाचा निर्णय स्वीकारतांनाही नाही… मुळीचच नाही. ठरल्या दिवशी ते अतिशय शांतपणे त्या वृध्दाश्रमात रहायला गेले… त्यावेळी त्यांचे पाय त्यांना किती मागे ओढत असतील, या विचारानेही अपराधीपणाचं प्रचंड ओझं मनावर आलं होतं… जे शेवटपर्यंत वागवलं होतं आम्ही.

आणि माझी बहीण त्यांना नियमितपणे भेटायला जायचो. त्यांच्या आवश्यकतेच्या वस्तू त्यांच्यासाठी घेऊन जायचो… अगदी  मनापासून. पण तेव्हा जाणवणारी हतबलतेची भावना पुढचे दोन-तीन दिवस आमची पाठ सोडायची नाही. 

त्यांचे हात थरथरायचे. त्यामुळे एकदा त्यांच्या हातून कॉफीचा भरलेला कप खाली पडला… आणि त्यांची राहण्याची सोय जिथे केलेली होती, त्या वॉर्डमधल्या इतर ‘ निराधार ‘ वृद्धांनी त्यांना त्या खोलीतून हलवण्यासाठी व्यवस्थापकांचा पिच्छा धरला, आणि त्यांना नाईलाजाने दुस-या खोलीत हलवण्यात आले. आम्ही भेटायला गेलो त्यावेळी त्यांनी स्वत:च आम्हाला हे सांगितले… शांतपणे…एखाद्या त्रयस्थांबद्दल सांगावं तसं. ‘अतीव नाईलाजाची परिणती अशा शांततेत होते का? ‘या विचाराने  मी पछाडल्यासारखी झाले होते… पण मग स्वत:च्या नावामागे जन्मभर जणू ‘नाईलाज’ या शब्दाची सावली घेऊन फिरणारे तात्या, कसे जगले असतील इतकी वर्षे… हा विचार मनात आला आणि मलाच माझा राग आला. मनात आलं… ‘या वृध्दाश्रमात माणसं रहात नाहीत… फक्त आणि फक्त ‘नाईलाज’च रहातो.

एक दोन वर्षं गेली, आणि तात्या आजारी पडले. ‘रूग्ण’ झाले आणि रूग्णांच्या वॉर्डमध्ये त्यांना हलवलं गेलं. वृध्दाश्रमाने केलेली जी औषधोपचारांची, डॉक्टरांची सोय होती, त्यानुसार उपचार चालू झाले. पण अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. कसा मिळणार?… ‘कसा आहेस रे?… होशील हं लवकर बरा…’ या मनापासूनच्या, प्रेमाच्या, आपुलकीच्या शब्दांना जणू मज्जावच होता तिथे…

आणि एक दिवस फोन आला… तात्या गेल्याचा. आयुष्यभर एका अदृश्य कुंपणापर्यंतच धाव येत राहिलेला एक सरडा आज सगळ्यांचा डोळा चुकवून कुंपणाबाहेर पडला होता, असले काहीतरी विचित्र विचार माझं मन पोखरायला लागले होते ..आत्तापर्यंत कुंपणाबाहेर पडायचा प्रयत्न कधीच करता आला नसेल का त्यांना? केलाही असेल… मनातल्या मनात. पण… ‘नाईलाजच’ झाला असेल त्यांचा… पाचवीलाच पूजलेला तो… या असल्या विचारांनी मन फार भावूक झालं होतं. ‘हतबलता’ या शब्दाच्या अर्थाचा एक नवा पैलू समोर दिसत होता… पण आता तात्यांइतकीच ती हतबलता फक्त काळाचीच नाही, तर त्या विधात्याचीही  असावी… असले काही ना काही विचार करतच मी आणि मिस्टर तिथे पोहोचलो… पाठोपाठ बहीण-मेव्हणेही आले. आणखी कुणी येण्यासारखंच नव्हतं. त्यांना ठेवलेल्या खोलीत गेलो. मात्र… आणि एकदम पायच गळून गेले… अडगळीची वाटावी, अशा एका खोलीत, जमिनीवर स्ट्रेचर ठेवून त्यावर त्यांचा निष्प्राण देह ठेवला होता. त्याला मुंग्या लागू नयेत म्हणून भोवतीने मुंग्यांची पावडर पसरून ठेवली होती… देवा… बघवत नव्हतं ते दृश्य…

त्या आमच्या समोर राहाणाऱ्या तात्यासाहेबांच्यासारख्या so called लोकप्रिय माणसांची फुलांनी मढलेली ती तशी मृत्यूशय्या… आणि ही… आमच्या तात्यांची चहू बाजूंनी मुंग्यांची पावडर पसरून ठेवलेली मृत्यूशय्या… ‘शय्या’ या शब्दाचीच अवहेलना होती ती…

आमचीच वाट पहात थांबलेले आश्रमाचे व्यवस्थापक आम्ही पोहोचल्याचे पाहून लगबगीने दोन माणसांना घेऊन आत आले… स्मशानभूमी तिथून जवळच होती. तिथपर्यंत तात्यांना ऍम्ब्युलन्सने नेतील असं वाटलं होतं… पण नाही… इथेही उपेक्षाच… त्या माणसांनी ते स्ट्रेचर उचलल्यावर आम्हीही पाठोपाठ खोलीबाहेर गेलो… आणि पाहतो तर काय ….ते स्ट्रेचर मावेल एवढ्या आकाराची एक हातगाडी तिथे होती… भाजीवाल्यांची असते तशी… त्या माणसांनी पटकन् ते स्ट्रेचर त्यावर ठेवलं आणि गाडी ढकलायला सुरूवात केली… सहज… नेहेमीची सरावाचीच तर गोष्ट होती ती त्यांच्या… पण आम्ही चौघे… आम्ही अक्षरश: पाय ओढत मागे चाललो होतो… आयुष्यात पहिल्यांदाच… आणि कदाचित शेवटचंच्.

वृध्दाश्रमाच्या नियमांनुसार विद्युत-दाहिनीत थेट दहन… अंत्यसंस्कार तर सोडाच… एक हारही घालणं त्यांच्या नियमात नव्हतं… आणि अचानक एक कविता आठवली होती मला… “ एक तरी बागेतील फूल कौतुके देशील… बाळगली आशा फोल…” असंच आणि एवढंच होतं त्यांच्या भाळी लिहिलेलं … “आता पुष्पराशीमाजी बुडे मात्र ताटी…” ही पुढची ओळही केवळ त्या कवितेपुरतीच राहिली होती…. तात्यांच्या बाबतीत… आयुष्यभर अशा किती ओळी… जराशा सकारात्मक ओळी तात्यांनी जाणीवपूर्वक नजरेआड केल्या असतील, या विचाराने माझे डोळे वाहू लागले… मी पुन्हा एकदा तात्यांना नमस्कार केला… यावेळी फक्त मनातल्या मनात… कारण एव्हाना विद्युत-दाहिनी तिचे काम करून मोकळी झाली होती.    

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments