सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ सोहळे – ऋतूंचे…भाग १ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

वेलींवर धुंद बहर यावा, निसर्गाने रंग आणि गंध यांची उधळण करावी, फुलपाखरांचे थवे पाहून नयन तृप्त व्हावेत, पक्ष्यांच्या मधुर कूजनाने आसमंत भारून जावा, हळू हळू चोचीत काड्या घेऊन पक्ष्यांचं विणकाम सुरू व्हावं, अशी जर निसर्गात आनंदाची बरसात असेल तर आपलं मन ही त्यात भिजून चिंब होतं. दिवस बदलत जातात, आणि एक दिवस पानगळ सुरू होते. पक्ष्यांचा आधारच नष्ट होतो. पण कुठे त्रागा नाही, कासाविशी नाही, फक्त वाट पहायची पुन्हा बहर येण्याची! निसर्गाची हीच शिकवण आहे, पुढे चालत रहायचं,फक्त चालत रहायचं! बोरकरांची ध्यासपंथे चालणारी ती देखणी पाऊले असतील तर, वाट कशी आहे याची काळजी करायचं कारणच नाही.

रोज उद्याची नव्यानं वाट पाहायची. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस वेगळा असणार आहे. त्यामुळेच तर जगण्यात मजा आहे. ही मजा आणखी वाढविण्यासाठी निसर्गाने ऋतु निर्माण केले असावेत. ऋ म्हणजे गती, ऋत म्हणजे क्रमाने येणारी गती, ऋतु म्हणजे क्रमशः विशिष्ट गतीने पुन्हा पुन्हा येणारे. भारतात आपण सहा ऋतू मानतो त्यांची नावे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर!प्रत्येक ऋतु सुखावह असो किंवा नसो त्या त्या वेळी वेगवेगळे सण साजरे करून आपण ते आनंदी करतो.

वसंताने आपले नववर्ष सुरू  होते आणि शिशिराने संपते. जणू नव्या पालवी बरोबर नव्या आकांक्षा, नवं ध्येय, नवा उत्साह वसंत देतो, म्हणून ही नव्या वर्षाची सुरवात! आपोआपच शेवट शिशिराने होतो. जसं पालवी बहरते, पाने, फुले, फळे, शाखा यांनी झाडाची वाढ होते. ही पाने वर्षभर नको असलेल्या गोष्टी काहीही त्रागा न करता साठवतात. वर्षाच्या शेवटी हा सगळा कचरा झाडं अलगद शरीरापासून वेगळा करतात. कारण त्याला माहीत असतं, नवी पालवी फुटणार आहे. आपलं पण असंच असावं, नव्या उमेदीने वर्षाची सुरुवात करायची. जे जे दुःख पदरी पडलं असेल ते हळूच मनाच्या एखाद्या कोपऱ्यात साठवावं अगदी कचरा समजून, आणि असंच मनापासून अलगद वेगळं करून टाकावं, परत नवी उमेद भरून घेण्यासाठी!

वास्तविक कललेली पृथ्वी, तिचे सूर्याभोवती (लंबवर्तुळाकार) व स्वतःभोवती भ्रमण यामुळे जलवायुचे भिन्न भिन्न कालावधी निर्माण होतात. त्यांना ऋतू म्हणतात. भारताचं खास वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य व ईशान्य मोसमी वारे त्यामुळे पावसाळा हा स्वतंत्र ऋतु असतो. सूर्य मृग नक्षत्रात आला की पावसाळा सुरू होतो आणि हस्त नक्षत्रात आला की संपतो.अशी नऊ नक्षत्रे पावसाची असतात.असे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांचा हिशेब चार चार महिन्यांचा असतो. त्यातले बारीक फरक लक्षात घेऊन होतात सहा ऋतू, दोन दोन महिन्यांचे!

आपण जरी चैत्र,वैशाख महिन्यात वसंत आणि याप्रमाणे क्रमाने दोन दोन महिने एक एक ऋतु असं मानलं असलं तरी हे मराठी महिने अंदाजे ऋतू सांगतात कारण प्रत्यक्षात हे चांद्रमास आहेत, म्हणजे पौर्णिमा, अमावस्या यावर ठरणारे आणि ऋतु हे सूर्याभोवती च्या भ्रमणामुळे  होत असल्यामुळे त्यांचा आपल्या मराठी महिन्यांशी काही संबंध नसतो. म्हणून ऋतु आपले रंग त्या मराठी महिन्यात  दाखवेलच असे नाही.

आकाशातील तारका समुहावरून आपण २७ नक्षत्रे ठरवली आहेत. सव्वा दोन नक्षत्रांची एक रास होते. अशा बारा राशी आहेत. म्हणजे सूर्य  प्रत्येक महिन्यात एक रास ओलांडतो. त्याला सूर्य संक्रांत म्हणतात. (उदा.मकर संक्रांत,कर्क संक्रांत) सहा ऋतु मधे शिशिर, वसंत, ग्रीष्म हे उत्तरायणात होतात .२२ डिसेंबर,पासून उत्तरायण सुरू होते ,याचदिवशी शिशिर ऋतु सुरू होतो. पृथ्वी सूर्याच्या जास्त जवळ जवळ जाऊ लागते म्हणून तापमान हळू हळू वाढत जाते.  दिवस मोठे व्हायला सुरवात होते. तर वर्षा, शरद, हेमंत हे दक्षिणायनामुळे होतात. २१ जून ला दक्षिणायन सुरू होते,ह्याच दिवशी वर्षा ऋतू सुरू होतो.त्यानंतर पृथ्वी सूर्यापासून लांब जाऊ लागते, म्हणजेच दिवस लहान होऊ लागतात. तापमान हळू हळू कमी होऊ लागते. म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे आपण ऋतूंचा अंदाज बांधू शकतो, मराठी महिन्याप्रमाणे  नाही.

तैत्तरीय संहिते प्रमाणे ऋतु —

तस्य ते (संवत्सरस्य) वसंता: शिर: || ग्रीष्मो दक्षिण: पक्ष:|| वर्षा: पृच्छं||शरदुत्तर: पक्ष:|| हेमंतो मध्यं ||

म्हणजे संवत्सर ( वर्ष) हा काल्पनिक पक्षी आहे, त्याचे वसंत हे शिर, ग्रीष्म हा उजवा पंख, वर्षा ही शेपूट, शरद हा डावा पंख, व हेमंत हे उदर आहे.

आपला पहिला ऋतु वसंत! आंब्याच्या मोहराचा सुगंध, कोकिळेचं मधुर कूजन, बहरलेली झाडं, वेली, रंगीबेरंगी फुलांनी नटलेली सृष्टी, किती वर्णन करावं तेवढं थोडं आहे. कविमनाला भुरळ घालणारा हा ऋतु! हा ऋतु साजरा करायला असतो चैत्र पाडवा, वसंतोत्सव,अक्षय्य तृतीया, चैत्रागौर! पन्हं,कैरीची डाळ देऊन हळदीकुंकू करायचं, चैत्रागौरीला आरास करायची, कलेला प्रोत्साहन देण्यासाठी! असं म्हणतात की, यौवन व संयम, आशा व सिध्दी, कल्पना व वास्तव, भक्ती व शक्ती यांचा समन्वय साधून जीवनात सौंदर्य, संगीत, स्नेह निर्माण करणारा तो वसंत!

दूसरा ग्रीष्म, अंगाची लाही लाही करणारा! मुलांना मनसोक्त पाण्यात डुंबण्याचं स्वर्गसुख देणारा! अगदीच सृष्टी रुक्ष वाटू नये म्हणून मोगऱ्याचा बहर देणारा! जेंव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो दिवस सर्वात उष्ण असतो. या नक्षत्रावर भात पेरणी करतात. या नक्षत्रात सूर्य नऊ दिवस असतो. जर हे नऊ दिवस तापमान वाढलेले राहिले तर भाताचे पीक चांगले येते. म्हणून रोहिणीचा पेरा अन् मोतियाचा तोरा अशी म्हण पडली आहे. ह्या नौतापात रोहिणी व्रत करतात. ह्या व्रतात चंदन व पाणी यांचे दान करतात, तसंच गरजूंना छत्री व चप्पल देणं पुण्याचं मानतात. किती विचार केला आहे नं, ह्या गोष्टी पाप पुण्याशी जोडून! बाकी हा ऋतु साजरा करण्यासाठी लागतं कैरीचं पन्हं, कलिंगड, आंब्याचा कोणताही प्रकार कोणत्याही प्रकारे स्वाहा करणं.

तिसरा ऋतु वर्षा! प्रियाविण उदास वाटे रात वाला! सृष्टी सौंदर्याचं आणि स्त्री सौंदर्याचं वर्णन करून कवी थकत नाहीत असा! प्रणयातील हुरहूर, अधीरता वाढवणारा! एकाच छत्रीतून, आधे गिले आधे सुखे वाला! चोच उघडून बसलेल्या चातकाचा! आषाढातला पाऊस आणि श्रावणातला पाऊस यांचं   वर्णन मी असं करते

आषाढाचा पाऊस म्हणजे, कुणीतरी याला रोका

श्रावणाचा पाऊस म्हणजे, आनंदाचा झोका

आषाढाचा पाऊस म्हणजे, धरतीवर आक्रमण

श्रावणाचा पाऊस म्हणजे, धरतीचं औक्षण

आषाढाचा पाऊस, अखंड रिपरिप

श्रावणाचा …फक्त टिपटिप

आषाढाचा पाऊस देतो, काळोख आंदण

श्रावणाचा पाऊस करतो, पिवळ्या रंगाची शिंपण

आषाढाचा पाऊस म्हणजे, मातीच्या सुवासाची पखरण

श्रावणाचा पाऊस म्हणजे, वृक्षवेलींवर रंगांची उधळण

आषाढाच्या पावसात, अंगणाच्या बंदरावर गर्दी नावांची

श्रावणाच्या पावसात,अंगणी झिम्मा-फुगडी चिमुरड्यांची

आषाढात सूर्य मारतो दडी

श्रावणात तोच होतो, लपाछपीचा गडी

आषाढाचा पाऊस म्हणजे, नंगा नाच पत्र्यांचा

श्रावणाचा पाऊस म्हणजे, प्रेमळ धाक आईचा

आषाढाच्या पावसासाठी, भरतो चातकांचा मेळा

श्रावणाचा पाऊस करतो, फुलपाखरे गोळा

पण त्याशिवाय काही प्रकारचे पाऊस, त्यांची गमतीदार नावे, म्हणी सांगणार आहे.

१.पडता हत्ती, कोसळती भिंती

२.सासूचा पडेल मघा, तर चुलीपुढे बसा (सतत मारा, घराबाहेर पडताच येत नाही)

३.म्हातारा पडेल पुख(पुष्य), तर चाकरीच्या गड्याला सुख( थांबून थांबून पडतो, पाऊस थांबला म्हणून कामाला सुरवात करावी तोवर पुन्हा पडायला लागतो, त्यामुळे गड्यांना हजेरी आणि विश्रांती दोन्ही मिळतं)

४.पडतील चित्रा तर भात न खाई कुत्रा (बेभरवशाचा, अन्नाची नासाडी करतो)

५.आला अर्दोडा, झाला गर्दोडा (आर्द्रा चा पाऊस चिखल करतो)

६.पडल्या मिरगा तर टिरी कडे बघा ( मृग पडला तर शेतीची कामे खोळंबतात)

७.आली लहर, केला कहर, गेला सरसर(आश्र्लेशाचा पाऊस म्हणजे थोड्या थोड्या भागावर जोरदार सरी येऊन जातात. एकाठीकाणी मोठ्ठा पाऊस लागावा आणि थोड पुढं गेलं की सगळं कोरडं ठणठणीत)

८. पूर्वा फाल्गुन हा सुनेचा (चंचल, कामचुकार)

९.पुनर्वसु चा तरणा पाऊस( शक्तिशाली)

वर्षा ऋतू म्हणजे भक्तीचा पूर!आषाढीवारी, गुरूपौर्णिमा, नारळी पौर्णिमा(रक्षाबंधन), नागपंचमी, कृष्ण जन्म, गोपाळकाला, श्रावणातला प्रत्येक दिवस हा त्या त्या देवतेची पूजा करण्याचाच असतो. सणावारांची रेलचेल असणारा ऋतु!

क्रमशः…

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments