डाॅ.भारती माटे
इंद्रधनुष्य
☆ अनोळखी लोक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
रेल्वे स्टेशनवर ज्या सूचना पुकारल्या जातात, त्यासाठी वेगळा एक माणूस नेमलेला असतो, जो प्रसंगी रेग्युलर रेकाॅर्डिंग न वाजवता स्वतः माईकवरून सूचना देत असतो. असेच एक ‘अनाऊन्सर’ श्री. विष्णू झेंडे ड्युटीवर असताना रात्री दहाच्या आसपासची वेळ होती.
मुंबईतील मोठ्या स्टेशन्सपैकी एक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर त्यांची ड्युटी कायमप्रमाणे चालू होती. आणि अचानकपणे कुठेतरी सुतळी बाँब फुटल्यासारखा आवाज यायला लागला. ‘कुठे छोटा-मोठा स्फोट झाला की काय’, असा विचार झेंडेंच्या डोक्यात येऊन गेला. त्यांनी तात्काळ ‘आरपीएफ’ला फोनवर झालेली गोष्ट कळवली, आणि योग्य माहिती घेण्यास सांगितले.
पण असे अनेक आवाज परत परत ऐकू यायला लागले,
आणि त्यांना दोन व्यक्ती मोठ्या assault रायफल्स घेऊन प्लॅटफॉर्मवर दिसल्या. ते कसलेही साधे स्फोट वगैरे नव्हते, तर त्या रायफलीतून फायर केले जाणारे राऊंड आणि हँड ग्रेनेड होते, हे एव्हाना स्पष्ट झाले होते.
श्री. झेंडे ज्या ठिकाणी बसून रेल्वेच्या सूचना द्यायचे, तिथून सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या हालचाली बऱ्यापैकी स्पष्ट दिसायच्या. त्यांना हे दोन्ही रायफलधारी स्पष्ट दिसले होते. त्यातील एक ‘अजमल आमिर कसाब’ आणि दुसरा ‘अबू डेरा इस्माईल खान’ आहे, हे त्यांना त्याक्षणी माहीत नव्हतं, किंवा माहीत असण्याचं कारणही नव्हतं. परंतु हा काही साधासुधा प्रसंग नसून आतंकवादी हल्ला आहे, हे त्यांच्या पटकन लक्षात आलेलं.
असल्या प्रसंगांना सामोरं जाण्याची सवय नसते, तेव्हा भीतीनं गाळण उडणं स्वाभाविक आहे. झेंडेंच्या बाबतीतदेखील वेगळं काय अपेक्षित होतं..? परंतु त्यावेळी त्यांनी ज्याप्रकारे अचानक उद्भवलेल्या परीस्थितीला जे तोंड दिलं, ते अद्भुत होतं.
बुडत्याला काडीचा आधार असतो. इथं तर त्यांच्याजवळ स्टेशनचा पूर्ण आराखडा मेंदूत फिट होता, आणि स्टेशनवर प्रत्येक ठिकाणी स्पीकरशी जोडलेला माईक जवळ होता. आहे त्या परिस्थितीत घाबरून न जाता जे काही करता येईल ते करायचं, असं ठरवून त्यांनी माईक हातात घेतला,
आणि लोकांना सावध करायला, सूचना द्यायला सुरुवात केली. मराठी आणि हिंदीमधून ते लोकांना स्टेशनच्या दुसऱ्या मार्गाकडे जाण्यासाठी सूचना करत होते. हे दोन आतंकवादी जिथं होते, तिथून दूर जाण्यासाठी सूचना करत होते.
लोकांवर बेछूट गोळीबार आणि हँड ग्रेनेड्सचा हल्ला चालूच होता, परंतु शेकडो लोक झेंडेंच्या सूचनेनुसार विरुद्ध दिशेला पळून जात होते, संकटापासून वाचत होते.
साहजिकच, त्या दोघांच्या लक्षात आलं, की कुणीतरी लोकांना सावध करतंय, त्यांना सुटकेचा रस्ता दाखवतंय. मग ते या अनाऊन्सरला शोधू लागले.
झेंडेंच्या बाबतीत गोष्ट चांगली होती, की त्यांचा आवाज कुठून येतोय, हे कळत नव्हतं, परंतु झेंडे पहिल्या मजल्यावर बसलेले असल्याने दोन्ही आतंकवादी मात्र त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होते. त्यामुळे त्या दोघांना आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल, हे त्यांना माहीत होतं.
त्यामुळे त्यांनी जितका वेळ शक्य आहे तोवर खिंड लढवायची ठरवली.
नंतरचा अर्धा तास ते माईकवरून लोकांना सूचना देत राहिले. अर्ध्या तासाने जवळजवळ पूर्ण स्टेशन रिकामे झाले होते. तोवर आतंकवाद्यांना देखील ‘ह्या सूचना कुठून येतायत’ ह्याचा सुगावा लागला होता. आता त्यांनी रेल्वे स्टाफच्या लोकांकडे विशेष मोर्चा वळवला,आणि त्यांच्यावर गोळीबार करू लागले.
त्यावेळी त्यांनी जिथे झेंडे बसले होते त्या केबिन रूमवर देखील गोळीबार चालू केला. त्या गोळीपासून ते बचावले, परन्तु हळूहळू गोळ्यांचा आवाज जवळ जवळ येऊ लागला, तेव्हा त्यांनी काही क्षणांसाठी आपल्या जीवाची आशा सोडलेली. पण स्टेशनवरची गर्दी आता पूर्णपणे कमी झाल्याचं त्यांना समाधान होतं,
आणि आता जे होईल त्याला सामोरं जाण्याची मानसिक तयारी केली होती. त्यांचं कर्तव्य त्यांनी दोन पाऊले पूढे जाऊन चोख बजावलं होतं, याचा त्यांना आनंद होता, समाधान होतं.
सुदैवाने ते सुरक्षित ठिकाणी लपले, आणि सुखरूप राहिले.
त्या स्टेशनवर कायम जवळपास हजारो लोक कोणत्याही क्षणी असतात. त्यादिवशी सीएसटी स्टेशनवरच्या हल्ल्यात जवळपास ५२ लोकांनी प्राण गमावले. झेंडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधाना मुळे हा आकडा शेकडोंनी कमी झाला होता.
एवढ्यावर त्यांचं योगदान संपलं नाही, तर नंतर खटल्यादरम्यान त्यांनी कसाब विरोधात कोर्टात साक्षदेखील दिली, आणि त्याला शिक्षा मिळवून देण्यातसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली.
अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून सी.एस.एम.टी स्टेशनवरील वातावरण निवळून परत नव्याने सगळं सुरू झालं. लोकल्स भरून भरून पहिल्यासारख्या वाहू लागल्या. परंतु श्री. झेंडे यांचं २६-११ पूर्वीचं आणि नंतरचं जीवन यात प्रचंड बदल घडला असेल. त्या दिवसाच्या आठवणींमधून इतर अनेक प्रभावित लोकांप्रमाणे ते देखील बाहेर पडले नसतील.
आर्मीतील सैनिक आणि पोलीस यांच्याविषयी सदैव अपार आदर आहेच. परंतु श्री. विष्णू झेंडे यांच्याकडे पाहिलं, तरी देखील मला देशप्रेमाचे भरते तेवढ्याच तीव्रतेने येईल, जेवढे एका सैनिकाकडे पाहून येईल.
श्री झेंडे हे देखील सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या इतकेच महान देशप्रेमी आहेत, त्यांची समयसूचकता आणि धैर्याला नमस्कार.
प्रेषक : चारुचंद्र करमरकर, नासिक
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈