श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ “मी ‘ती’ला शब्द दिला होता !” भाग -2 ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(भावानुवाद – हिन्दी कथा – उसने कहा था – लेखक स्व चंद्रधर शर्मा गुलेरी)
(सुभेदार साहेब म्हणाले, ”अजून फक्त दोन दिवस. दोन दिवसांनी ताज्या दमाची कुमक येईल, मग आपण मागे हटू.”) इथून पुढे..
अधून मधून एखाद-दुसरा तोफगोळा येऊन आदळायचा खंदकाच्या आसपास.आजूबाजूचं बर्फ आकाशात उंच उडायचं आणि त्याचा फवारा खंदकात दबकून बसलेल्या आम्हां शिपायांच्या अंगावर यायचा.
आधीच थंडीने हाडं गोठलेली. अंगावर कितीही कपडे चढवले तरी शरीरात गेलेली थंडी जणू तिथं मुक्कामालाच आल्यासारखी. नाही म्हणायला एक घासलेटची शेगडी होती शेकायला. पण तीही बिचारी थंडीने काकडत असायची. तिचा धूर मात्र नाकपुड्यांमध्ये आपसूक जाऊन बसायचा. खंदकात साचलेलं बर्फाळ पाणी बादली बादलीने गोळा करून बाहेर फेकण्याचं एक कामच होऊन बसलं होतं.
बोधासिंग थंडी तापाने फणफणला होता. मी जवळच्या दोन्ही कांबळी त्याच्या अंगावर पांघरल्या. शिवाय आपल्या अंगातला उबदार कोटही त्याला चढवायला दिला.
“आणि मग तुम्ही कसे राहणार या थंडीत?” बोधाने लहनाला विचारलं.
“अरे,बेटा! मला पुरे एवढं. आणि या देशातल्या गो-या मडमांनी उबदार कोट पाठवलेत आपल्यासाठी… आपण त्यांच्या देशाला वाचवण्यासाठी इतक्या दूरवरून इथं लढायला आलोय म्हणून! तसलाच एक कोट सकाळीच आलाय पलटणीत. तोच घालीन मी आता. आणि शेगडी आहेच की उबेला. तु झोप, बेटा.” असं म्हणत मी बोधासिंगची पहारा नाईट-ड्यूटी असताना त्याच्याऐवजी खंदकच्या तोंडापाशी माझी रायफल ताणून उभा राहिलो. माझी दिवसाची पहा-याची ड्यूटी तर मी आधीच पूर्ण केली होती.
बोधा आता गाढ झोपी गेला होता. रात्र अधिक गडद होत चालली होती आणि बर्फ पडतच होता…. शरीरातली ऊब शोषून घेत होता! गोऱ्या मॅडमनी पाठवलेल्या गरम कोटांची मी बोधाला सांगितलेली गोष्ट म्हणजे एक निव्वळ थाप होती.
मी या बोधाची जरा जास्तच काळजी घेतोय हे इतरांच्या लक्षात यायला वेळ नाही लागला. मी त्याला माझी कोरडी जागा झोपायला देतो आणि स्वतः मात्र चिखलात पडून राहतो थंडी सहन करीत, हे सर्वांनी पाहिलं होताच.
“त्या पोराला आपला गरम कोट देतोयेस खरा… पण इथं न्यूमोनियानं मरणा-यांची संख्या काही कमी नाही, लहानासिंग!” असं ते बजावत असत. यावर मी गप्प राहत असे…. काय बोलणार? सुभेदारणीनं सांगितलं होतं ना… बोधा आणि सुभेदार आता तुझ्या हवाली म्हणून!
मध्यरात्र हलकेच आत आली. खंदक एकदम शांत होता. दूरवर कुठंतरी एखादा गोळा फुटलेला ऐकू यायचा. या असल्या लढाईचा उबग आला होता सर्व जवानांना. लढाई म्हणजे कशी पाहिजे.. आर नाही तर पार. हातघाईची पाहिजे… आता तलवारी नसतात, पण संगिनी तर असतात. चालून आला कुणी अगदी जवळ आणि रायफल ताणायला सवड नाही सापडली तर सरळ घुसवायच्या त्याच्या छाताडात… काम तमाम!
माझ्या मनात लढाईच सुरू होती…. आणि इतक्यात दूरवरून कुणी ताडताड चालत येताना दिसलं… मी सावध झालो. आकृती जवळ जवळ आली. हे तर आपले कमांडरसाहेब… लपटन साहेब! तोच रूबाब, तोच दिमाख, तीच चाल. अंधारातही ओळखलं त्यांना. फक्त चेहरा स्पष्ट दिसत नव्हता साहेबाचा… अंधारच इतका होता!
साहेब जवळ येताच मी त्यांना कडक सलूट बजावला. “सुभेदार हजारासिंग!” त्यांचा आवाज ऐकूनच सुभेदार साहेब लगबगीने खंदकाच्या बाहेर आले… त्यांनीही या वरिष्ठ अधिका-याला सलूट ठोकला.
लपटनसाहेब ऊर्दूत बोलले, ”सुभेदार हजारासिंग, आपले इथले पन्नास पैकी निवडक चाळीस सैनिक घेऊन त्या दोन शेतांपलीकडच्या खाईकडे लगेच निघा. तिथे पन्नास जर्मन सैनिक लपून बसलेत. दारूगोळाही फारसा शिल्लक नाही त्यांच्याकडे असा माझा अंदाज आहे. मी तुमच्या मदतीला रस्त्यात एका वळणावर पंधरा जणांची एक शस्त्रसज्ज तुकडी ठेवलीये… त्यांना घेऊन जर्मनांवर हल्ला चढवा… रात्रीचा अंधार आपल्या बाजूने आहे आणि आपले सैनिक दुश्मनांचं रक्त प्राशन करायला उतावळे झालेत!… आपल्या खंदकाच्या मागील बाजूने अलगद बाहेर पडा… निघा! खंदकाचा ताबा घ्या… मी सकाळी उजाडताच आणखी कुमक पाठवतो…. गुड लक!” असे म्हणून त्या साहेबांनी खिशातली सिगारेट काड्याच्या पेटीतील काडीने शिलगावली आणि खंदकाकडे पाठ करून ते उभे राहिले…. शांतपणे!
पन्नासपैकी एकही जण मागे राहायला तयार नव्हता. बोधासिंगही निघाला. मी त्याला थांबवले. नको येऊस म्हणालो. मीही निघालो तर सुभेदारसाहेबांनी बोधाकडे फक्त बोट दाखवले…. मला समजलं… बोधाची काळजी घ्यायला साहेब मला थांबायला सांग्ताहेत. हुकूम मानावाच लागतो आणि बोधाला सोडून मी जायला मनातून तयारही नव्हतो म्हणा!
सुभेदारसाहेबांच्या नेतृत्वाखाली चाळीस जणांची तुकडी अंधारात कूच करती झाली…. जर्मनांवर हल्ला करण्यासाठी!
बोधासिंग मात्र पडूनच होता. त्याच्या अंगात त्राण राहिले नव्हते उठायचे…. कोवळं पोर ते! सैनिकी जीवनात इतक्या लवकर अशा भयंकर लढाईला सामोरे जावे लागेल आणि तेही अशा परदेशी थंडीत? त्याने कल्पनाही केली नव्हती.
कसे बसे दहा जण मागे राहायला बाध्य झाले. मी, बोधा आणि बाकीचे आठ सरदार असे दहा जण!
पाच-दहा मिनिटांनी ‘लपटन’ साहेबांनी मला विचारले “सिगारेट पिणार?” आणि त्यांनी मागे वळून माझ्यापुढे सिगारेट धरली.
ती सिगारेट त्यांच्या हातून घेताना खंदकाच्या तोंडापाशी असलेल्या शेगडीच्या प्रकाशात मला साहेबाचा चेहरा ओझरता दिसला! लपटनसाहेबांचे लांब केस असे अचानक एखाद्या कैद्यासारखे कमी कसे कापले गेलेले दिसताहेत. आणि ऊर्दू भरभर बोलताहेत खरे पण हे तर पुस्तकी, छापील ऊर्दू! आपल्या लपटनसाहेबाला तर ऊर्दूची चार वाक्येही धड बोलता येत नाहीत…! गेली पाच वर्षे मी आणि लपटनसाहेब एकाच रेजिमेंटमध्ये तैनात आहोत. मी साहेबांना नाही ओळखणार? हे तर कुणी भलतेच दिसताहेत…. पण खात्री करून घ्यावी!
“साहेब, आपण भारतात कधी परतायचं? मी त्यांना विचारलं.
“लढाई संपेलच आता. मग लगेच निघू. पण का? हा देश आवडला नाही वाटतं?” त्यांनी प्रतिप्रश्न केला. त्यांचं छापील ऊर्दू मला आता जास्तच खटकू लागलं होतं.
“तसं नाही, साहेब!. पण तुमच्या सोबत शिकारीवर जाण्याची मजाच काही और! आठवतं साहेब, मागील वर्षी आपण शिकारीला गेलो होतो जगाधरी जिल्ह्यात, तुम्ही खेचरावर बसला होतात. नीलगायीची शिकार केली होती आपण. तुमचा खानसामा अब्दुल्ला सुद्धा होता बरोबर. तो बिचारा रस्त्यातल्या मंदीरात जाऊन शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा… आठवतं? आणि साहेब, तुम्ही त्या नीलगायीची शिंगे शिमल्याला पाठवली होती ना? किती मोठमोठी शिंगे होती ना नीलगायीच्या त्या… चार चार फुटांची असतीलच ना?”
या सर्व प्रश्नांसाठी साहेबाचं एकच उत्तर होतं ”हो, आठवतंय तर! एक एक शिंग चार फुट चार इंचाचं.”
“तु सिगारेट पेटवत का नाहीस?” साहेबांनी मला मध्येच विचारलं.
“थांबा साहेब, खंदकातून काडेपेटी घेऊन येतो.” मी काडेपेटीचा बहाणा करून घाईतच खंदकात शिरलो. थांबलो असतो तर साहेबांनी मला त्यांच्या खिशातली काडेपेटी देऊ केली असती. अंधारात झोपलेल्या वजीरासिंगला मी ठेचकाळलो.
“काय आकाश बिकाश कोसळले की काय लहना? झोपू दे की थोडं.” त्यानं रागानेच म्हटलं.
मी म्हटलं, ”लपटनसाहेबांच्या पोशाखात मृत्यू आलाय खंदकात…. चल ऊठ. अरे, तो आलेला अधिकारी जर्मन आहे…. लपटनसाहेब बहुदा मरून गेले असावेत किंवा जर्मनांनी त्यांना कैद केले असेल. याने त्यांचा पोशाख घालून येऊन आपल्याला फसवलंय. वाटेत दबा धरून बसलेले जर्मन आता सुभेदार साहेबांच्या तुकडीचा खात्मा करणार हे निश्चित. तू खंदकातून बाहेर पडून वा-याच्या वेगाने त्यांना गाठ… फार दूर नसतील गेले ते अजून. त्यांना म्हणावं… मागे फिरा… पुढे धोका आहे!” मी एका दमात त्याला सांगितलं.
“पण लहनासिंग… तुम्ही इथे आठच जण उराल… इथं हल्ला झाला तर?”
मी दबक्या आवाजात पण निर्धाराने म्हणालो, “तू जा रे…. एक एक शीख सव्वा लाखाला भारी पडतो…. जा… वाहेगुरू तुला यश देवोत!” आणि तो एखाद्या भूतासारखा खंदकाच्या मागच्या बाजूने धावत सुटला.
– क्रमशः भाग दुसरा
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈